मुंबई – मान्सूनने विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दमदार वाटचाल सुरू केली आहे. मध्य पाकिस्तान आणि लगतच्या पंजाब तसेच पूर्व उत्तर प्रदेशात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सूनची प्रगती वाढण्यास मदत होईल. याशिवाय पंजाबपासून ईशान्य भारतापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनचा पाऊस वाढण्यास मदत होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे.
IMD ने त्यांच्या पत्रकात म्हटले आहे की, पुण्यात 28 जूनपर्यंत घाटातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर – मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
जळगाव, धुळ, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये २८ जूनपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात 30 जूनपर्यंत पाऊस : खुळे
महाराष्ट्र व्यापलेल्या मान्सूनचा घाटमाथ्यावर जोर जाणवू लागला आहे. त्यामुळे आज (26 जून) पासून जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे 30 जूनपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले.
नाशिक, खान्देशात…??
मान्सूनची बंगालची उपसागरीय शाखा सक्रिय झाल्यामुळे मान्सूनची अरबी समुद्रीय शाखाही जोमदार वाटचाल करत आहे. त्यामुळे मान्सून साधारण एक किमी उंचीचा सह्याद्री घाट चढून घाटमाथ्यावर पोहोचला आहे. त्यामुळे मान्सून खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात जूनअखेरपर्यंतच्या मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते, असेही श्री. खुळे म्हणाले.
मराठवाडा
मराठवाड्यातील 8 पैकी छत्रपती संभाजीनगर वगळता उर्वरित 7 जिल्ह्यात 27 ते 30 जून या चार दिवसात पावसाचा जोर वाढू शकतो. धाराशिव, लातूर अशा दोन जिल्ह्यात व लगतच्या परिसरात तर कदाचित जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
29 जून ते 6 जुलै दरम्यानच्या आठवड्यात कदाचित महाराष्ट्रात अधिक चांगल्या पावसाची शक्यताही खुळे यांनी वर्तविली.

देशातील स्थिती
कोकण आणि गोवा, उत्तर – मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल प्रदेशांमध्ये पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. याच भागात पुढील पाच दिवसात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे.
26-27 जून दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छमध्ये, 26-29 जून दरम्यान गुजरात, 26-29 जून दरम्यान किनारी कर्नाटक, 26-27 जून दरम्यान तामिळनाडू, 27 जून रोजी उत्तर कर्नाटक, तेलंगणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 26-28 जून दरम्यान किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात मुसळधार तर कोकण आणि गोव्यात पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज IMD ने दिला आहे.
IMD च्या अंदाजानुसार उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेशात 26-29 जून दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि याच कालावधीत नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे मुसळधार पाऊस पडेल. गंगेच्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, बिहार, झारखंड, ओडिशा प्रदेशात येत्या पाच दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर तसेच बिहारमध्ये आज (26) मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीचीही शक्यता
26-29 जून दरम्यान उत्तराखंड, पूर्व राजस्थानमध्ये वेगळ्या मुसळधार पावसाची शक्यता आहे; 26-29 जून दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, 27-29 जून दरम्यान पश्चिम उत्तर प्रदेश, 28 आणि 29 जून रोजी हरियाणा आणि 29 जून रोजी पंजाब. 28 आणि 29 जून रोजी उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.
