तुम्ही स्टार्ट-अप (Start-Up), बिझनेसच्या जगातला अनेक कथा वाचल्या असतील; पण, आज आम्ही तुमच्यासाठी अशा व्यवसायाची गोष्ट घेऊन आलो आहोत, जामध्ये आग्र्यातील दोघा भावांनी मिळून मशरूम शेतीच्या मदतीने कंपनी उभारली आहे. आयुष आणि ऋषभ गुप्ता या तरुण भावंडांनी काही वर्षांपूर्वी एकत्र येऊन सुरू केलेला हा व्यवसाय आज काही कोटींचा झाला आहे. त्यांच्या A3R मशरूम फार्म आणि गुप्ता ऑरगॅनिक फार्मची वार्षिक उलाढाल साडेसात कोटींवर पोहोचली आहे.
कोव्हिड महामारीने जगभर सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असताना आग्रा येथील आयुष (वय 25) आणि ऋषभ गुप्ता (वय 27) यांनी परदेशातून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी A3R मशरूम फार्म आणि गुप्ता ऑरगॅनिक फार्म सुरू केले. आता त्यांचा व्यवसाय जोर धरू लागला आहे.
लहानपणापासून शेतकरी होण्याचे स्वप्न
मोठे झाल्यावर काय बनायचे आहे, हा प्रश्न जेव्हा साधारणतः लहान मुलांना विचारला जातो, त्यावेळी बहुतांश मुले एकतर डॉक्टर, पायलट, वकील किंवा इंजिनियर व्हायची नेहमीची उत्तरे देतात. कुणीही सहसा आपल्याला मोठेपणी शेतकरी व्हायचे आहे, असे सांगत नाही. कारण, शहरांमध्ये वाढलेल्या आणि शेतापासून दूर, बहुतेक मुलांना त्यांचे अन्न कोठून येते, हे देखील माहिती नसते. आयुष आणि ऋषभ गुप्ता यांची स्टोरी मात्र इतरांपेक्षा फारच हटके आहे.
वडील, आजोबांमुळे शेतीत रस
आयुष आणि ऋषभ यांचे वडील आणि आजोबा या दोघांनाही शेतीमध्ये खूप रस होता. दोघे लहान असताना त्यांच्या वडिलांनी पॉलीहाऊसमध्येही शेती केली होती. मात्र, त्यांना ते जमले नाही. तेव्हापासूनच या दोघा भावांनाही शेतीत रस निर्माण झाला होता. सध्या हे दोघे आग्रा येथे एक सेंद्रिय पॉलीहाऊस फार्म चालवतात.
महिन्याला 40 टन मशरूम, 45 टन भाज्यांचे उत्पादन
गुप्ता बंधू तब्बल 16 प्रकारच्या भाज्या आणि मशरूम पिकवतात. त्यांच्या शेतात दर महिन्याला 40 टन मशरूम आणि 45 टन भाज्यांचे उत्पादन होत आहे. दररोज 1 लाखाहून अधिक किमतीच्या उत्पादनांची विक्री ते करत आहे. वडिलांचे पॉलिहाऊस शेती करण्याचे स्वप्न पाहतच आयुष आणि ऋषभ मोठे झाले. दिल्लीतून 2014 मध्ये हे कुटुंब आग्रा येथे स्थायिक झाले.
लंडन, दुबईचा नाद टाकून भारतातच थांबण्याचा निर्णय
कोविड साथीच्या काळात आयुष लंडनमध्ये बीबीए शिकत होता, तर ऋषभ दुबईत शिकत होता. त्यावेळी दोघा भावांच्या मनात घरी परतण्याचा कोणताही विचार नव्हता. पण, लॉकडाऊनमुळे आयुष्याला वेगळे वळण लागले. प्रवासाच्या निर्बंधामुळे ऋषभ दुबई अडकला होता. या भावंडांना एकटेपणा जाणवू लागला, त्यांना घरी परत यायचे वेध लागले होते. शेवटी, 2020 च्या अखेरीस, दोघे भाऊ पुन्हा एकत्र आले. नंतर त्यांनी लंडन किंवा दुबईला परत न जाण्याचा आणि भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. व्यवसायिक होऊ अन्न प्रकिर्या उद्योगात कसा प्रवेश करायचा, यावर दोघा भावांची नेहमी चर्चा व्हायची. वडिलांच्या शेतीच्या आवडीमुळे अखेर त्यांना तो उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
आधी काकडी, नंतर भाजीपाला लागवड
आयुष आणि ऋषभ गुप्ता यांनी 2020 च्या अखेरीस, त्यांच्या फार्मची स्थापना केली. त्यांनी यासाठी 40 टक्के अनुदान मिळवले, ज्यामुळे त्यांना पॉलीहाऊस फार्ममध्ये काकडीची लागवड करण्यास मदत झाली. या दोघांनी सुरुवातीला काकडीची लागवड केली. पाच महिन्यातच त्याची काढणी केली. पुढे त्यांनी भाजीपाला लागवड करण्याचा प्रयत्न केला.
