पॅसिफिक आणि हिंदी महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या उबदार तापमानामुळे पुढील महिन्यात काही दिवस, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. एल-निनो किंवा ला-निना प्रभावाच्या साथीने इंडियन निनोच्या प्रभावातून हे बदल संभवतात. यापूर्वी, 2015 मध्ये अशी स्थिती उद्भवली होती. यंदा तिची पुनरावृत्ती होण्याचे अनुमान आहे.
एल-निनो वर्षांमध्ये अनेकदा सरासरीपेक्षा जास्त मान्सूनचा पाऊस पडतो, असे रेकॉर्ड दाखवतात. अलिकडच्या वर्षांत ईशान्य मोसमी पावसाचे प्रमाण वाढले आहे, परंतु त्याचे कारण अस्पष्ट आहे. नोव्हेंबरमध्ये पाऊस पडण्यापूर्वी हवामान मॉडेल ऑक्टोबरमध्ये कमी पाऊस दर्शवतात.
2015 मधील मान्सूनच्या पुनरावृत्तीची शक्यता
2015 मध्ये, अभूतपूर्व पावसामुळे चेन्नईमध्ये पूर आला होता. तेव्हा हवामानशास्त्रज्ञांना पश्चिम हिंदी महासागरातील उबदार समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, इंडियन निनो किंवा इंडियन ओशन डीपोल (IOD) किंवा पूर्व पॅसिफिकमधील एल-निनो हे त्याचे एक कारण सांगितले होते. यंदा पॅसिफिक आणि हिंदी महासागरातील पाणी पुन्हा उष्ण झाल्याने आठ वर्षांपूर्वीच्या मान्सूनची पुनरावृत्ती होईल की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
नोंदी दाखवतात, की 1990 पासूनच्या नऊ एल-निनो वर्षांपैकी सहा वर्षांमध्ये ईशान्य मोसमी पाऊस जास्त होता आणि काही वर्षांमध्ये सकारात्मक भारतीय निनो अनुकूल होता. मजबूत एल-निनो स्थिती 1997 आणि 2015 मध्ये दिसून आली. त्यावेळी चेन्नईत अनुक्रमे 1,571 आणि 1,864 मिलिमीटर पाऊस पडला होता. तामिळनाडू राज्यातही या दोन्ही वर्षांत सरासरीच्या दुप्पट पाऊस होता.
सकारात्मक IOD सह, पुढील महिन्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेला केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीवन यांनी दुजोरा दिला आहे. या स्थितीत दररोज पाऊस पडू शकत नाही; परंतु जेव्हा, जिथे पाऊस पडतो, तेव्हा तो जोरदार असू शकतो. दक्षिण-हिंद महासागरावरील पूर्वेकडील वारे सध्याच्या ईशान्येकडील प्रदेशांना जोडत असल्याने अतिरिक्त मान्सूनच्या पावसात अल-निनो योगदान देईल. इंडियन निनो हवेत आर्द्रता वाढवेल, ज्यामुळे पावसाला हातभार लागेल. आयएमडीच्या प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राचे संचालक एन सेंथामराय कन्नन यांनीही या एल-निनो वर्षांत नोव्हेंबर महिन्यात दक्षिणेकडील राज्यात पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 14 ऑक्टोबरपासून पाऊस
दरम्यान, आगामी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे. एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स 13 ऑक्टोबर संध्याकाळपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. ही प्रणाली दीर्घकाळ राहणार असून 17-18 ऑक्टोबरपर्यंत उत्तर भारतावर परिणाम करेल. त्यामुळे उत्तर भारतात पाऊस आणि बर्फ पडेल. मैदानी भागात 14 ते 18 ऑक्टोबर दरम्यान काही घडामोडी पाहायला मिळतील. पंजाब आणि हरियाणात 14 ऑक्टोबरपासून पाऊस सुरू होईल.
रिटर्न मान्सून क्लिअरन्स 18 ऑक्टोबरनंतरच
त्यानंतर, 15 ऑक्टोबरच्या सुमारास, पावसाचा प्रसार आणि तीव्रता वाढेल. या काळात राजस्थान आणि अगदी दिल्लीचा भाग व्यापेल. 16 ऑक्टोबरच्या आसपास, जैसलमेर, बारमेर आणि फलोदीसह पश्चिम राजस्थानच्या काही भागांमध्येही पावसाची शक्यता राहील.
17 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात पाऊस पडू शकतो. रिटर्न मान्सून क्लिअरन्स 18 ऑक्टोबरनंतरच दिसेल. शिवाय, आणखी एक कमकुवत प्रणाली 19 ऑक्टोबर रोजी येत आहे.
पाऱ्यात असामान्य मोठी चढ-उतार
दिल्लीत रात्रीच्या तापमानात पुन्हा एकदा घट झाली आहे. किमान तापमान 16.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. आदल्या दिवसाच्या तुलनेत थेट 3 अंश से. कमी आहे. तसेच हे किमान तापमान सामान्यपेक्षा 5 अंश सेल्सिअस कमी आहे. मान्सूनने माघार घेतल्यानंतर काही दिवसांतच पाऱ्यात एव्हढी मोठी चढ-उतार ही काही फराशी सामान्य घटना नाही. या चढ-उताराच्या चक्राची पुनरावृत्ती येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान रात्रीचे तापमान पुन्हा वाढेल. ऑक्टोबरमध्ये क्वचितच तापमान 20°C च्या खाली जाते. या किमान तापमानाची सामान्य श्रेणी 22-23°C असते आणि महिन्याच्या शेवटी 16-17°C पर्यंत घसरते. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीत आकाश ढगाळ असण्याची शक्यता आहे, मधूनमधून पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. 18 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा तापमानात घट आणि हवेत गारवा येण्याची शक्यता आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- विदर्भ-मराठवाड्यात “स्मार्ट कृषी”साठी जिल्हानिहाय टार्गेट मर्यादा काढली; आता सर्व एफपीसीना मिळणार कर्ज
- रब्बी ज्वारी आणि पीक फेरपालट