नवी दिल्ली : एकीकडे देशभरात कोरोना विषाणूने मानवामध्ये केलेला कहर ओसरत असताना दुसरीकडे आता पाळीव प्राणी धोकादायक विषाणूच्या विळख्यात आले आहेत. उत्तर भारतात जनावरांमध्ये “लम्पी स्कीन व्हायरस”ची साथ आली आहे. राजस्थानमध्ये या आजाराने जनावरांचे मृत्यू होऊ लागल्याने पशुमालक अस्वस्थ झाले आहेत. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात जनावरांमध्ये हा लम्पी स्किन नावाचा विषाणू वेगाने पसरत आहे. या विषाणूमुळे गायी, बैल आणि इतर प्राणी आजारी पडत आहेत, ज्यामध्ये संसर्ग झालेल्या प्राण्याजवळ आल्यावर इतर प्राण्यांनाही सतत संसर्ग होत आहे. विषाणू संक्रमणाचा गायींवर सर्वाधिक परिणाम होत आहे. गेल्या 3-4 वर्षांपासून देशाच्या विविध भागात सातत्याने डोके वर काढत असलेल्या “लम्पी व्हायरस”वर अद्याप कोणताही इलाज नाही. लहान वासरांमध्ये फैलावाची व रोगाची अधिक तीव्रता दिसून येते. प्रामुख्याने सर्व वयोगटातील संकरीत व देशी गाय वर्ग, म्हैस वर्गातील पशुधनास या विषाणूजन्य साथरोगाची लागण होऊ शकते.
हा आजार शेळ्या-मेंढ्यांना होत नाही. आतापर्यंत तरी झालेला आढळून आलेला नाही. लंपी आजाराचा प्रादुर्भाव उष्म व दमट हवामानात किटकांची वाढ जास्त प्रमाणात आणि पावसाळ्यात अधिक प्रमाणात व हिवाळ्यात कमी प्रमाणात दिसतो.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇🏻
राजस्थानात पशुपालक, भाजपा कार्यकर्त्यांची आंदोलने
या विषाणूचा सर्वाधिक परिणाम गायींवर होत आहे. गायींच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाहता राजस्थानातील काही जिल्ह्यात पशुपालक व भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बाधित जनावरांवर तातडीने उपचार करून विषाणू साथीचा फैलाव रोखण्यासाठी पावले उचलण्याची मागणी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येत आहे. एरव्ही या साथरोगाची पशुधनास बाधा होण्याचे प्रमाण दहा ते वीस टक्के तर लागण झालेल्या जनावरांना मृत्यू होण्याचे प्रमाण एक ते पाच टक्के एवढे असते. मात्र, राजस्थानातील सध्याच्या साथीत हे प्रमाण कितीतरी अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
उपाय शोधण्याची पशुपालक समितीची मागणी
राजस्थानात बाडमेरसह संपूर्ण मारवाड परिसरात दररोज शेकडो गायींना या विषाणूची लागण होत आहे. या आजारावर अद्याप कोणताही इलाज नाही, ही देखील चिंतेची बाब आहे. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या आजारावर लवकरात लवकर उपचार शोधून काढून जनावरांवर उपचाराची तयारी सुरू करावी, अशी मागणी समितीकडून होत आहे. या विषाणूच्या फैलावाला त्वरित रोखले नाही तर राज्यात जनावरांच्या मृत्यूची संख्या वाढू शकते.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇🏻
पीएम किसान योजना : फक्त सहा हजार रुपयेच नाही, तर आणखीही दोन महत्त्वाचे फायदे! काय ते जाणून घ्या…
बाधित जनावरांची लक्षणे ओळखून वेळीच उपचार आवश्यक
याआजाराने बाधीत झालेल्या जनावरांच्या डोके, मान, पोट, पाठ, पाय, मायांग, कासेच्या भागात तसेच शेपटी खाली त्वचेवर कमी अधिक प्रमाणात 10-50 मिमी व्यासाच्या गाठी येतात. काही जनावरांत ग्रंथीला सूज, पुढील व मागील पायावर पायावर सुज येणे, जनावर लंगडणे अशीही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. काही दिवसांनी गाठीमधून पू बाहेर येऊ शकतो. नाकाच्या व तोंडाच्या आतील भागामध्येही गाठी आढळून येतात. जनावरांत ताप येतो, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव गळणे, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसतात. रोगी जनावरे अशक्त होतात, दूध उत्पादनात घट, गर्भपात, प्रजनन क्षमता घट, त्वचा खराब होते. योग्य उपचार झाल्यास यामध्ये जनावर दगावण्याचे प्रमाण कमी राहू शकते.
लम्पी स्कीन व्हायरसमुळे अशाप्रकारे होतो जनावरांचा मृत्यू
लम्पी स्किन व्हायरस नावाचा हा आजार असुरक्षित प्राण्यांमध्ये झपाट्याने पसरत आहे. या आजाराचा प्रसार एका बाधीत पशूधनापासून दुसऱ्या पशूधनाला डास, चावणाऱ्या माशा व गोचीड यांच्यामार्फत होतो. या विषाणूची लागण झाल्यानंतर प्रथम जनावरांमध्ये तापाची लक्षणे दिसतात आणि नंतर त्वचेवर गाठी-गाठी निर्माण होऊ लागतात. त्यामुळे जनावरे खाणे व पाणी पिणे बंद करतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास त्यातून नंतर जनावरांचा मृत्यू होतो. यावर अजूनही प्रतिबंधात्मक लस किंवा योग्य उपचार उपलब्ध नाही. सध्या या आजारावर इलाज नसला तरी रोगाच्या नियंत्रणासाठी आजारी जनावरांच्या संपर्कातील जनावरांना आयव्हरमेक्टीन इंजेक्शन दिल्यास किटक नियंत्रण होऊ न रोग प्रसारण काही प्रमाणात आळा घालू शकतो, असा पशुतज्ज्ञांचा दावा आहे.
आपल्या गोठ्यात जनावरांमध्ये लक्षणे दिसल्यास हे उपाय करा
रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी रोगाचा प्रसार करणारे कीटाणू जसे डास, माशा व गोचीड यांचे निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. या आजारावर नियंत्रणांसाठी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. हवेशीर वातावरण ठेवावे, गोठा परिसरात पाणी, डबके, साठणार नाही याची काळजी घ्यावी. बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या साहित्याचे, वाहनांचे तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करावे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडीयम हायपोक्लोराईड द्रावण वापरावे. घरच्या घरी कीटकनाशक बनविण्यासाठी एक लीटर पाण्यात 40 मिली करंज तेल, 40 मिली नीम तेल आणि 10 ग्राम अंगाला लावण्याचा साबण हे सगळे चांगले मिसळून घ्यावे. हे द्रावण तीन दिवसांआड असे तीन वेळा पशुधनावर फवारल्यास आपल्या गोठ्यामध्ये सर्व प्रकारच्या कीटकांचे निर्मूलन होते व रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत होऊ शकते. तरीही बाधित जनावर आढळल्यास, बाधीत जनावरांना वेगळे करावे, बाधीत व निरोगी जनावरे एकत्रित चारावयास सोडू नये. रोगग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेह आठ फूट खड्डा खणून त्यात पुरावे.
Lumpy skin virus spreading in animals, farmers in Rajasthan upset due to death of cows of due to Lumpi infection outbreak
Comments 2