भूषण वडनेरे, धुळे
पुरुषांच्या बरोबरीने महिलाही सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांनी चार भिंतीतून बाहेर येवून स्वत:चे उद्योगविश्व निर्माण करावे, यासाठी शासनाच्या विविध योजनाही मदतीला आहेत. यातून महिलांच्या सशक्तीकरणाला आणखीनच बळ मिळत आहे. शासकीय योजनेच्या माध्यमातून स्वत:चा पापड उद्योग उभारून आर्थिक समृध्दी साधणार्या अशाच एका महिलेची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत.
धुळे तालुक्यातील पाडळदे येथील रेणुकाताई राठोड-चव्हाण (33) यांनी शासनाच्या राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आर्थिक उन्नती साधली आहे. अत्यंत गरीब कुटूंबातून व ग्रामीण भागातील असलेल्या रेणुकाताईंनी 2015 मध्ये ङ्गओम साईराम बचत गटाफफ ची स्थापना करुन पापड निर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. केवळ 20 हजार रुपयांपासून सुरु झालेल्या त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल आज सुमारे 12 लाखांवर गेली आहे. इतकेच नव्हेतर त्यांच्यामुळे गावातील 15 महिलांना रोजगारही मिळाला आहे.
अस्सल देवगड हापूस आंबा खावासा वाटतोय पण…
https://youtu.be/xMZLeqr2Es8
एका गरीब कुंटुंबात जन्मलेल्या रेणुका अंकूश राठोड यांचे शिक्षण इयत्ता बारावीपर्यंत झाले आहे. त्यांचा विवाह सन 2008 मध्ये साक्री तालुक्यातील कढरे गावातील लखीचंद हरिचंद चव्हाण यांच्याशी झाला. लखीचंद चव्हाण हे पुर्वीपासुनच पाडळदे येथे वास्तव्यास आहेत. टेलरिंगचा व्यवसाय करत उदरनिर्वाह चालवितात. मात्र, रेणुकाताईंना लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची महत्वकांक्षा स्वस्थ बसू देत नव्हती. लग़्नानंतर शेतीकाम व शिवणकाम करतानाच त्या नाविन्याच्या शोधात होत्या. अशातच सन 2015 मध्ये त्यांच्या गावात महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद) कार्यक्रमास सुरवात झाली. या अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जावून बचत गटाची माहिती व महत्व पटवून दिले जात होते. बचत गटाच्या माध्यमातून महिला कशाप्रकारे स्वावलंबी बनू शकतात, याची माहिती रेणुकाताईंना मिळाली. येथूनच त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली.
बचतगटाची स्थापना
रेणुकाताईंनी उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले. आणि सन 2015 मध्ये ओम साईराम बचत गट स्थापन करुन उदयोग उभारणीसाठी प्रयत्न सुरु केले. याच दरम्यान, स्वयंसिध्दा या बचतगटांच्या प्रदर्शनात जवळच्या बल्हाणे गावातील त्यांची मैत्रीण सुनंदा अशोक पाटील यांनी सहभाग घेतला होता. रेणुकाताईंनी त्यांच्या मैत्रीणीला या प्रदर्शनासाठी मदत केली व यातूनच रेणुकाताईंचा आत्मविश्वास दुणावला. यानंतर त्यांनी गरुडभरारी घेत हिरकणी नागली पापड उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या बचत गटाच्या माध्यमातून गावाचे नाव उंचीवर नेण्याचा निश्चय त्यांनी मनोमन करुन टाकला. यासाठी त्यांनी विविध प्रदर्शने, प्रशिक्षण तसेच उमेदच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावून उद्योग वाढविण्याकडे वाटचाल सुरु ठेवली. शिवाय कृषी विज्ञान केंद्रातून त्यांनी नागली पापड व अन्य पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षणही घेतले. यासाठी त्यांना केंद्रातील शास्त्रज्ञ अमृता राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
नागलीच्या पापडांना सर्वाधिक मागणी
रेणुकाताई आपल्या बचत गटाच्या माध्यमातून नागली पापड, टोमॅटो पापड, तांदळाचे पापड, पालक पापड, गव्हाची कुरडई, साबुदाणा चकली आदी उत्पादने तयार करुन होलसेल व किरकोळ विक्री करतात. तथापि, प्रभावी मार्केटींग करणे हा यशस्वी उद्योगाचा पाया मानला जातो. त्याप्रमाणे रेणुकाताईंनी सुरवातीपासूनच धुळे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई आदी ठिकाणी भरविलेल्या प्रदर्शनात सहभाग नोंदवत पापड विक्रीचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न केला. आज त्यांचे हे पदार्थ धुळे जिल्ह्यासह पुणे, मुंबई, नाशिक, नगर आदी जिल्हयांमध्ये तसेच गुजरात राज्यामध्येही पाठविले जातात. या सर्व उत्पादनांना मोठ्या महानगरांध्ये मोठी मागणी आहे. विशेषत: नागलीच्या पापडांना सर्वाधिक मागणी असल्याचे रेणुकाताई सांगतात.
