मुंबई : महोगनीची शेती ही देशातील अनेक शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे. महोगनीची झाडे व्यावसायिक दृष्टिकोनातून मौल्यवान तर आहेच शिवाय ही झाडे कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहेत. कारण या झाडांची पाने, फुले, बिया, साल आणि लाकूड तसेच झाडाच्या प्रत्येक भागाला खूप मागणी असते आणि त्यांना चांगली किंमत देखील मिळते. शेतकरी महोगनी वनस्पतींमध्ये इतर कोणतेही पीक देखील घेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया महोगनी झाडाची वैशिष्ट्ये, लागवड, हवामान व जमीन, महोगनी लागवडीतून उत्पन्न किती मिळते? तसेच महोगनी शेतीतून मिळणारे कार्बन क्रेडिट माहिती.
महोगनी झाडाची वैशिष्ट्ये
महोगनी हे सर्व प्रकारच्या जमिनी तसेच वातावरणात चांगल्या प्रकारे वाढणारी वृक्ष प्रजाती आहे. महोगनी वृक्षाची पाने, फुले, लाकुड, फळ हे बहु उपयोगी आहे. याचा उपयोग कॅन्सर, मलेरिया, एनिमिया व इतर आजारावरील औषधी बनवण्याकरिता होतो. वृक्षाचे वयोमान १०० वर्षा पेक्षा अधिक आहे. महोगनी वृक्षाची उंची १० ते १२ वर्षापर्यंत ६० ते ८० फूटापर्यंत जाते. हे एक आफ्रीकन प्रजाती वृक्ष आहे. महोगनी मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेते.
या झाडापासून 7 वर्षानंतर कार्बन क्रेडीटही शेतकऱ्याला मिळते. महोगनीपासून उच्च प्रतीचे लाकूड मिळते. नैसर्गिक तपकिरी लालसरचा उपयोग हा महागड्या फर्निचर, वाद्य निर्मिती व जहाज बांधणी करता होतो. महोगनी वृक्षाला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मागणी आहे. महोगणी वृक्षामुळे निसर्गाचा बिघडलेला समतोल सुधारण्यास तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारण्यास मदत होते. जागतिक तापमान वाढ कमी करण्यास देखील मदत होते.
महोगनी झाडापासून मिळणारे कार्बन क्रेडिट
महोगनी शेतीचा आणखी फायदा म्हणजे यातून तयार मिळणारे कार्बन क्रेडिट. सध्याच्या पर्यावरणाबद्दल जागृती होत असलेल्या काळात कार्बन क्रेडिटचे महत्व वाढत चालले आहे. प्रदूषण वाढलेल्या विकसित देशांना कार्बन क्रेडिटची आवश्यकता असते. म्हणूनच अनेक कंपन्या कार्बन क्रेडिट विकत घेण्यासाठी उत्सुक असतात. विकसनशील देश आपले कार्बन क्रेडिट विकून त्यातून पैसे कमवू शकतात. महोगनी शेतीचा फायदा असा की, ही झाडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करतात.
अशी करा मोहगनीची लागवड
महोगनी रोपे लावण्यासाठी जून-जुलै हा सर्वोत्तम काळ आहे. तसेच पावसाळा हा वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक असं वातावरण बनतो. मोहगनीची रोपे लावण्यासाठी शेत समतल करावे लागते. त्यानंतर तीन ते चार मीटर अंतरावर तीन फूट रुंदीच्या दोन फूट खोल खड्ड्यांच्या ओळी करून झाडे लावावीत. खड्डे सेंद्रिय व रासायनिक खते मिसळून मातीने भरून हलके पाणी द्यावे. उन्हाळ्यात 5 ते 7 दिवस आणि हिवाळ्यात 10 ते 15 दिवसांनी झाडांना पाणी द्यावे.
