कर्नाटकच्या मैदानी प्रदेशातही कॉफीची लागवड केली जाऊ शकते, हे एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. नावीन्यपूर्णता, सेंद्रिय शेतीसाठी समर्पण आणि दृढनिश्चयाने आव्हानांना सामोरे जात आपण मेहनतीला अभूतपूर्व यशात रूपांतरित करू शकतो, हे या शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले. त्यांचे नाव आहे – गड्डी सिद्धलिंगप्पा बसप्पा. त्यांनी कर्नाटकातील मैदानी प्रदेशात कॉफीची लागवड केली. आणि आज ते यातून 30 लाखांची कमाई करत आहेत. एवढेच नाहीतर परंपरेला आव्हान देत नवीन मार्गावर यश मिळवताना त्यांनी स्थानिक रोजगारही निर्माण करून दिले.
कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील कोंबली गावातील 83 वर्षीय शेतकरी गड्डी सिद्धलिंगप्पा बसप्पा यांनी अनेक अडथळे पार करून मैदानी प्रदेशात यशस्वीरित्या कॉफीची लागवड करून दाखविली. पारंपारिकपणे, कॉफीची लागवड डोंगराळ भागात केली जाते, विजयनगर प्रदेश सामान्यतः इतर पिकांसाठी राखीव आहे. परंतु गड्डींच्या दृढनिश्चय आणि नाविन्यपूर्ण विचारसरणीने त्यांना अडचणींना तोंड देण्यास मदत केली.

अनेक शेतकऱ्यांसाठी नवी आशा
कठोर परिश्रम, लवचिकता आणि सेंद्रिय शेतीसाठी वचनबद्धतेचा हा प्रवास आहे. गड्डींनी मैदानी प्रदेशात कॉफी शेती भरभराटीला येऊ शकते, हे सिद्ध केले. त्यामुळे कर्नाटकातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आणि नवी आशा निर्माण झाली. सिद्धलिंगप्पा यांची ही कहाणी उत्कटता आणि समर्पण यातून आव्हानांना सामोरे जात उल्लेखनीय यशांमध्ये कसे बदलता येते, याचा आदर्श ठरू शकते.
सुपारीची रोपे खरेदी दिसली पण कॉफीची रोपे
80 एकर जमीन असलेल्या सिद्धलिंगप्पा यांच्या संयुक्त कुटुंबाचा नेहमीच शेती हा प्रमुख व्यवसाय राहिला आहे. 2018 मध्ये, शिवमोग्गा येथील कृष्णा नर्सरीला सुपारीची रोपे खरेदी करण्यासाठी भेट देत असताना, सिद्धलिंगप्पा यांना रोपवाटिकेत वाढवलेली कॉफीची रोपे दिसली. उत्सुकतेने आणि प्रेरित होऊन त्यांनी माहिती गोळा केली आणि मैदानी भागात असे करण्याच्या आव्हानांना न जुमानता, स्वतःच्या शेतात कॉफीच्या लागवडीचा प्रयत्न करण्याचा संकल्प केला. सिद्धलिंगप्पा यांनी सुरुवातीला 8 एकर जमिनीवर कॉफी लागवड करण्याचे ठरविले. त्यांनी कृष्णा नर्सरीमधून 8 रुपये प्रति रोप या दराने 4,000 उच्च दर्जाची कॉफी रोपे खरेदी केली.

2021 मध्ये आले पहिले उत्पादन
सिद्धलिंगप्पा यांनी सेंद्रिय शेती पद्धतींचा अवलंब केला आणि बोअरवेलमधून पाणी घेऊन ठिबक सिंचन प्रणाली बसवली. कॉफीच्या रोपांना आठवड्यातून तीन वेळा पाणी दिले जाते. काळजीपूर्वक पीक व्यवस्थापन केल्याने ते भरभराटीला आले. सिद्धलिंगप्पा यांना कॉफीच्या पहिल्या उत्पादनाने 2021 मध्ये त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाले. त्यांनी 11 क्विंटल कॉफी बियाणे तयार केले, जे चिक्कमंगळुरु आणि मुदिगेरे बाजारपेठेत 11,000 रुपये प्रति क्विंटल या दराने विकले, ज्यामुळे 1 लाख 21 हजार रुपये उत्पन्न झाले. या यशाने हुरूप आला, अपेक्षा उंचावल्या आणि पुढील हंगामासाठी सिद्धलिंगप्पा यांनी 15-20 क्विंटल उत्पादनाचे लक्ष्य ठेवले.

स्थानिक कामगार आणि वैविध्यपूर्ण शेतीवर परिणाम
सिद्धलिंगप्पा यांच्या कॉफी मळ्याला केवळ वैयक्तिक यश मिळाले नाही, तर स्थानिक रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. ज्या भागातून अनेक कामगार कामासाठी ऊस आणि कॉफी उत्पादक प्रदेशात स्थलांतरित होतात, तिथे सिद्धलिंगप्पा आता त्यांच्या शेतात 10 कायमस्वरूपी कामगार कामावर ठेवतात. याशिवाय, नेहमी हंगामी व रोजंदारी कामगारांची मागणी होत राहते.

सुपारी, सागवानाचीही लागवड
कॉफी व्यतिरिक्त सिद्धलिंगप्पा यांनी 4,000 सुपारीची झाडे लावली आहेत. याशिवाय, सावली देण्यासाठी बागेभोवती 300 सागवानाची झाडे लावली आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण शेतीमध्ये उर्वरित जमिनीवर मका, ऊस आणि भात पिकवणे समाविष्ट आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला वार्षिक 25-30 लाख रुपये उत्पन्न मिळते.