2500 किलो पापडांची विक्री
रेणुकाताईंच्या बचत गटाची पहिल्या वर्षी सन 2015 केवळ 20 हजारांची उलाढाल झाली. दुसर्या वर्षी 50 हजार, तिसर्या वर्षी दीड लाख, चौथ्या वर्षी चार लाख तर पाचव्या वर्षी 11 लाख, सहाव्या वर्षी 7 लाख तर सातव्या वर्षी सन 2022 मध्ये 12.50 लाखांची उलाढाल झाली. यात त्यांनी 2500 किलो नागली पापड, 1200 किलो कुरडई, साबुदाणा चकली 800 किलो, टोमॅटो पापड 600 किलो व तांदुळ मसाला 500 किलो इतक्या मालाची विक्री केली. रेणुकाताईंनी प्रदर्शनांच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचे यशस्वी मार्केटींग केल्याने दरवर्षी त्यांच्या व्यवसायाचा आलेख वाढताच राहीला आहे.
15 महिलांना रोजगार
रेणुकाताईंच्या बचतगटामुळे आज गावातील 15 महिलांना रोजगार मिळाला आहे. पीठ दळण्यापासून ते पापड लाटून ते पॅकींग करण्यापर्यंतची सर्व कामे या महिला करतात. पापड तयार करताना स्वच्छतेची सर्व काळजी घेतली जाते. स्वच्छता व गुणवत्ता यावर रेणुकाताईंचा कायम भर असतो. त्यामुळे काही ग्राहक हे नित्याचेच झाले आहेत. या ग्राहकांकडून मोठी ऑर्डरही रेणुकाताईंना मिळत असते. रेणुकाताईंच्या पापड उद्योगामुळे गावातील 15 महिलाही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत. बचतगटामार्फत विक्री होणार्या मालाची व्यवस्थित नोंद ठेवली जाते. त्यामुळे किती मालाची विक्री झाली, किती उत्पन्न मिळाले, याचा हिशेब ठेवणे सोयीस्कर होते.
भविष्यातील नियोजन
रेणुकाताईंनी आता पापडनिर्मितीसाठी अद्ययावत यंत्रसामुग्री घेतली आहे. त्यासाठी त्यांना सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांकरीता अर्थसहाय्य (पीएमएफएमई) योजनेंतर्गत 10 लाखांचे अर्थसहाय्य मिळाले. त्यात 5 लाख रुपये स्वत: रेणुकाताईंनी टाकले. या पैशातून 7-8 लाखात जागा विकत घेवून तेथे शेड उभारले. आणि 5 लाखांच्या मशीनरी आणल्या. यामुळे त्यांच्या व्यवसायवाढीस मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे येत्या 8 मार्च 2023 रोजी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या यंत्रासामुग्रीचा शुभारंभ करण्याचे त्यांचे नियोजन आहे. शिवाय 8 ते 19 मार्च या कालावधीत मुंबई येथे आयोजित बचतगटांच्या प्रदर्शनातही त्या सहभागी होणार आहेत. रेणुकाताईंची काम करण्याची जिद्द, उदयोग वाढविण्यासाठीची तळमळ खरोखर वाखाणण्याजोगी आहे.
