मुंबई : Mushroom Farming… मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर शेतकरी मशरुमच्या शेतीकडे वळत आहेत. परंतु अनेक वेळा योग्य पद्धतीने लक्ष न दिले गेल्याने शेतकर्यांना नुकसान देखील सहन करावे लागते. त्यामुळे मशरुमची शेती करतांना काही बाबींवर सुरुवातीपासूनच लक्ष देणे गरजेचे आहे. असे केल्याने चांगले उत्पादन तसेच चांगले उत्पन्न देखील मिळू शकते.
मशरुमच्या शेतीची (Mushroom Farming) सुरुवात सप्टेंबर महिन्यात केली जाते. त्यासाठीचे सर्वात महत्वाचे काम आहे ते कम्पोस्ट तयार करण्याचे. कम्पोस्ट तयार करण्याची प्रक्रिया ही 28 दिवसांची असते. या 28 दिवसात आठ वेळा या भुसाला पलटावे लागते. आणि प्रत्येक वेळी यात काही न काही मिसळावे लागते. भुसाला ओले करण्याच्या आगोदर ज्या जागी आपल्याला कम्पोस्ट तयार करायचे आहे, त्या जागेला 12 तास आगोदर स्वच्छ करून त्यावर 2 टक्के फॉर्मेलीन प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करून निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. त्यानंतर ज्या जागेला प्लास्टीक पेपरने झाकून द्यावे. त्यानंतर दुसर्या दिवशी या ठिकाणी भुसा टाकावा. त्यानंतर 24 ते 48 तासांपर्यंत थोड्या-थोड्या वेळाने पाणी शिंपडावे व एकजिव करुन घ्यावे. एखाद्या स्प्रेने पाणी स्प्रे केल्यास अतिउत्तम. या प्रक्रियेच्या तिसर्या दिवशी प्रति क्विंटलच्या हिशोबाने युरिया मिसळून त्यांचा ढीग लावून घ्यावा.
ढीग लावल्यानंतर पाच दिवसांपर्यंत हा ढीग तसाच पडू द्यावा. सहाव्या दिवशी हा ढीग पसरवून घ्यावा. ढीग पसरवितांना वरची पाच ते सहा इंचाची लेयर सर्वात आधी खाली टाकायची आहे. त्यानंतर त्यावर उर्वरीत ढीग पसरवून घ्यावा. हा ढीग पसरवित असतांना त्यात एक किलो डीएपी, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट, तीन किलो कॅल्शियम कार्बोनेट मिसळून एक जिव करून पून्हा त्याचा ढीग लावावा. सहाव्या दिवशी हा ढीग पलटी मारुन पुन्हा ढीग तयार करुन पडू द्यावा. हीच प्रक्रीया नवव्या आणि 13 व्या दिवशी देखील करावी. तेराव्या दिवशी मात्र त्यात तीन किलो प्रति क्विंटलच्या हिशोबाने गव्हाची चुरी त्यात मिसळावी.
चौथ्या वेळेस पलटी करतांना त्यात 10 किलो जिप्सम आणि एक किलो निबांच्या पाल्याची भुकटी प्रति क्विंटलच्या हिशोबाने एकत्र करुन पलटून घ्यावा. हे मिश्रण एकजिव करीत असतांना त्यात ओलावा कमी असल्यास पाणी शिंपडून घ्यावे. पाचव्या वेळेस पलटी करतांना त्यात काहीही न मिसळता तसाच सोडून द्यावा. सहाव्यांदा पलटी करतांना 100 ग्रॅम फ्लुराडॉन प्रति क्विंटलच्या हिशोबाने मिसळावे. सातव्यांदा पलटी करतांना अशाच पध्दतीने करावी.
त्यानंतर शेवटची व आठवी पलटणी करतांना कम्पोस्ट उचलून पाहावे व त्यातून अमोनियाचा वास येत आहे किंवा नाही हे पहावे. जर अमोनियाचा वास येत नसेल तर कम्पोस्ट तयार झाले असा समजा. कम्पोस्ट हातात घेवून दाबुन पाहिल्यानंतर जर त्यामधून पाणी निघत असेल तर त्यात ओलावा जास्त आहे असे समजावे. असे असल्यास कम्पोस्टचा पून्हा ढीग लावून एक-दोन वेळा पून्हा पलटी करुन घ्यावा. कम्पोस्ट बनवितांना तुम्ही त्यात कोंबडी खत देखील घालू शकता. कोंबडी खत घालायचे असेल तर ते तुम्हाला पहिल्या पलटीच्यावेळीच घालावे लागेल.
