मुंबई : हिवाळा म्हटला की, अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी स्वेटर, शेकोटी यांसारख्या साधनांचा वापर केला जातो. माणूस थंडीपासून आपले संरक्षण करू शकतो, मात्र गाय, म्हैस, बैल, रेडा, शेळी यांसारख्या प्राण्यांचे काय? त्यांना थंडी वाजत नाही का? असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. परंतु, माणसाला ज्या प्रमाणे थंडीमुळे त्रास होतो, तसा त्रास जनावरांना देखील होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात त्यांची काळजी घेणे तितकेच महत्वाचे असते. आजच्या या लेखात आपण थंडीच्या दिवसात कशी काळजी घ्यावी, अतिथंडीमुळे जनावरांवर काय परिणाम होतात. यासारख प्रश्न समजून घेणार आहोत.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
हिवाळ्यात सरासरीपेक्षा कमी तापमान, भरपूर पाण्याची उपलब्धता, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता राहते. त्यामुळे हे वातावरण जनावरांच्या आरोग्य व प्रजननास फायदेशिर असतो, तसा त्रासदायकही ठरतो. हिवाळ्यात दुधाळ जनावर पान्हा व्यवस्थित सोडत नाही त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या प्रतिवरही परिणाम होतो. जनावरांच्या त्वचेला भेगा पडतात. अतिथंडीत सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते. अतिथंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात किंवा काही जनावरे लंगडतात. त्यामुळे या काळात गाय, म्हैस, बैैल, रेडा यांसारख्या जनावरांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
अशी घ्या काळजी
थंडीच्या दिवसात जनावरे पाणी कमी पितात. त्यामुळे त्यांची पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असते. त्यामुळे जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे. हिवाळ्यात जनावरांच्या त्वचेला भेगा पडतात. त्यामुळे त्वचा खरबडीत होवून खाज सुटते म्हणून त्यांच्या त्वचेला एरंडीचे तेल किंवा पेट्रोलियम जेली लावावे, जेणेकरून त्वचा नरम राहील व भेगा पडणार नाहीत. अतिथंडीत सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते. सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नये म्हणून ग्लिसरीनचा किंवा पेट्रोलियम जेलीचा वापर करावा. दूध दोहनावेळी कास धुण्यासाठी गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.
अशी करा उपाययोजना
थंडीच्या दिवसात जनावरांना मुक्त संचार गोठ्यामध्ये ठेवू नये. अशा वेळी जनावरे बंदीस्त गोठ्यात बांधावीत. बाहेरील थंड हवा आत येणार नाही यासाठी गोठ्याच्या खिडकीस रिकाम्या पोत्यांचे किंवा गोणपाटांचे पडदे लावावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये बंद ठेवावेत. उबदारपणा रहावा यासाठी गोठ्यात इलेक्ट्रिक हिटर किंवा जास्त वॅटचे बल्ब लावावेत. जनावरांना बसण्यासाठी भाताचे किंवा गव्हाचे काड, भुसाच्या सहाय्याने गादी तयार करावी. दुपारी ऊन असताना गरम-कोमट पाण्याचा वापर करून जनावरांची अंघोळ करावी.
उर्जा मिळेल असे द्या खाद्य
हिवाळ्यात जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी खनिज मिश्रणाचा समावेश असलेले व जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे. गाय, म्हशीने व्यवस्थित पान्हा सोडावा, यासाठी कास धुण्यासाठी आणि वासरांना धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. हिवाळ्यात जनावरांनी भरपूर पाणी प्यावे, यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. दुपारच्या वेळेस जास्तीत जास्त पाणी पिण्यास द्यावे.
अति थंडीमुळे बहुवर्षीय चारा पिकांची वाढ हळूहळू होते. त्यामुळे लसूणघास, बरसीम, चवळी यासारख्या हिवाळ्यात वाढणार्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन करावे. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा. जनावरांची एवढी जरी काळजी घेतली तरी आपण जनावरांचे थंडीपासून संरक्षण करुन त्यांचे आरोग्य चांगले ठेवू शकतो.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