मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्र व मध्य भारतात चांगला पाऊस पडण्याचे अनुमान आहे. आज मात्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुण्यात मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, विदर्भातील बाराही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसात अतिवृष्टी नोंदविली गेली आहे.
पीक विमा आता फक्त एक रुपयात ; असा करा अर्ज..
https://eagroworld.in/crop-insurance-now-only-for-one-rupee-apply-like-this/
बंगालच्या उपसागरात 15 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर आता 19 जुलै रोजी पुन्हा एक चक्रीवादळ तयार होण्याचे अनुमान आहे. बंगालच्या उपसागरातील या बदलत्या स्थितीमुळे महाराष्ट्राच्या काही भागात तसेच मध्य भारतात येत्या 2-4 दिवसात पाऊस वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, आज राज्याच्या अनेक भागात, विशेषत: उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आकाश दिवसभर ढगाळ राहील. मात्र, ढगातून पाऊस पडण्याचे प्रमाण म्हणजेच अपक्षेपण/वर्षण (प्रेशिपिटेशन) कमी असल्याने या भागात चांगल्या पावसाची फारशी शक्यता नाही.
निर्मल रायझामिकाच्या बीज प्रक्रियेचे फायदे👇
पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता
पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे, की पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. हवामान खात्याने काल मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा दिला. कोकण व विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. चंद्रपूरमध्येही जोरदार पाऊस झाला.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलोजी (IITM) या संस्थेतील हवामान अभ्यासक गोकुळ तमिलसेल्वम यांनी मात्र कमी दाबाच्या पट्ट्याबाबत वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये फरक असल्याचे म्हटले आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाब प्रणाली जसजशी विकसित होईल, पावसाचे अंदाज अधिक स्पष्ट होतील, असे तमिलसेल्वम यांनी म्हटले आहे. हवामान संशोधन आणि सेवा विभागातील पुणे येथील शास्त्रज्ञ सखा सानप यांनीही मॉन्सून सक्रिय होण्यासाठी वातावरण अनुकूल असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्यात 18-19 जुलैपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
“आयएमडी”ने दिलेले आजचे पावसाचे जिल्हानिहाय पूर्वानुमानित अलर्ट
ऑरेंज अलर्ट : पुणे.
यलो अलर्ट : ठाणे-मुंबई, संपूर्ण कोकण, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण विदर्भ.
ग्रीन अलर्ट (पावसाचा कोणताही विशेष इशारा नाही; रिमझिम, हलका ते काही ठिकाणी मध्यम पाऊस शक्य) : पालघर, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली.