मुंबई : यंदाचा नैऋत्य मान्सून येत्या पाच दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील भागात, म्हणजेच आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे. हा मान्सून विषुववृत्ताच्या समांतर पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करत मलेशिया, सिंगापूर आणि सुमात्रा बेटाच्या उत्तरेकडील भागातून पुढे सरकत आहे. तो 10 अंश उत्तर अक्षवृत्त आणि 100 अंश पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यान 13 मेपर्यंत पोहोचेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, नैऋत्य मान्सून दरवर्षी साधारणपणे 16 मे रोजी अंदमानात पोहोचतो. मात्र, यंदा तो सहा दिवस आधीच पोहोचण्याची शक्यता आहे.
अंदमानात मान्सून दाखल झाला तरी…
भारतीय महासागराच्या भागात मान्सून दाखल झाला, म्हणजे तो तात्काळ भारताच्या मुख्य भूभागावर विशेषतः केरळमध्ये आणि त्यानंतर सह्याद्री ओलांडून महाराष्ट्रात पोहोचेल, असे समजणे चुकीचे ठरेल. अंदमान ते केरळ हे सुमारे 2,000 ते 2,500 किलोमीटरचे अंतर असून, हे अंतर पार करण्यासाठी मान्सूनला बरच कालावधी लागतो. मात्र, मान्सूनची ही आगाऊ हालचाल केवळ पूर्वमोसमी वादळी पावसांना थोडी चालना देते, एवढेच.

सध्याची तापमानस्थिती सौम्य
कोकणातील सध्याचे तापमान सरासरी 33° ते 35°C इतकेच असून, उर्वरित महाराष्ट्रात तापमान सरासरीच्या तुलनेत थोडेसे खालीच आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातही महाराष्ट्राला उष्णतेच्या झळांपासून सुसह्यतेचा अनुभव येत आहे, असे म्हणता येईल. तसेच, सध्या रात्रीचा उकाडा किंवा हिटवेव्ह (उष्णतेची लाट) महाराष्ट्रात कुठेही जाणवत नाही.
– माणिकराव खुळे
ज्येष्ठ सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ, IMD पुणे
मान्सून अंदमानात कधी पोहोचतो?
भारतीय हवामान विभागानुसार, नैऋत्य मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर तसेच आग्नेय बंगालच्या उपसागरात साधारणतः 19 मे रोजी पोहोचतो.
मागील पाच वर्षांतील नोंद
2024: 19 मे
2023: 19 मे
2022: 19 मे
2021: 21 मे
2020: 17 मे
म्हणजेच, गेल्या तीन वर्षांत मान्सून सरासरी तारखेलाच अंदमानात पोहोचला होता, तर दोन वेळा किंचित लवकर किंवा उशीर झाला होता.