मुंबई : राज्यभरातील आजवरच्या आणि येत्या 4 दिवसातील पावसाचा आढावा घेतल्यास (Monsoon Tracking) अतिशय निराशाजनक चित्र उभे राहत आहे. एकीकडे, कोकण, मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार कोसळत असताना खान्देश विभाग येत्या चारही दिवस तहानलेलाच राहणार, असे चित्र दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रासह बहुतांश मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ, मराठवाडा भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अजूनही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने निम्म्याहून अधिक महाराष्ट्रातील पेरण्या खोळंबल्या आहेत. तर, काही ठिकाणी दीर्घ प्रतीक्षेनंतर घायकुतीला आलेल्या शेतकऱ्यांनी अपुऱ्या पावसावर पेरण्या केल्या आहेत. त्यांच्यापुढे आता दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. दुबार पेरणीचे प्रमाण वाढल्यास, राज्यात खते व बियाण्यांची मोठी टंचाई व त्यातून काळाबाजार होण्याची भीती आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
राज्यातील बहुतांश माध्यमे मुंबईकेंद्रीत बातम्या करताना संपूर्ण राज्य गृहीत धरून मुसळधार, जोरदार, कोसळ”धार”, तुफानी चित्र उभे करत आहेत. मात्र, कोकण, मुंबई, ठाणे, पालघर वगळता हे चित्र फसवे आहे. राज्याचा निम्म्याहून अधिक भाग पावसाच्या मोठ्या तुटीचा आहे. दुसरीकडे, हवामान खात्याकडूनही मुंबईकेंद्रीत बुलेटिन आणि ट्विट केली जात आहेत. पुणे वेधशाळेचे के.एस. होसाळीकर यांच्या माहितीचा माध्यमे मुख्यत: आधार घेताना दिसतात. मात्र, होसाळीकर हेही मुंबई-पुणे केंद्रीत माहिती प्रसारित करताना उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील नेमके चित्र दुर्लक्षित करताना दिसत आहेत. नागपूर प्रादेशिक विभागाचे कार्य फक्त विदर्भापुरते मर्यादित असल्याने मुंबई-पुण्या बाहेरील शेतकऱ्यांना हवामानाचे नेमके आकलन करण्यात मर्यादा येत आहेत. त्यामुळे वेधशाळांनी ग्रामीण महाराष्ट्राची विस्तृत अनुमान, अंदाज देण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, माध्यमांनीही अतिरंजित, चटपटीतपणा किमान हवामान, पावसाच्या बातम्यात तरी टाळून समग्र महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून वृत्तांकन करावे, अशी अपेक्षा आहे.
येत्या 4 दिवसातील जिल्हानिहाय पावसाचे अनुमान
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने जारी केलेले येत्या 4 दिवसातील जिल्हानिहाय पावसाचे अनुमान असे (मिलीमीटरमध्ये) –
रविवार, 2 जुलै : जळगाव – 19, धुळे -29, नंदुरबार – 30, नाशिक – 51, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – 09, जालना – 08, पुणे – 42, पालघर – 60, रायगड – 55, ठाणे – 50, सिंधुदुर्ग – 55, रत्नागिरी – 62, कोल्हापूर – 43, अहमदनगर – 13, सातारा – 24.
सोमवार, 3 जुलै : जळगाव – 15, धुळे -17, नंदुरबार – 12, नाशिक – 24, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – 05, जालना – 05, पुणे – 31, पालघर – 45, रायगड – 48, ठाणे – 40, सिंधुदुर्ग – 65, रत्नागिरी – 68, कोल्हापूर – 73, अहमदनगर – 09, सातारा – 26.
मंगळवार, 4 जुलै : जळगाव – 13, धुळे -06, नंदुरबार – 08, नाशिक – 21, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – 03, जालना – 03, पुणे – 16, पालघर – 43, रायगड – 63, ठाणे – 48, सिंधुदुर्ग – 80, रत्नागिरी – 93, कोल्हापूर – 89, अहमदनगर – 11, सातारा – 08.
बुधवार, 5 जुलै : जळगाव – 21, धुळे -22, नंदुरबार – 07, नाशिक – 24, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – 05, जालना – 06, पुणे – 14, पालघर – 59, रायगड – 70, ठाणे – 55, सिंधुदुर्ग – 93, रत्नागिरी – 86, कोल्हापूर – 76, अहमदनगर – 14, सातारा – 16.
सांगली जिल्ह्याचे येत्या 4 दिवसातले पाऊसमान, अनुमान प्राप्त नाही. याशिवाय, उर्वरित सर्व जिल्ह्यात विशेषत: विदर्भ व मराठवाड्यात 2 ते 5 जुलै दरम्यान सर्वत्र 10 मिलिमीटरपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. अपवाद, नांदेडमध्ये फक्त 5 जुलै रोजी 19 मिमी पावसाचे अनुमान आहे.