यांचे लाभले मार्गदर्शन
रेणुकाताईंना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या तत्कालिन सीईओ वान्मती सी., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प समन्व्यक प्रतिभा संगमनेरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक उद्धव धारणे, जिल्हा व्यवस्थापक (मार्केटींग) जितेंद्र चौधरी, तालुका समन्वयक अनिल खंडेलवाल, हेमंत गवते, अमोल वाघ, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ अमृता राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच आपण पापड उद्योगात भरारी घेवू शकलो, असे रेणुकाताई आवर्जून सांगतात.
सामाजिक कार्यातही आघाडीवर
रेणुकाताई व्यवसायासोबतच सामाजिक कार्यातही आघाडीवर आहेत. समर्पण फाऊंडेशन, धुळे या सेवाभावी संस्थेच्या त्या उपाध्यक्षा देखील आहेत. तर संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील व सचिव अपर्णा पाटील ह्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातूनही महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. गावात ज्या किशोरवयीन मुली आणि गरोदर माता आहेत, त्यांचे हिमोग्लोबीन तपासणी करणे, त्यांना हिमोग्लोबीन वाढीसाठी पोषक आहार पुरविणे, महिलांना व्यवसाय मार्गदर्शन, विक्री मार्गदर्शन, कौशल्य विकास, आरोग्य शिबीर आदी उपक्रम राबविले जातात. तसेच जैवविविधतेचे संवर्धन, जलसंधारणासह शैक्षणिक उपक्रमही राबविले जातात. शिवाय संस्थेने जंगलात वन्य प्राण्यांसाठी पाणवठेही बनविले आहेत. गेल्या 31 डिसेंबरपासून गावात प्रत्येक महिन्याचा एक शनिवार स्वच्छता मोहिमही राबविले जाते. यात देखील रेणुकाताईंचा सहभाग असतो.
सात वर्षांतच बदलली परिस्थिती!
रेणुकताईंनी पापड उद्योगाला अगदी शुन्यातून सुरवात केली. कुटूंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही त्या पापड उद्योगात उतरल्या. सुरवातीला सायकल घेण्याचीही त्यांची परिस्थिती नव्हती. मात्र, आता रेणुकाताईंनी आपल्या कठोर मेहनतीच्या बळावर आर्थिक प्रगती साधली आहे. पापड उद्योगाच्या जोरावर त्यांनी दुचाकीच नव्हे तर चारचाकी वाहन तसेच स्वतःचे पक्के घरही केले. त्यामुळे आज इतर महिलांसाठी त्या खर्या अर्थाने रोल मॉडेल ठरतात.
राज्यपालांच्या हस्ते गौरव
रेणुकाताई यांच्या मओम साईराम बचतगटाफच्या कार्याची दखल घेत त्यांच्या बचतगटास सन 2020 मध्ये तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते या बचतगटाला राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे केवळ पाडळदे गावाच्याच नव्हे तर संपूर्ण धुळे तालुक्याच्या नावलौकीकात भर पडली.
शुन्यातून सुरवात करा!
महिलांनी स्वत:चा उद्योग सुरु करताना शुन्यातून सुरु करायला हवा. कोणाचंही ऐकून खचून जाऊ नये, स्वतःच्या हिमतीवर उद्योग वाढीसाठी प्रामाणिकपणे मेहनत करावी. सुरवातीला छोट्या प्रमाणात व्यवसायाला सुरवात करावी. जेणेकरुन कुठल्याही प्रकारचे कर्ज होणार नाही. मी देखील याच तत्वाचे पालन केले. त्यामुळे मला व्यवसायात कधी तोटा झाला नाही. व्यवसायात मनापसून काम केल्यास यश नक्कीच मिळते.
– रेणुकाताई चव्हाण-राठोड
अध्यक्षा, ओमसाई बचतगट,
पाडळदे, ता.जि.धुळे