भुईमुग पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन सध्याच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहे. भुईमुगासाठी खतांचे व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय खते, रासायनिक खते आणि जैविक खते यांचे वापराचे तंत्र आपण समजून घेऊ.
सेंद्रिय खते
एकरी 2 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्वमशागत करताना शेवटच्या कुळवणीआधी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमीन भुसभुशीत होते. त्याचबरोबर जमिनीची जलधारण क्षमता वाढते. जमिनीतील लाभदायक सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढून जमिनीचे आरोग्य चांगले राखले जाते. शेणखतातून महत्त्वाच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन पीकवाढीवर चांगला परिणाम दिसून येतो.
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ शहादा | Agroworld Agriculture Exhibition 2024 |
रासायनिक खते
पेरणीवेळी 10 किलो नत्र (21 किलो युरिया), 20 किलो स्फुरद (125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट), किलो पालाश (33 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) एकरी द्यावे. भुईमुगास नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये आवश्यक असतात. त्याचबरोबर सल्फर व कॅल्शिअम ही दुय्यम अन्नद्रव्ये भुईमुगासाठी द्यावी लागतात. त्यामुळे स्फुरद हे अन्नद्रव्य सिंगल सुपर फॉस्फेट खताच्या माध्यमातून द्यावे. त्याचप्रमाणे पेरणीवेळी 80 किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे; तर 80 किलो जिप्सम हे आऱ्या सुटताना द्यावे, जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण आणि एकूणच उत्पादनात वाढ होते.
माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास, पेरणीवेळी एकरी फेरस सल्फेट 8किलो, झिंक सल्फेट 8 किलो व बोरॉन 2 किलो द्यावे.

जैविक खते
जमिनीत नत्र स्थिरीकरणासाठी रायझोबिअम जिवाणू संवर्धकाची 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. स्फुरदाची उपलब्धता वाढविण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणू संवर्धकाची 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
{कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री}

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