आजपर्यंतची पावसाची जिल्हानिहाय तूट
यंदाच्या मान्सूनमध्ये, जिल्हानिहाय आजपर्यंतची पावसाची तूट चिंताजनक पातळीवर आहे. 1 जूनपासून आतापर्यंत, सोबतच्या छायाचित्रात, नकाशातील हिरव्या भागात सरासरी इतका पाऊस झाला आहे. लाल भागात पावसाची 20 ते 59 टक्के इतकी तूट आहे. पिवळ्या भागातील पावसाची तूट ही 60 टक्क्यांहून अधिक आहे.
जिल्हानिहाय आजपर्यंतची पावसाची तूट अशी –
1. नंदुरबार – 62% (सामान्य सरासरी – 147 मिमी, प्रत्यक्ष आजवर झालेला पाऊस – 56 मिमी)
2. जळगाव – 67% (सरासरी – 114, प्रत्यक्ष – 37)
3. धुळे – 73% (सरासरी – 116, प्रत्यक्ष – 31)
4. नाशिक – 51% (सरासरी – 158, प्रत्यक्ष – 77)
5. अहमदनगर – 39% (सरासरी – 108, प्रत्यक्ष – 66)
6. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – 55% (सरासरी – 117, प्रत्यक्ष – 52)
7. जालना – 84% (सरासरी – 124, प्रत्यक्ष – 20)
8. बीड – 64% (सरासरी – 121, प्रत्यक्ष – 44)
9. परभणी – 51% (सरासरी – 134, प्रत्यक्ष – 65)
10. हिंगोली – 96% (सरासरी – 164, प्रत्यक्ष – 06)
11. नांदेड – 80% (सरासरी – 145, प्रत्यक्ष – 30)
12. लातूर – 36% (सरासरी – 130, प्रत्यक्ष – 83)
13. धाराशिव (उस्मानाबाद) – 84% (सरासरी – 116, प्रत्यक्ष – 19)
14. सोलापूर – 72% (सरासरी – 99, प्रत्यक्ष – 27)
15. पुणे – 45% (सरासरी – 178, प्रत्यक्ष – 97)
16. सातारा – 62% (सरासरी – 181, प्रत्यक्ष – 68)
17. कोल्हापूर – 62% (सरासरी – 358, प्रत्यक्ष – 134)
18. सांगली – 81% (सरासरी – 120, प्रत्यक्ष – 23)
19. सिंधुदुर्ग – 50% (सरासरी – 857, प्रत्यक्ष – 425)
20. रत्नागिरी – 56% (सरासरी – 796, प्रत्यक्ष – 353)
21. रायगड – 31% (सरासरी – 616, प्रत्यक्ष – 423)
22. मुंबई – 37% (सरासरी – 517, प्रत्यक्ष – 325)
23. यवतमाळ – 63% (सरासरी – 165, प्रत्यक्ष – 61)
24. वर्धा – 61% (सरासरी – 162, प्रत्यक्ष – 63)
25. वाशीम – 66% (सरासरी – 167, प्रत्यक्ष – 57)
26. बुलढाणा – 74% (सरासरी – 131, प्रत्यक्ष – 34)
27. अकोला – 81% (सरासरी – 138, प्रत्यक्ष – 26)
28. अमरावती – 62% (सरासरी – 143, प्रत्यक्ष – 54)
29. नागपूर – 31% (सरासरी – 166, प्रत्यक्ष – 115)
30. चंद्रपूर – 54% (सरासरी – 179, प्रत्यक्ष – 82)
31. गडचिरोली – 38% (सरासरी – 210, प्रत्यक्ष – 130)
सरासरीहून अधिक पाऊस झालेले जिल्हे
राज्यातील तब्बल 31 जिल्ह्यात आजवर पावसाची तूट दिसत आहे. फक्त 3 जिल्ह्यात सरासरीइतका किंवा त्याहून अधिक पाऊस झाला आहे. हे तीन जिल्हे आहेत पालघर, भंडारा आणि गोंदिया. पालघरमध्ये सरासरीहून 17% अधिक पाऊस झाला आहे. जूनपासून या मान्सून हंगामात 390 मिलिमीटर सरासरी पाऊस तिथे अपेक्षित असतो. यंदा पालघरमध्ये आतापर्यंत 456 मिमी पाऊस नोंद झाला आहे. भंडारा जिल्ह्यात 16% तर गोंदिया जिल्ह्यात 13% अतिरिक्त पाऊस झाला आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात आतापर्यंत 209 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भंडाराची सरासरी 180, तर गोंदियात सरासरी 186 मिमी असते.