मुंबई : नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी फवारणीसाठी स्प्रेल्यूशन म्हणून इफको (IFFCO) 2,500 कृषी ड्रोन (Agri Drones) खरेदी करणार आहे. नॅनो खते आणि संबंधित युटिलिटिजसह शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोन घेऊन जाण्यासाठी इफको 2500 इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर लोडरदेखील खरेदी करणार आहे.
इफको म्हणजेच भारतीय शेतकरी खत सहकारी (IFFCO) कंपनीने ‘इफको किसान ड्रोन’ कार्यक्रमांतर्गत हे 2,500 ड्रोन खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे, नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी (डायमोनियम फॉस्फेट) फवारणी सोपी आणि प्रभावी होऊ शकेल. ड्रोन फवारणीसाठी इफकोने नियुक्त केलेले देशभरातील 5,000 गावपातळीवरील ग्रामीण उद्योजकांना (VLE) प्रशिक्षित केले जाईल.
पीक विमा आता फक्त एक रुपयात ; असा करा अर्ज..
https://eagroworld.in/crop-insurance-now-only-for-one-rupee-apply-like-this/
~IFFCO चे Agri Drones करतील रोज 20 एकर फवारणी
तांत्रिक क्षमता, उत्पादन क्षमता, उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता प्रक्रिया, प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि पायाभूत सुविधांसाठी, इफकोने दिल्लीतील ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. नॅनो खतांच्या फवारणीसाठी इफकोकडून खरेदी करण्यात येत असलेल्या कृषी ड्रोनची तांत्रिक वैशिष्ट्ये उद्योग मानकांनुसार असल्याचे ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाने तांत्रिक पाहणीनंतर स्पष्ट केले आहे. नॅनो फर्टिलायझर्स, वॉटर-सोल्युबल फर्टिलायझर्स (WSF), सागरिका आणि ॲग्रोकेमिकल्स सारख्या जैव-उत्तेजकांची एक ड्रोन दररोज 20 एकर क्षेत्रात फवारणी करू शकेल, अशी इफकोला अपेक्षा आहे.
सेंद्रिय स्लरी शेतीसाठी अमृत 👇
https://eagroworld.in/amrit-for-organic-slurry-farming/
ड्रोनद्वारे फवारणीच्या कार्यक्रमाचा विस्तार आणि या देशव्यापी मोहिमेला बळकटी देण्यासाठी, इफकोने ट्रॅक्टर-माउंटेड बूम स्प्रेअर, ट्रॅक्टर-माउंटेड होज रील स्प्रेअर, HTP पॉवर स्प्रेअर विथ गन, स्टॅटिक/पोर्टेबल स्प्रेअर, नॅनो खतांच्या फॉलीअर ऍप्लिकेशनसाठी नियो स्प्रेअरची ऑर्डर दिली आहे. कृषी फवारणी यंत्रे आणि ड्रोन वापरून नॅनो खते विविध पिकांवर फॉलीअर ऍप्लिकेशनद्वारे योग्य प्रमाणात फवारली जातात. ड्रोन आणि स्प्रेअर कोणत्याही प्रकारच्या फवारणीसाठी वापरता येत असल्याचे इफकोने म्हटले आहे.
इफकोने आधीच स्मार्ट हाय-टेक सोल्यूशन्सद्वारे शेतकऱ्यांच्या शेतात नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी पुरवण्याचे काम सुरू केले आहे. आता नॅनोटेक्नॉलॉजी-आधारित खते, कृषी-ड्रोन्स, ग्रामीण ई-कॉमर्स, डिजिटली सक्षम शेतकरी व शेतजमिनी तसेच इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) यासह विविध प्रकारे नव कृषी तंत्रज्ञानाची कास धरली जात आहे. इफकोकडून या कृषी तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक केली जात आहे. शेतीच्या नवीन तंत्रज्ञान प्रवाहात भारतीय शेतकऱ्याने टिकून राहावे, पुढे यावे यावर इफकोचा भर आहे. इफकोच्या ग्रामीण उद्योजकांच्या साथीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी भारतीय शेतीचा ब्रँड बनून जगासमोर यावे अन् शाश्वत शेतीचे ध्येय साकारावे, यासाठी इफकोची धडपड सुरू आहे.
इफकोने 2,500 पैकी 400 ड्रोन्सची ऑर्डर गरुडा कंपनीला दिली आहे. गरुडाला यंदा तब्बल 10,000 ड्रोन्सची प्री-बुकिंग ऑर्डर मिळाली आहे.