मुंबई : जुलैमध्ये देशभरात मान्सून सरासरी गाठणार आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) महिनाभरासाठी अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, जुलै 2023 मध्ये संपूर्ण देशभरात मासिक पाऊस सरासरी दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 94 ते 106% राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
उपग्रह आणि अवकाशीय स्थितीचे दीर्घकालीन निरीक्षण केले असता पावसाच्या वितरणाची कल्पना येऊ शकते. त्यानुसार, या महिन्यात मध्य भारत आणि लगतच्या दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारताच्या बहुतेक भागात आणि ईशान्य आणि वायव्य भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम, ईशान्य आणि आग्नेय द्वीपकल्पीय भारतातील अनेक भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता
जुलै 2023 मधील देशातील संभाव्य पावसाचा अंदाजबाबत सोबतचे छायाचित्र पाहा. यात पिवळा, केसरी, तांबडा, लाल रंग असलेल्या भागात महिनाभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. हिरव्या ते गडद हिरव्या भागात सरासरीइतका पाऊस राहील. निळ्या, जांभळ्या, गडद निळ्या भागात जुलै महिनाभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहू शकतो. मात्र, नाशिक वगळता जळगावसह खान्देशच्या काही भागात आणि विदर्भात पाऊसमान चिंताजनक राहण्याची शक्यता आहे.
जुलै 2023 दरम्यान, वायव्य आणि द्वीपकल्पीय भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतेक भागांमध्ये तापमान हे सरासरी कमाल तापमानापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात किमान तापमान राहण्याची सरासरीइतके राहण्याची शक्यता आहे.
अल निनो स्थिती विकसित होण्याची शक्यता
विषुववृत्तीय प्रशांत महासागरावर अल निनो स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान (SST) तसेच वातावरणातील तापमान काही अंशी वाढण्याची शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबर 2023 दरम्यान हिंद महासागरात द्विध्रुव (IOD) स्थिती आहे.
पॅसिफिक आणि हिंद महासागरांवरील समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान परिस्थितीचा भारतीय मान्सूनवर जोरदार प्रभाव पडत असतो. त्यामुळे या महासागर खोऱ्यांवरील समुद्राच्या पृष्ठभागाची परिस्थिती आणि तेथे होणाऱ्या घडामोडींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर 2023 या हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी आणि ऑगस्ट महिन्याच्या पावसासाठीचा अंदाज हवामान खाते जुलै अखेरीस जारी करेल.
जून 2023 मधील देशात झालेला पाऊस आणि एकूण महिनाभरातील तूट यासंदर्भातील सोबतचे छायाचित्र पाहा. यात निळ्या-गडद निळ्या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हिरव्या भागात सरासरीइतका पाऊस झाला आहे. लाल भागात 21 ते 59 टक्के इतकी पावसाची तूट आहे. पिवळ्या भागातील पावसाची तूट 60 टक्क्यांहून अधिक आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात तब्बल 46 टक्के पावसाची तूट दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह काही भागात तर अजून पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने दुबार पेरणीची चिंता सतावू लागली आहे. ज्या प्रदेशातून भारतातली मान्सूनचा प्रवास सुरू होतो, त्या केरळात पावसाची तूट 60 टक्क्यांहून अधिक आहे. देशभरातील हे असे एकमेव राज्य दिसत आहे. देशातला मान्सूनचा हा बदललेला पॅटर्न अतिशय धक्कादायक आहे.