महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकांकडून शेतकऱ्यांना वखार / गोदाम पावतीवर तारण कर्ज मिळवून देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने शेतमालाची विक्री करावी लागत नाही. हाच शेतमाल काही महिन्यांनी वाढीव दराने विकता येतो. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या गोदमात शेतमाल साठवण केल्यावर शेतकऱ्यांना मिळणारी वखार पावती गहाण ठेऊन किफायतशीर दराने तारण कर्ज सहज उपलब्ध होते.
शेतमाल तारण योजना कार्यपध्दती
शेतकरी नोंदणी
• शेतकरी महामंडळाच्या गोदामास भेट देईल त्यावेळेस महामंडळाचा फार्म नं. 6 चा अर्ज गोदाम धारकास भरून देईल.
• फार्म नं. 6 मध्ये मालाचे वर्णन, मालाचा दर्जा/प्रत, वजन, ठेवीदाराचे नांव, पत्ता पोत्यांची संख्या, माल ठेवलेल्या दिवशीचा बाजार भाव इत्यादी माहिती सादर करेल.
• याव्यतिरीक्त महत्वाची KYC कागदपत्रे गोदाम धारकास सादर करेल.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, वखार / गोदामात मालाची साठवणूक
• महामंडळाच्या गोदामात प्राप्त झालेला माल व फार्म नं. 6 मधील माहिती याची गोदाम धारक पडताळणी करेल.
• त्यानंतर वखार महामंडळाचा गोदाम धारक ठेवीदाराचे नांव. प्राप्त मालाचे वर्णन, पोत्यांची संख्या, मालाचे वजन, गुणवत्ता व प्रचलित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दरानुसार मालाची किंमत इत्यादी बाबी गोदाम पावतीवर नमूद करेल व ठेवीदारास गोदाम पावती देईल.
तारण कर्ज अर्ज प्रक्रिया
• शेतकरी ठेवीदारास साठवणुक मालावर तारण कर्ज घेण्याचे असेल तर असा शेतकरी गोदाम धारकाकडून प्राप्त झालेली गोदाम पावती घेऊन ठेवीदार त्यास ज्या बँकेकडून तारण कर्ज घेणेचे आहे अश्या बँकेकडे गोदाम पावती सादर करेल.
• संबधीत बँक प्राप्त झालेली गोदाम पावती त्यामधील नमूद मालाचे वर्णन, वजन, प्रचलित किंमत लक्षात घेऊन तसेच संबधित कर्ज अर्जदार याची बँकेच्या नियमानुसार पात्रता ठरवेल.
• संबधित शेतकरी ठेवीदार तारण कर्ज मंजूर करण्यास प्रात्र असल्यास अश्या अर्जदारास वखार पावतीवरील नमूद मालाच्या किंमतीच्या 70% पर्यंत कर्ज मंजूर करीत असते, असे कर्ज बँक निहाय वेगवेगळ्या व्याज दराने वितरीत करण्यात येते.
कर्ज मंजूरीची बॅक स्तरावरील प्रक्रिया
• बँकचे अधिकारी ठेवीदाराचे प्राप्त झालेले KYC कागदपत्रे व ठेवीदाराची गोदाम पावती याची छानणी करून व ठेवीदाराची बँकेच्या नियमानुसार तारण कर्जासाठीची पात्रता ठरवून कर्ज वितरीत करीत असतात.
• ठेवीदार शेतकरी तारण कर्जासाठी पात्र असल्यास त्यास तारण कर्जाच्या विविध कागद पत्रांची पुर्तता बँक अटी व शर्तीनुसार करावी लागते. तसेच प्रत्यक्ष तारण कर्ज वितरीत होणेपुर्वी ठेवीदार कर्जदारस गोदाम पावतीवर तारण रक्कमेची नोंद/बोजा गोदाम धारकाकडून नमूद करून घ्यावा लागतो.
• त्यानंतर बँक अधिकारी शेतकरी ठेवीदार यांच्या बँक खात्यावर तारण कर्जाची रक्कम वर्ग करतात.
कर्ज परतफेड व मालाची जावक
• ठेवीदार शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम बँकेस परतफेड केलेनंतर बँक गोदाम पावतीवरील कर्जाची नोंद/बोजा रद्द करणेबाबत रीतसर गोदाम धारकास ना-हरकत प्रमाणपत्र देतात.
• त्यानंतर संबधित ठेवीदार आपल्या गोदाम पावतीवरील नमूद माल गोदामाचे भाडे अदा करून त्रयस्थ पक्षकारास विक्री अथवा हस्तांतरीत करू शकतो.
वखार गहाण पावतीवर २७२ कोटी रुपयांचे तारण कर्जाचे वितरण : तावरे
शेतमाल तारणाच्या वखार पावतीवर तारण कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात २७२ कोटी रुपयांचे तारण कर्ज वितरण करण्यात आले आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित शेतकऱ्यांना घर बसल्या काही क्षणात हे कर्ज उपलब्ध होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली. ही योजना अधिकाकाधिक शेतकरीभिमुख व्हावी यासाठी व्हर्ल फिनटेक सोबत सामंजस्य करार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य वखार महामंडळाची राज्यात विविध ठिकाणी गोदामे असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य तसेच शेतमाल, औद्योगिक मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येते. गोदामातील साठवणुकीवर वखार पावती देण्यात येते. सदर वखार पावती वखार अधिनियम, 1960 नुसार पराक्रम्य असून त्यावर बँकेमार्फत तारण कर्ज उपलब्ध होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना काही अडचणी आल्या किंवा शेतमालास योग्य किंमत मिळत नसल्यास नजीकच्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता यावी आणि प्राप्त गोदाम पावतीवर ऑनलाईन पद्धतीने तारण कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली होती.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने तारण कर्ज देणे, त्याची परतफेड, सध्याचा बाजार भाव, उपलब्ध अन्न धान्य साठा या सर्व गोष्टी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन होणार असल्याने शेतकऱ्याचा मोठा फायदा होणार आहे आणि ऑनलाईन तात्काळ कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकरी बांधवांची वेळेची बचत तसेच कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदतच झाली.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
मंत्रीमंडळ बैठक : अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही नियमित कर्जफेडीसाठी 50 हजारांच्या अनुदानाचा लाभ; इतरही Farmers Relief निर्णय जाणून घ्या…
अतिवृष्टीने कपाशीचे नुकसान; काय राहू शकतात कापूस दर? सविस्तर जाणून घ्या
Comments 2