दहा वर्षांपूर्वी केलेला मशरूमचा व्यवसाय पुन्हा नव्याने
जवळपास एक दशकापूर्वी दिल्लीत असताना आयुषने मशरूमचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता. तेव्हा ते शेतकऱ्यांकडून मशरूम विकत घ्यायचे आणि त्याची पॅकिंग करून विक्री करायचे. यामुळे मशरूमची भरीव नफा क्षमता त्याच्या लक्षात आलीहोतीच. पॉलीहाऊस सुरू केल्यानंतर दोघांनी मशरूम शेतीमध्ये विविधता आणण्याचा निर्णय घेतला. त्यातून नफा वाढण्याची अपेक्षा होती. दोन एकरात मशरूम लागवड आणि एक एकरमध्ये काकडी, टोमॅटो आणि बटाटे अशा इतर भाज्यांची लागवड करण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार, 2022 मध्ये मशरूमची लागवड सुरू केली आणि तेव्हापासून त्यांच्या नफ्यात निरंतर वाढ होत आहे.
मशरूम खाण्याचा ट्रेंड पथ्यावर
पूर्वीच्या मशरूमच्या अनुभवाव्यतिरिक्त आयुषला उत्तरेकडील शहरातील एक ट्रेंडही लक्षात आला होता. या प्रदेशातील शाकाहारी लोकं प्रामुख्याने मशरूमला पसंती देतात. बटन मशरूमची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत वाढली आहे. युट्युवरील फूड चॅनल्स व ब्लॉगमुळे मशरूम खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. लग्न सोहळ्यांमध्येही आता मशरूम डिशेस दिसतात. आरोग्यदायी, पौष्टिक, रुचकर आणि प्रोटीन स्त्रोत म्हणून मशरूम खाण्याचा हा आयुषच्या लक्षात आलेला ट्रेंड त्यांनी व्यवसायात फॉलो केला.
मशरूम शेतीच्या निर्णयात वडील ठामपणे पाठीशी उभे राहिले
आयुष सांगतो की, शेतकरी होण्याच्या त्यांच्या निर्णयाला कुटुंबियांनी आजिबात पसंती दिली नाही. आमच्या शिक्षणासाठी कितीतरी पैसा लावला, आम्हाला विनाकारण परदेशात पाठवले, असे सारे वडिलांना सांगण्यात आले. मात्र, वडील भक्कमपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी सांगितले की, तुम्हाला कोणाचेही काही ऐकण्याची गरज नाही. जर तुम्हाला शेती योग्य वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहून ठरल्याप्रमाणे काम पुढे चालू ठेवले पाहिजे. नंतर आई-वडिलांच्या संमतीनेच दोघा भावांनी आग्रा येथे पॉलीहाऊस फार्म उभारण्याचे नक्की केले. त्या जवळील काही बचत गुंतवली आणि उर्वरित रक्कम कर्ज घेण्याचे ठरवले.
वार्षिक उलाढाल 7.5 कोटी रुपये
सध्या गुप्ता बंधू महिन्याला अंदाजे 40 टन मशरूमचे उत्पादन घेत आहेत. ते सर्व A1 दर्जाचे मशरूम आहेत. हा दर्जा त्यांची परिपक्वता, सुव्यवस्थित आकार आणि बारकाईने ट्रिमिंग केल्यावरून ओळखला जातो. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे अनियमित आकारांमुळे बाजूला काढलेले ‘बी’ दर्जाचे मशरूमही आहेत. ते अन्न प्रक्रिया कंपन्यांना कॅनिंगसाठी विकले जातात. गुप्ता ऑरगॅनिक फार्म्स आणि A3R मशरूम फार्म्स या ब्रेडच्या उत्पादनांची विक्री थेट ग्राहकांना केली जाते. आग्रा आणि दिल्लीतील असंख्य व्यवसायांनाही ते पुरवठा करतात. शहरातील ग्राहकांची मागणी लक्षणीय आहे. महिन्याला त्यांची 30 लाखांपेक्षा जास्त मशरूम विक्री होते. गुप्ता बंधूंची एकूण वार्षिक उलाढाल 7.5 कोटी रुपये इतकी आहे.
सर्व भाज्या, मशरूमचे सेंद्रिय पद्धतीने पद्धतीने उत्पादन
आयुष गुप्ता सांगतात की, आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम दर्जा प्रदान करण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेला प्राधान्य देतो. मशरूम वाढीसाठी कोणतेही रसायन वापरले जात नाही. आमच्या सर्व भाज्या आणि मशरूम कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात. आजकाल लोक शेतीसारख्या व्यवसायाकडे तुच्छतेने पाहतात, परंतु योग्य प्रेरणा आणि चांगल्या टीमच्या जोरावर शेतीचा व्यवसायही नक्कीच फायदेशीर बनवता येऊ शकतो, हे आयुष आणि ऋषभ गुप्ता या भावंडांनी दाखवून दिले आहे.
संपर्क :
ऋषभ आणि आयुष गुप्ता, गुप्ता ऑरगॅनिक आणि A3R मशरूम फार्म, खसरा 1, 2 पट्टी शेखूपुर, शमशाबाद, उत्तर प्रदेश 283125 मो. 9811040460
फेसबुक पेज – HTTPS://M.FACEBOOK. COM/PEOPLE/GUPTA-ORGANIC- FARMS-AND-ABR-MUSHROOM- FARM/100083526364623/
पीएम किसानचा 17 वा हप्ता कधी येणार ? या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण माहिती