हलक्या जमिनीत
शेतीत भाजीपाला पिकाची लागवड केली तर धोक्यात जाणारा शेती नक्कीच फायद्यात येते. हे मिरची उत्पादनातून सिद्ध करुन दाखवले आहे. वरुड नृसिंह (ता.जिंतूर, जि.परभणी) येथील प्रयोगशिल तरुण शेतकरी विलास शिवाजीराव थिटे यांनी. त्यांना यंदा अर्धा एकर मिरची लागवडीतून 82 क्विंटल उत्पादन झाले असून त्यातून लाखभर रुपयांचा नफा मिळाला आहे. विशेष म्हणजे चुनखडीयुक्त हलक्या जमिनीत हे उत्पादन त्यांनी घेतले आहे.
केवळ सातवी पर्यंत शिक्षण घेतलेले 32 वर्षीय तरुण शेतकरी विलास थिटे यांना वरुड शिवारात वडिलोपार्जित 10 एकर शेती आहे. या पैकी 4 एकर सुपीक, तर 5 एकर खडकाळ आणि एक एकर चुनखडीयुक्त अतिशय हलक्या प्रतीची जमीन आहे. यात त्यांनी बागायती पिकाकरीता 71 फूट खोल विहीर खोदली आहे. तिला पाणी बर्यापैकी आहे. ते आपल्या 8 एकर जमीनीत खरिपात सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर, मूग, उडिद ही पीके तर 2 एकरात बारमाही भाजीपाला वाणाची वेगवेगळी पिके घेत असतात. यंदा त्यांनी वैशाली संकरित वाणाच्या मिरचीची चुनखडीयुक्त अर्धा एकर जमिनीत लागवड करुन त्यापासून 5 महिन्यात हिरव्या मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
मिरचीसाठी चुनखडीयुक्त जमीन
शेतकरी विलास थिटे हे गेल्या अनेक वर्षापासून टोमॅटो, भेंडी ह्या फळभाजीपाला पिका बरोबरच मिरचीची देखील लागवड करतात. त्यांचा हिरव्या मिरचीच्या उत्पादनात चांगला हातखंडा असल्याने भरघोस उत्पादन घेतात. यंदा त्यांनी वैशाली एफ 1 या संकरित जातीच्या मिरचीची गादी वाफ्यात रोपे तयार केली. 4 जून 2018 रोजी अतिशय हलक्या चुनखडियुक्त (75 टक्के चुनखडी व 25 टक्के माती) असलेल्या अर्धा एकर जमीनीत 5 फूट रुंद आणि सव्वा फूट लांब अंतरावर लागवड केली. त्याकरीता साधा थिबक संच बसवण्यात आला आहे.
खत व्यवस्थापन
लागवडी नंतर ऑगस्ट महिन्यात 5 लिटर गोमूत्र जैविक लिक्वीड ठिबक मधून दिले. त्यानंतर सप्टेंबर मध्ये 3 किलो 19ः19ः19 यानंतर 4 दिवसाला 3 किलो 13ः40ः13, परत 15 दिवसानंतर 10 किलो डिएपी 25 लिटर पाण्यात रात्रभर भिजवू घालून ते द्रावण सकाळी कपड्याने गाळन करुन 50 लिटर पाण्यात मिसळवून व्हेंचूरीद्वारे ही खतमात्रा ठिबकने दिले. जानेवरी, फेब्रुवारी महिन्यात महाधनचे 25 किलो 24ः24ः24, 25 किलो 20ः20ः0, अडीच टन शेणखत अशी खते आवश्यक त्या वेळी देण्यात आले.
