जळगाव : राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश पाठोपाठ सध्या महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील पशुपालक सध्या चिंतेत आहेत. नेमका याचा रोग प्रसार कसा होतो?, या आजाराची लक्षणे काय आहेत, पशुपालकांनी घ्यावयाची काळजी?, या आजारावरील उपचार, लम्पी आजारावरील प्रतिबंधक लस हे जाणून घेऊ या.
मधाचा गोडवा अन् रोजगाराचीही संधी ; असा घ्या मधकेंद्र योजनेचा लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/TgyUpPxd5Ao
लम्पी स्किन डिसीज म्हणजे काय?
युरोपीयन अन्न सुरक्षितता प्राधिकरण अर्थात ईएफएसएने (EFSA) दिलेल्या माहितीनुसार, लम्पी स्किन डिसीज हा एक विषाणूजन्य रोग असून, तो जनावरांना होतो. या आजाराचा प्रसार माश्या, डास, गोचीड यांसारख्या कीटकांद्वारे होतो. एलएसडी हा लम्पी स्किन डिसीज व्हायरसमुळे होतो. हा पॉक्सिव्हिरिडी कुळातला कॅप्रीपॉक्सव्हायरस आहे, अशी माहिती वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ अर्थात डब्ल्यूओएएचने दिली आहे.
असा होतो रोगप्रसार
या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सीस), डास (अडीस), गोचीड, चिलटे (कुलीकॉईडीस) यांच्या मार्फत होतो. तसेच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते १- २ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळयातील पाणी व तोंडातील लाळेतुन विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दुषित होतो. त्यातून इतर जनावरांना या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ (३५ दिवस) जिवंत राहू शकतात. विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो. गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो.
लम्पी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे काय?
या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो.
जनावरे चारा खाणे, पाणी पिण्यास कमी होतात.
हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात.
डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
पायावर तसेच कानामागे सूज येते.
जनावरे दूध देण्यास कमी पडतात.
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी?
सात दिवसांच्या नियमित योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो.
लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये.
लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.
बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी 8 ते 9 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.
जनावरांमधून माणसांमध्ये हा आजार पसरत नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी या जनावरांचे दूध वापरात आणू नये असाही सल्ला दिला जात आहे. लम्पी आजारात जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण जरी कमी असले तरी दुध उत्पादनावर परिणाम होत असल्याने पशुपालकांनी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.
‘या’ आजारावरील उपचार
जखमेच्या बाहेरील भागावर पुतिनाशक लावल्यास जखम भरून येण्यास व त्यावरती माश्या बसण्यास प्रतिबंध होतो.
सर्वसामान्य व स्वस्त उपाय म्हणजे जखम स्वच्छ करून घेऊन त्यावरती कोल टार व कॉपर सल्फेटचे ५:१ द्रावण लावणे.
सावधगिरी अ) जास्त दूध देणा-या दुभत्या गाई व विलायतीतील ब) दोनदा प्रतिबंधक लसीकरण सहा महिन्यांच्या अंतराने करण्यात यावे. त्यानंतर प्रत्येक वर्षी एक लसीकरण करणे आवश्यक आहे.
रोगाची लागण झालेली जनावरे कळपातून वेगळी करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपल्या जवळील पशुवैद्यकीय डॉक्टरांना तत्काळ बोलावणे.
ब्लिचिंग पावडर किंवा जंतुनाशक कार्बनिक आम्लाद्वारे जनावरांच्या रोगाची लागण झालेल्या जनावरांची काळजी घेणा-या व्यक्ती, वापरण्यात येणारी उपकरणे ही वेगवेगळी असावीत. त्यांचा निरोगी जनावरांशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच, ही उपकरणे योग्यरीत्या स्वच्छ व निर्जतुकीकरण करावीत.
अतिरिक्त पशुखाद्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
लंपीवरही स्वदेशी लस
आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक पाऊले उचलली जात आहेत. मध्यतंरी कोरोनावर मात करणा-या भारतीय लसीच्या मोठ्या यशानंतर आता जनावरांच्या लंपी आजारावर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस विकसित केली आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते ग्रेटर नोएडा येथील वर्ल्ड डेयरी समिटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
आफ्रिकेतून ‘लम्पी’चा उगम
‘लम्पी’ त्वचा रोग हा रोग इ.स. १९२९ पासून १९७८ पर्यंत मुख्यत्वे आफ्रिकेत आढळत होता. त्यानंतर इतर देशात त्याने शिरकाव केला. सन २०१३ नंतर या रोगाचा वेगाने सर्वदूर प्रसार झाला आणि आता हा रोग अनेक युरोपीय आणि आशियाई देशात पसरला आहे. भारतात ‘लम्पी’ त्वचा रोगाची पहिली नोंद ऑगस्ट २०१९ मध्ये ओरिसा राज्यात झाली. त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ राज्यात या आजाराचा शिरकाव झालेला आढळून आला. महाराष्ट्रात प्रथम या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यात (सिरोंचा) मार्च २०२० या महिन्यापासून झाला होता. नंतर विदर्भ आणि मराठवाडा भागातील काही जिल्ह्यात सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. या वर्षी गुजरात राज्यामधील काही जिल्ह्यामध्ये प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाला आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
- पशुधनावरील लम्पी स्कीन व्हायरसची साथ आली महाराष्ट्रात, राज्यातील पहिला मृत्यू पुणे जिल्ह्यात ; “ॲग्रोवर्ल्ड”ने महिनाभरापूर्वी केले होते खबरदार
Comments 4