बोगस बियाणे रोखण्यासाठी तेलंगणासारखा कठोर कायदा करा, अशी महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विनवणी केली आहे. अकोल्यात खतविक्रेत्यांकडे धाडी टाकून लाच मागणाऱ्या ‘पीए’मुळे एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळ बैठकीतच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची कानउघाडणी केली. मुख्यमंत्र्यांचा उग्रावतार पाहून सत्तार यांनी हात जोडून माफी मागितल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांनी आपल्याकडे योग्य कायदा नसल्याने बोगस बियाणे विकणाऱ्यांचे फावते, अशी तक्रार केली.
तेलंगणात पीडी कायद्यान्वये कठोर कारवाई
महाराष्ट्रामध्ये 1966 चा बियाणे कायदा आहे. मात्र, त्यात पुरेशा शिक्षेची तरतूद नसल्याने बोगस बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यांवर आता तेलंगणात पीडी कायद्यान्वये प्रतिबंधात्मक अटक करून कठोर कारवाई केली जाते. यामुळे तेलंगणात बोगस बियाणे विकणाऱ्या मंडळींवर कमालीची जरब व धाक निर्माण झाला आहे.
मंत्रिमंडळ कालच्या (मंगळवारी) बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तासल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी याच तेलंगणा मॉडेलचा दाखला देत सारवासारवीचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात बोगस खते व बियाणे व विक्रीला पायबंद घालण्यासाठी कोणतेही कठोर कायदे नाहीत, असे सांगून त्यांनी तेलंगणाचे उदाहरण दिले. तेलंगणात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी खास कायदे आहेत. आपण महाराष्ट्रात सुद्धा तेलंगणाच्या धर्तीवर बोगस बियाणे विरोधात कारवाईचा कायदा करायला हवा, अशी सूचना सत्तार यांनी केली.
अकोला धाडप्रकरण
अकोला एमआयडीसीत दोन दिवसांपूर्वीच अनेक खत व कृषी गोदामावर, अकोला कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने धाडी टाकल्या होत्या. या तपासणीनंतर काही गोदाम सील केले. या सरकारी धाडीच्या वेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहायक (पीए) दीपक गवळी आणि आधीच वादग्रस्त असलेला हितेश भट्टड यांचाही पथकात समावेश होता. त्यावरून बरेच वादळ उठले आणि आरोप-प्रत्यारोप झाले. अक्षत फर्टीलायझर्सचे व्यवस्थापक राजेश शिंदे यांनी या पथकाने 5 लाख रुपये मागितल्याचा आरोप केला. त्यावरून आमदार अमोल मिटकरी आणि नितीन देशमुख यांनी थेट सत्तार यांना संशयाच्या गर्तेत उभे केले.
या पथकातील हितेश भट्टड याच्याविरोधात, नागपूर शहरातील वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बोगस किटकनाशके आणि खते विकल्याबाबत 2018 मध्ये हा गुन्हा दाखल आहे. या पथकाने अकोल्यात सलग दोन दिवस तपासणी केली. मात्र, कृषी विभागाकडून अशा कोणत्याही तपासणीची परवानगी दिली गेलेली नसल्याचे समोर आले. कृषिमंत्री सत्तार हे धाडींपूर्वी दोन दिवस अगोदरच अकोला शहरात एका स्थानिक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. तिथे त्यांनी निकृष्ट दर्जाची रासायनिक औषधी, बोगस खते व बियाण्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात सूर आवळला होता. कृषी विभागाच्या धाडसत्रांचे त्यांनी गुणगान केले होते. असे व्यावसायिक, विक्रेत्यांविरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे; तसेच येत्या पावसाळी अधिवेशनात अशा व्यावसायिकांना किमान दहा वर्षांच्या शिक्षेचा कठोर कायदा मंजूर करणार असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी या खासगी कार्यक्रमात जाहीर केले होते.
एकीकडे, सत्तार हे धाडसत्र योजनेचे गुणगान गात असताना दुसरीकडे, त्याच शहरात त्यांच्या पीए मंडळीने घातलेल्या छापेमारेची राज्यभर जोरदार चर्चा झाली. याच कथित धाडीवरून मंत्रिमंडळ बैठकीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची सर्वांसमोर ‘कानउघाडणी’ केली. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. यापुढे कायदेशीर पद्धतीनेच कार्यवाही करा, अधिकाऱ्यांना कामे करू द्या, तुम्ही त्यात लुडबूड करू नका, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना दिली. अकोल्यातील धाडसत्राच्या वेळी कृषी विभागाच्या पथकात खासगी लोकं कशी आली, याचा जाबही विचारला गेला. नाराज मुख्यमंत्र्यांचा चढलेला पारा पाहून सर्व मंत्र्यांसमोरच सत्तार यांनी हात जोडून माफी मागितल्याचे वृत्त “एबीपी माझा” तसेच “दिव्य मराठी”ने दिले आहे.
उपमुख्यमंत्र्यांची नाराजी ; मुख्यमंत्रीही संतप्त
मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. दुपारी दोन वाजता ही बैठक संपल्यानंतर मंत्रिमंडळ सदस्यात अनौपचारिक चर्चा सुरु होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील धाडसत्राचा प्रकार हा त्यांत गंभीर विषय असल्याचे सांगितले. आधीच संतप्त असलेले मुख्यमंत्री त्यावर म्हणाले, “सत्तार, तुम्ही तर सरकारची पत पार धुळीला मिळवायला निघाला आहात. तुमचे हे जे काही चालले आहे, ते आजिबात बरोबर नाही. तुमचा हा बेबंदपणा अतिशय वाईट आहे. तुम्ही तातडीने कारभार सुधारायला हवा!” यावर सत्तार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री आजिबात ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. तुम्ही फक्त सरकारची लाज घालवू नका, बाकी आम्ही पाहून घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बजावले.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