मुंबई : उन्हाळा असूनही राज्यातील शेतकर्यांना सतत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना करावा लागत आहे. यातून सावरत नाही तोच शेतकर्यांची चिंता वाढविणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वार्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यातील शेतकर्यांना यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा अधिकच सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात पाऊस जेम-तेम झाला. त्यानंतर हिवाळ्यात तरी शेतकर्यांना दिलासा मिळले अशी अपेक्षा होती. मात्र, हिवाळ्यात थंडीने दांडी मारली. त्यामुळे रब्बीचा हंगाम देखील पाहिजे तसा बहरू शकला नाही. त्यानंतर उन्हाळ्यात तर सतत ढगाळ वातावरण राहून अधूनमधून अवकाळी पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी तर गारपिटीचाही सामना करावा लागला आहे. यातून आज न उद्या सुटहा होवून आकाश निरभ्र होईल अशी आशा आता शेतकर्यांना लागून आहे.
पून्हा गारपिटीचा इशारा
शेतकर्यांकडून लवकरच खरिपाच्या तयारीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे वातावरण सामान्य होणे गरजेचे आहे. मात्र, वातावरण लवकर बदल होईल, अशी तरी चिन्हे सध्या दिसत नाहीयेत. राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी वेळीच सावध होवून कामे उरकून घेणे गरजेचे आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाकडून 27 एप्रिल रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, 28 एप्रिल रोजी छ. संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, नागपूर, गोंदिया, 29 एप्रिल रोजी अमरावती, वाशिम, नागपूर आणि 30 एप्रिल रोजी गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाट आणि वादळी वार्यासह गारपीट होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.