मुंबई : भारतीय हवामान खात्याने आजच्या मुसळधार पावसासाठी अलर्ट जारी केला आहे (IMD Alert). त्यानुसार, आज कोकण-कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट तर विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आहे. कोकणात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या चार जिल्ह्यात आज “आयएमडी”ने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुणे वेधशाळेतील हवामान संशोधन विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी पुढील 4-5 दिवस कोकण व लगतच्या मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या भागात ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, विदर्भातही दोन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, असे होसाळीकर यांचे अनुमान आहे.
आजचे अलर्ट
ऑरेंज अलर्ट : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा
यलो अलर्ट : रायगड, पुणे, संपूर्ण विदर्भ
ग्रीन अलर्ट (पावसाचा कोणताही इशारा नाही) : नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली