मुंबई : शेतकऱ्यांना आपली शेती व शेतातील पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण त्याचप्रमाणे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतामध्ये तार कुंपण करावे लागते. यासाठी शासनाने तार कुंपण अनुदान योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतीच्या भोवताली शेतीला लोखंडी तार कुंपण ओढण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. आज आपण तार कुंपण अनुदान योजनेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
शेतात तार कुंपण केल्यामुळे शेतजमीन जंगली प्राण्यांपासून सुरक्षित राहते. शासन या तार कुंपण योजनेतून शेती भोवताली तार कुंपण ओढण्यासाठी 90 टक्के अनुदान देते. तार कुंपण योजना ही डॉ.श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पअंतर्गत राबविण्यात येते. शेतातील पिकांचे जंगली जनावरांपासून होणारे नुकसान टाळणे, हे शासनाचे मुख्य उद्देश आहे.
हे आहेत योजनेसाठीचे अटी व नियम
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे शेत हे अतिक्रमणात असायला नको. तसेच पुढील दहा वर्षासाठी जमिनीचा वापर हा शेतीव्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याचा ठराव देखील शेतकऱ्यांना समितीकडे सादर करावा लागेल. शेती पिकाचे होत असलेल्या नुकसानीबाबतचा ठराव हा सयुंक्त वन व्यवस्थापन समिती, परिस्थिती विकास समिती किंवा वनपरिक्षेत्र यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार.
असे मिळणार अनुदान
तार कुंपण योजनेच्या माध्यमातून 2 क्विंटल लोखंडी काटेरी तार आणि ३० खांब पुरविण्यात येणार असून 90% अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येईल. मात्र, शेतकऱ्यांना उर्वरित 10% रक्कम ही स्वतः भरावी लागेल. या योजनेचा लाभ ओबीसी, एससी, एसटी समाजातील लोकांनाच मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठे कराल ?
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा ओळख पुरावा (जसे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड), पत्ता पुरावा, बँक पासबुकची प्रत, मोबाईल नंबर, जमिनीची कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र ही कागदपत्रे लागतील. या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर संबंधित पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावा लागतो.