साधारणपणे आडसाली ऊस लागवडीच्या 75 ते 80 टक्केच उगवण होते. एक डोळा पद्धतीमध्ये 100 टक्के उगवण होणे गरजेचे असते. आपण नांग्या पडल्या नंतर कांडी लावतो. परंतु आधी केलेल्या लागणीचा ऊस वाढल्याने नंतर लावलेल्या कांड्याची उगवण होईल, परंतु एकसारखी वाढ मिळणार नाही किंवा बाहेरून रोपे विकत घेऊन नांग्या भरण्याचा प्रयत्न केला जातो.
तातडीच्या स्थितीमध्ये चांगल्या प्रतीची रोपे उपलब्ध होत नाहीत. तसेच खर्चातही वाढ होते. त्याऐवजी आपल्या शेतात 25 टक्के जादा रोपे तयार करून घेणे फायद्याचे ठरते.
त्यासाठी ऊस लागवड करतानाच पहिल्या चार ओळींत ठरविलेल्या अंतरानुसार लागवड केल्यानंतर प्रत्येक पाचव्या ओळीला दोन टिपऱ्यांच्या मध्ये एक डोळ्याचे जादा टिपरे लावावे.
अशा प्रकारे आपल्याच शेतात जादा कष्ट न करता 25 टक्के जादा ऊस रोपे तयार होतील. या अतिरिक्त रोपांची लागवड डोळे न उगवल्याने पडलेल्या नांग्या/ तुटाळ / गॅप यामध्ये 25 ते 30 दिवसांनंतर करावी. आपण रोपांची लागवड करणार असल्यास, पहिल्या नऊ ओळींनंतर दहाव्या ओळीला (10 टक्के) दोन्ही रोपांमध्ये एक जादा रोप अवश्य लावावे.
रोग-कीड प्रादुर्भाव किंवा अति पावसाने रोपे जळून गेल्यास नांग्या भरण्यासाठी यापैकी एक आड एक रोप काढून त्याचा वापर करता येईल. नांग्या पडल्या नसतील तर ही एक आड एक रोपे काढून टाकावीत.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
Comments 1