अशी करा पेरणी
कम्पोस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पेरणी करावी लागेल. पेरणी झाल्यानंतर त्यावर कागदी पेपर टाकून त्यावर 10 ते 15 मिनिटे पाणी स्प्रे करायचे आहे. पाणी स्पे्रे करतांना पेपर सुकणार नाही आणि अधिक पाण्यामुळे फाटणारही नाही याची काळजी घ्यावी. 10 ते 15 दिवसात पुर्ण बेडवर पांढरी बुरशी दिसू लागते. त्यानंतर पेपर काढून त्यावर कॉर्बंडजिम, डाइथेन एम-45, फ्यूराडॉन आणि फार्मलिनचा चौथा भागचे मिश्रण करुन त्यावर शिंपडून घ्यावे.
यानंतर त्या मिश्रणाचे छोटे-छोटे ढीग बनवून 10 ते 12 तासांपर्यंत सोडून द्यावे. त्यानंतर त्याला फावड्याने मोकळा करुन घ्यावा. त्यानंतर त्या कम्पोस्टमधून फार्मलिनचा वास येतो य की नाही हे पाहावे. वास येत असेल तर एक-दोन वेळा पलटी करुन घ्यावा. त्यानंतर वास येणे बंद झाले की, कम्पोस्ट तयार झाले समजा. त्यानंतर शेणखताची दीड ते दोन इंचाची लेयर पुर्ण बेडवर टाकावी. त्यानंतर त्यावर पाणी स्प्रे करावा. पाणी स्प्रे करतांना ते फक्त शेण खताच्या अर्ध्या लेयर पर्यंतच जाईल याची काळजी घ्यावी. असे दहा ते बारा दिवस केल्यानंतर आपल्याला दिसेल की, यातून छोटे-छोटे मशरूम यायला लागलेत. जे पुढील तीन-चार दिवसांत तोडण्यासाठी तयार असतील.
स्पॉन घेतांना या गोष्टी ठेवा लक्षात
मशरुमचे स्पॉन घेतांना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. स्पॉन घेतांना ते पूर्णपणे पांढरे असले पाहिजे. त्यावर काळा किंवा पिवळा डाग तसेच गहू किंवा जवसचे दाणे असू नये. स्पॉन जितका स्वच्छ असेल तितका जास्त दर मिळतो. त्यामुळे मशरुमचे उत्पादन घेतांना त्याला डाग लागणार नाही याची काळजी घ्यावी. एखाद्या स्पॉनला डाग किंवा दाणे दिसून येत असतील तर ते तातडीने काढून टाकावे. जेणे करून इतर स्पॉन खराब होणार नाहीत.
मशरुमची तोडणी करतांना ही घ्या काळजी
मशरूमची तोडणी करतांना काही काळजी घेणे गरजेचे आहे. मशरुम तोडतांना कोणतीही घाई गडबड न करता तोडावे. अनेकदा शेतकरी एका मागे एक मशरुम तोडत जातात. त्यानंतर त्याचा खालचा भाग कापतात. असे केल्याने मशरूम खराब होवून नुकसान होवू शकते. त्यामुळे मशरूम तोडतांना चाकूच्या सहाय्याने खालच्या भागासह कापावे. तोडणी झाल्यानंतर पौटेशियम मेटाबाई सल्फेट 1 पीपीएम प्रती लीटर पाण्यात मिसळून त्याचे मिश्रण तयार करावे. दोन भागात हे मिश्रण तयार करावे. एका मिश्रणात मशरूम टाकावेत. त्यानंतर पून्हा दुसर्या मिश्रणात टाकून चांगल्या पद्धतीने धुवून घ्यावे. धुतल्यानंतर 15 ते 20 मिनिटे सुकण्यासाठी सोडून द्यावेत. त्यानंतर त्याची पॅकीग करावी. जास्त वेळ न ठेवता ते बाजारात न्यावे.
चांगल्या दरासाठी अशी घ्या काळजी
लागवड केल्यापासून ते काढणीपर्यत जितकी काळजी मशरुमची घेतली जाईल तितकीच काळजी काढणीनंतर देखील घेतली गेली पाहिजे. पौटेशियम मेटाबाई सल्फेट मिश्रीत पाण्यातून मशरुम बाहेर काढल्यानंतर ते कोरडे होईपर्यंत पॅकींग करू नये. अन्यथा ते खराब होण्याची भिती असते. त्याच बरोबर पॅकींग करतांना आकर्षक अशा पॅकींगमध्ये करावे. पॅकींग करातांना त्यात खराब झालेले मशरुम जाणार नाही याची काळजी घ्यावी. एकाच साईजच्या मशरुमची निवड करुन ते पॅकींग करावे, असे केल्यास चांगले दर मिळू शकतो.