किडरोग नियंत्रण
या मिरचीवर विषाणूजन्यरोग मोठ्या प्रमाणावर येतो. रोग होवूच नये व झाडे ताकदवान राहण्यासाठी ऑगस्टमध्ये त्यांनी 5 ग्रॅम अॅडमायर पावडर, 5 ग्रॅम अॅक्टर आणि जेम्स या औषधी मिश्रणाची फवारणी केली. याशिवाय 300 एम एल निंबोळी अर्क, कडू निंबाचा पाला कुटून व काही हिरव्या मिरच्या कुटून त्याचे अर्क गाळून फवारणी करण्यात आली. यामुळे मिरचीवर हिरवा गर्द रंग येवून ती डेरेदार वाढली. फुले व फळ धारणा देखील वाढली. थंडीच्या वातावरणाने कोकडा रोग येऊ नये म्हणून पेगासस औषध स्प्रिंकलद्वारे फवारले.
सिंचन पद्धती
जमीन चुनखडीयुक्त हलकी असल्याने 4 ते 5 दिवसा आड ठिबने पाणी दिले जाते. विद्राव्य खत देताना देखील सिंचन होते. फक्त 15 मिनिटे ठिबक संच चालवला तरी देखील पुरेसे पाणी होते.
मिरची प्लॉटचे संगोपन
सुरवातीला मे महिन्यात अर्धा एकर जमिनीची मशागत केल्यानंतर सरळ जमिनीवर बेड न करताच जून मध्ये मिरची रोपांची लागवड केली. यानंतर दरवेळी निंदणी खुरपणी करताना महिला मजूर रोपांच्या बुंध्याशी माती लावतात. त्यामुळे बेड तयार झाला आहे. दररोज मिरचीची पाहणी होत असल्याने झाडांना अन्नघटक व पाणी योग्य वेळी दिल्या जाते. यामुळे चार ते पाच फूट उंचीपर्यंत मिरची झाडांची वाढ झाली. या मिरचीचे योग्य संगोपन केल्याने अनेक फुटवे फुटून फुले व फळे भरपूर लगडुन उत्पादन विक्रमी होत आहे.
उत्पादन विक्रमीच
जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या ह्या मिरचीचा पहिला तोडा सप्टेंबर महिन्याच्या 25 तारखेला करण्यात आला. यात 8 क्विंट्टल हिरवी, तर 5 क्विंटल लाल मिरची निघाली. दुसरा तोडा 20 ऑक्टोबर 2018 ला केला. तो 20 क्विंट्टलचा आला. तिसरा 15 नोव्हेंबर ला केला तो 15 क्विंट्टल, चौथा जानेवारीत झाला, थंडीमुळे तो लांबला. यावेळी 14 क्विंट्टल, पाचवा मार्च 2019 ला केला, तो 20 क्विंट्टलचा झाला.असे मिळून एकूण 82 क्विंट्टल मिरचीचे उत्पादन झाल्याचे थिटे यांनी सांगितले.
उत्पादन खर्च, उत्पन्न
पाच महिन्याच्या कालावधीत त्यांना मिरचीचे उत्पादन घेण्यासाठी बियाणे 4 हजार रुपये, ठिबक व खते 20 हजार रुपये, औषधी 5 हजार रुपये, तोडणीसाठी मजूरी 30 हजार रुपये असा एकूण 59 हजार रुपये खर्च झाला. त्यांनी ही हिरवी मिरची सेलू, जिंतूर, मानवत, औरंगाबाद येथील बाजारात नेवून विक्री केली. यातील त्यांच्या पहिल्या तोड्याच्या 8 क्विंट्टल हिरव्या मिरचीला प्रती किलो 9 रुपये दर मिळाला, दुसर्या तोड्याच्या 20 क्विंट्टलला 14 रुपये प्रती किलो, तिसर्या 15 क्विंट्टलास 20 रुपये किलो, चौथ्या 14 क्विंटलास 30 रुपये, तर पाचव्या 20 क्विंटलला प्रति किलो 60 रुपये दर मिळाला. मिरची विक्रीतून त्यांना एकूण 1 लाख 67 हजार 200 रुपये उत्पन्न मिळाले. त्यातून खर्च वजा जाता 1 लाख 8 हजार 200 रुपये निव्वळ नफा मिळाला.
संपर्क
विलास शिवाजीराव थिटे
रा.वरुड नृसिंह, ता.जिंतूर, जि.परभणी
मो.नं.9922294759