वरई, वरी, कुटकी या पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील अतिपावसाच्या उप-पर्वतीय विभाग, पश्चिम घाट विभाग आणि कोकण विभागातील डोंगर उताराच्या जमिनीवर केली जाते.
पूर्वमशागत
जमिनीची खोल नांगरट करुन उभ्या आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन 4 ते 5 टन शेणखत/कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाचे धसकटे, काडीकचरा व बहुवार्षिक गवताचे अवशेष वेचून शेत स्वच्छ करावे.
सुधारित वाण
1. फुले एकादशी हे वाण 120 ते 130 दिवसांमध्ये परिपक्व होते. याची उत्पादकाता हेक्टरी 11 ते 12 क्विंटल असते. हे उशीरा पक्व होणारे व उंच वाढणारे वाण आहे.
2. कोकण सात्विक हे वाण 115 ते 120 दिवसांमध्ये परिपक्व होते. याची उत्पादकाता हेक्टरी 18 ते 20 क्विंटल असते. हे मध्यम पक्वता व अधिक उत्पादकता देणारे पिक आहे.
बियाणे व पेरणीची पद्धत पेरणीची/लावणीची वेळ
या पिकाचा खरीप हा प्रमुख हंगाम आहे. बियाणे पेरणी पावसाचे आगमन होताच अथवा पाण्याची सुविधा असल्यास जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी. पिकाची लागवड मुख्यत्वे रोप लागण पद्धतीने केली जाते. रोप लागण पद्धतीने लागवड करायची असल्यास 4 ते 5 किलो बियाणे/हेक्टरी वापरावे. रोपवाटिका करताना गादीवाफे तयार करून त्यावर बियाणे ओळीमध्ये पेरून घ्यावे. बियाणे 1 ते 1.5 से. मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी म्हणजे उगवण चांगली होते.
बीज प्रक्रिया
बियाणे पेरणीपूर्वी ‘अझोस्पिरिलम ब्रासिलेंस’ आणि ‘अस्पर्जीलस अवामोरी’ या जिवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाण्यास 25 गॅम प्रमाणे करावी.
रोप लावणी पद्धत
गादी वाफ्यावर रोपे 20 ते 25 दिवसांची झाल्यानंतर शेतामध्ये रोपांची पुनर्लागण करावी. रोपलागण करताना दोन ओळीमधील अंतर 30 से.मी. (एक फूट) व दोन रोपामंधील अंतर 10 से.मी. ठेवावे.
खत व्यवस्थापन
पेरणीपूर्वी एक महिना अगोदर शेणखत अथवा कंपोष्ट खत 5 ते 10 टन प्रति हेक्टर या प्रमाणे जमिनीत मिसळून द्यावे. या पिकासाठी रासायनिक खताची मात्रा 40 किलो नत्र, 20 किलो स्फूरद आणि 20 किलो पालाश प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे. अर्धे नत्र व संपूर्ण पालाश व संपूर्ण स्फुरद मात्रा पेरणी करताना द्यावी व उरलेले अर्धे नत्र पेरणी नंतर एक महिन्याने द्यावे.
आंतरमशागत
पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकाची वाढ संथ गतीने होत असल्याने तणे पिकाशी स्पर्धा करतात.त्यामुळे तण नियंत्रणासाठी एक कोळपणी करुन गरजेनुसार एक महिन्याच्या आत एक खुरपणी करावी.
आंतरपिके शिफारस
पिकाचे अधिक धान्य उत्पादन आणि निव्वळ नफा मिळविण्यासाठी उप-पर्वतीय विभागात वरी/ वरई पिकामध्ये कारळा 4:1 या प्रमाणात आंतरपीक घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पीक संरक्षण, खोडमाशी कीड व्यवस्थापन
पेरणीनंतर पीक 6 आठवड्याचे असताना खोडमाशीचा प्रादुर्भाव सुरु होतो. या किडीच्या अळीद्वारे मुख्य खोडाचे नुकसान होऊन मर होते. त्यामुळे फुटव्यावर परिणाम होतो. सर्वाधिक नुकसान जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जाणवते.
उपाययोजना
पावसाळा सुरु होताच 7 ते 10 दिवसांच्या आत पेरणी करावी. तसेच पेरणीकरिता जास्त बियाणे वापरावे.
काढणी व मळणी
पिकाच्या विविध वाणानुसार पक्वता कालावधी वेगळा असू शकतो. साधारणपणे 100 ते 120 दिवसांत पीक काढणीस सुरुवात करावी. काढणीस उशीर झाल्यास कणसातील/बोंडातील दाणे झडण्याची शक्यता असते. पिकाची काढणी करताना कणसे/बोंडे विळ्याने कापून करावी. दोन-तीन दिवस उन्हात चांगली वाळल्यानंतर कणसे बडवून मळणी करावी. धान्य उन्हात चांगले वाळवून हवेशीर जागी साठवण करुन ठेवावे.
उत्पादन
वरी/कुटकी पीक हे लागवड करताना वापरण्यात येणाऱ्या सुधारित निविष्ठा व तंत्रज्ञानास उत्तम प्रतिसाद देणारे C4 वर्गातील पीक आहे. या पिकापासून सरासरी हेक्टरी 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर धान्य उत्पादन घेता येते.
– दत्तात्रय कोकरे
विभागीय संपर्क अधिकारी, कोल्हापूर.
(संदर्भ : अखिल भारतीय समन्वीत नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपयुक्त वरई अर्थात उपवासाची भगर
- कांद्याला या बाजार समितीत मिळतोय असा दर ; वाचा आजचे बाजारभाव