वाढत्या झाडांची पाण्याची गरज कमी होत जाते. विकसित झाडांसाठी वर्षभरात 5 ते 6 सिंचन पुरेसे आहे. गरजेनुसार खुरपणी आणि कुंडी करत रहा. एकदा प्रत्यारोपण केल्यावर, महोगनीच्या झाडाला मजबूत आणि टिकाऊ स्वरूप धारण करण्यासाठी सुमारे 12 वर्षे लागतात. सामान्य तापमान असलेल्या भागात महोगनीची लागवड केल्यास वेगवेगळे फायदे मिळू शकतात. महोगनी झाडाची काळजी घेणे खूप सोपे आहे, ते कीटक आणि रोगांना बळी पडत नाही.
महोगनी लागवडीसाठी हवामान आणि जमीन
महोगनी हे डोंगराळ आणि मुसळधार पावसाचे क्षेत्र सोडून कोणत्याही हवामानात घेतले जाऊ शकते. त्यांच्या बियांच्या उगवण आणि विकासासाठी सामान्य तापमान योग्य राहतं. सुरुवातीच्या काळात महोगनी वनस्पतींना अति उष्णता आणि थंडीपासून संरक्षण करावे लागते. परंतु, विकसित झाडे हिवाळ्यात 15 डिग्री सेल्सिअस आणि उन्हाळ्यात 35 डिग्री सेल्सिअस तापमानात वाढतात.
प्रति एकर येतो इतका खर्च
एका एकरात 1200 ते 1500 महोगनी झाडे लावता येतात. त्याची रोपे 25 ते 30 रुपयांपासून 100 ते 200 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. रोपे लावण्यासाठी वापरल्या जाणार्या रोपाचे वय आणि ते कसे विकसित झाले. यासारख्या घटकांवर किंमत अवलंबून असते. याशिवाय खत, मजूर व इतर खर्च जोडल्यास एकरी सरासरी दीड ते अडीच लाख रुपये खर्च येतो. या झाडाची लांबी 40 ते 200 फुटांपर्यंत असते, परंतु भारतात त्याची लांबी फक्त 60 फुटांपर्यंत आढळते. महोगनीमध्ये फांद्या खूप कमी असतात. फक्त वरच्या फांद्या आढळतात. त्यामुळे त्याचे लाकूड अतिशय महागडे आहे ज्याची जाडी 50 इंचपर्यंत असते.
महोगनी झाडाचे लाकूड मजबूत असते आणि खूपकाळ टिकते. हे लाकूड लाल व तपकिरी रंगाचे असून या लाकडावर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. महोगनीच्या झाडाला पाच वर्षातून एकदाच फळ मिळते. त्याचे बी देखील खूप मौल्यवान असते. सुमारे एक हजार रुपये किलो दराने त्याची विक्री होते आणि एका झाडापासून 5 किलो पर्यंत बियाणे मिळू शकते.
महोगनी लागवडीतून उत्पन्न ‘इतके’ मिळते
महोगनीला नुकसान न होता बंपर उत्पन्न देणारे पीक म्हणतात. 10-12 वर्षांनी महोगनीचे एक झाड 20-30 हजार रुपयांना सहज विकले जाते. 500 रोपे लावून बागकाम केल्यास सुमारे 1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. पाच वर्षांतून एकदा उगवणारे त्याचे बियाणे 1000-1200 रुपये किलो दराने विकले जाते. त्याच्या फुलांपासून (महोगनी फ्लॉवर्स) बियाण्यांपर्यंत (महोगनी बियाणे) सर्वकाही खूप मौल्यवान आहे. शेतकऱ्यांना हवे असल्यास ते महोगनीसह भाजीपाल्याची सहपीक शेती करून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.
महोगनी लाकडापासून काय बनवले जाते?
महोगनी वृक्षाचे लाकूड खूप मजबूत आणि टिकाऊ असते आणि ते पाण्यात लवकर कुजत नाही, म्हणून नौका आणि जहाज महोगनी लाकडापासून बनवले जातात. मौल्यवान फर्निचर, महागडी सजावट, शिल्पे इ. सुद्धा बनवली जातात. या झाडाच्या लाकडापासून शस्त्रास्त्रे तयार केली जातात जेणेकरून साधन अधिक मजबूत होईल. तसेच चांगल्या दर्जाचे प्लायवूड, या झाडाच्या बिया आणि फुले औषधी बनवण्यासाठी वापरली जातात.