नवी दिल्ली : जर तुमच्याकडे शेतजमीन नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. आता तुम्ही घरीच मत्स्यपालन करून कमाई करू शकता. त्यासाठी केंद्र सरकार तुम्हाला खर्चावर 60% पर्यंत सबसिडीही देईल. मासे विक्रीतून तुम्ही घरबसल्या चांगली कमाईही करू शकता. या योजनेबद्दल आम्ही इथे विस्तृत माहिती देत आहोत. ती नक्कीच आपल्या फायद्याची ठरेल.
मत्स्यपालन हे नाव ऐकताच आपल्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे नदी आणि तलाव. मत्स्यशेती ही केवळ खोल तलाव, नद्या किंवा मोठ्या ठिकाणी करता येते, असे आजवर आपण समजून चाललो आहोत; पण तसे आजिबात नाही. आजच्या काळात विज्ञानाच्या मदतीने तुम्ही कुठेही, कोणतेही काम सहज करू शकता. मत्स्यपालन असो किंवा कोणत्याही पिकाची लागवड, तुम्ही ते घरीही करू शकता.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)
आज आपण घरच्या घरी मत्स्यपालन कसे सहज करता येईल, ते पाहणार आहोत. जर तुम्हाला जमीन आणि तलावाची समस्या असेल तर काळजी करण्याची गरज नाही. अगदी घरबसल्याही तुम्ही अगदी सहज मत्स्यपालन करू शकता. मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी केंद्र सरकारने 2020 मध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) सुरू केली आहे. तिची व्याप्ती आता वाढवली जात आहे. 2024-25 सालापर्यंत देशातील मत्स्य उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
बॅकयार्ड रीक्रिक्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम
पीएमएमएसवाय योजनेमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील गंभीर उणिवा दूर करून तिची क्षमता पुरेपूर वापरता येणार आहे. मत्स्यपालनासाठी दर्जेदार मत्स बियाणांची खरेदी आणि मत्स्यशेतीसाठी उत्तम पाणी व्यवस्थापनालाही या योजनेद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेअंतर्गत, सरकारने बॅकयार्ड रीक्रिक्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीमद्वारे मत्स्यपालन योजना लागू केली आहे.
खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 40 टक्के अनुदान
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत, बॅकयार्ड रीक्रिक्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीमद्वारे मत्स्यपालनास चालना देण्यासाठी नवी अनुदान योजना केंद्र सरकारने लागू केली आहे. याअंतर्गत महिला, अनुसूचित जाती-जमातींना 60 टक्के तर खुल्या व इतर वर्गातील सर्वसामान्यांना 40 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
लहान मच्छीमारांसाठी सरकारचे स्तुत्य पाऊल
फक्त यासाठी तुमच्याकडे सिमेंटची टाकी असावी. नसेल तर तुम्ही आधी घरामध्ये सिमेंटची टाकी बनवून त्यात मासे वाढवू शकता. त्यात सुमारे 70-80 किलो मासे ठेवता येतात. बड्या मच्छीमारांसाठी सरकारच्या अनेक योजना होत्या पण मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या मच्छीमारांसाठी कोणतीही योजना नव्हती. हे पाहता सरकारने लहान मच्छीमारांसाठी हे स्तुत्य पाऊल उचलले आहे.
घरीच सिमेंटच्या टाकीत मत्स्यशेती
परसातील रिक्रिक्युलेटरी ॲक्वाकल्चर पद्धतीद्वारे मत्स्यपालन योजनेंतर्गत मत्स्यपालक त्यांच्या घरात सिमेंटची टाकी बनवून त्यात मासे पाळू शकतात. एवढेच नाही तर त्याच्याकडे दोन खोल्या असतील तर एका खोलीत तो मत्स्यशेती करू शकतो आणि दुसऱ्या खोलीत स्वतः राहू शकतो. सध्या या योजनेवर काम करणाऱ्यांना शासन अनुदान देत आहे. अधिकाधिक बेरोजगार तरुणांना या क्षेत्रात रोजगार मिळू शकतो.
एका टाकीतून चार महिन्यात दोन लाखांचे उत्पन्न
कमी जमीन आणि कमी खर्चात सिमेंटऐवजी प्लॅस्टिकच्या टाक्यांमध्येही मत्स्यपालन सहज करता येते. चार मीटर बाह्य आणि दोन मीटर अंतर्गत क्षेत्र असलेल्या या कुंडात सिंगी, मांगूर व इतर मासे पाळता येतात. या सर्वांना स्वतंत्रपणे स्थलांतरित केले जाईल. याचा अर्थ, तुम्ही एका टाकीत फक्त एकाच प्रजातीचे मासे ठेवू शकता. एका वेळी 10 हजार सिंघी मत्स्यबीज टाकीत टाकता येतात. 100 ग्रॅम वजनाचा मासा चार महिन्यांत तयार होईल. अशा प्रकारे एका टाकीतून मासळी तयार करून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.