ही यशोगाथा आहे चार मित्रांच्या संघर्षाची, त्यांच्या डेअरी स्टार्ट- अपने व्यवसायात पाहिलेल्या चढ-उतारांची. अपयशाची टांगती तलवार, आर्थिक चणचण, या ताण-तणावातून दोघे पार्टनर मित्र कंपनीतून बाहेर पडले. संस्थेचा प्रवास सुरूच राहिला अन् आज त्यातून उभा राहिलाय 300 कोटींचा यशस्वी डेअरी व्यवसाय! बरं, हा व्यवसाय काही महाराष्ट्र-गुजरातसारख्या प्रगत राज्यात किंवा दिल्ली-बेंगळुरूसारख्या महानगरात नाही. झारखंड अन् बिहारमधील अतिदुर्गम, मागास भागात ही यशोगाथा रचली गेली. दुर्दम्य इच्छाशक्ती अन् मेहनत, संघर्षाची तयारी असेल, तर कोणत्याही गावात तुम्ही यश मिळवू शकतात, हे नक्की!
2012 मध्ये उभारला पहिला डेअरी फार्म
ही कहाणी आहे झारखंडमधील चार मित्रांची, त्यांच्या ‘ओसम डेअरी’ कंपनीची. संस्थापक -अभिनव शाह, राकेश शर्मा, अभिषेक राज आणि हर्ष ठक्कर – हे कॉलेजपासूनचे जिवलग मित्र. त्यांनी त्यांच्या नऊ ते पाच वर्षांच्या नोकरीतून मिळालेल्या बचतीतून एक कोटी रुपयांचे भांडवल उभारले. एप्रिल 2012 मध्ये, त्यांनी रांचीजवळील ओरमांझी गावात एक एकर जमिनीवर त्यांचा पहिला डेअरी फार्म उभारला. आज ओसम डेअरी हा पूर्व भारतातील सर्वात मोठा खासगी डेअरी ब्रँड आहे.
चांगल्या पगाराच्या कॉर्पोरेट नोकऱ्या सोडल्या
सुरुवातीला ते तिघे होते. चौथा मित्र, जो फास्ट- मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) कंपनीत काम करत होता, तो देखील नंतर त्यांच्यात सामील झाला. रांचीच्या या मित्रांनी, त्यांच्या चांगल्या पगाराच्या कॉर्पोरेट नोकऱ्या, उत्तम करिअरच्या संधी आणि वर एक स्थिर छत सोडून हा डेअरी फार्म सुरू केला तेव्हा सर्वांनी त्यांना आव्हानात्मक व्यवसायाच्या अनिश्चिततेबद्दल सावध केले. अनेकांनी वेड्यात काढले. काहींनी म्हटले की, त्यांचा हा उपक्रम कधीच यशस्वी होणार नाही, तर काहींनी त्यांना त्यांच्या पूर्वीच्या आरामदायी कार्पोरेट कामांकडे परत जाण्याचा सल्ला दिला, कारण त्यांच्या आरामदायी क्षेत्रातून बाहेर पडणे, हे अनेकांना मृगजळाचा पाठलाग करण्यासारखे वाटत होते.
पहिल्याच महिन्यातच अर्धे भांडवल गमावले
तथापि, सर्व टीका आणि अडथळ्यांना न जुमानता, या मित्रांनी त्यांच्या मनाचे ऐकले आणि एका नवीन उद्योजकीय प्रवासाला निघण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी म्हटल्याप्रमाणे, सुरुवातीच्या काळात पुढचा रस्ता असंख्य अडचणींनी भरलेला होता. पहिल्याच महिन्यातच त्यांनी त्यांचे अर्धे भांडवल गमावले, ते दोनदा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होते. पण काहीतरी वेगळे करण्याचा निर्धार करून, त्यांनी त्यांची कंपनी वाचवण्यासाठी योग्य वेळी पैसे उभे केले. आता कंपनीने एक तापचा प्रवास पूर्ण केला आहे. बिहार, झारखंडमध्ये व्यवसाय विस्तारल्यानंतर, आता पश्चिम बंगालमध्ये व्यवसाय पसरवण्याची योजना सुरू झाली आहे.
300 वितरक अन् 10,000 किरकोळ विक्रेते
आज ओसम डेअरीमध्ये किमान 500 कर्मचारी काम करतात. याशिवाय, 1,500 दुग्ध उत्पादक शेतकरी अप्रत्यक्षपणे कंपनीशी संबंधित आहेत. ही कंपनी सुमारे 25,000 पशुपालकांकडून नियमितपणे दूध खरेदी करते. बिहार आणि झारखंडमधील 300 वितरक आणि 10,000 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांद्वारे त्यांचे उत्पादन वितरित करते. अशा प्रकारे, ओसम डेअरीसाठी सुमारे 40,000 लोक काम करतात.
40 पैकी 26 गायींचा संसर्गाने मृत्यू
एप्रिल 2012मध्ये, त्यांनी रांचीजवळ पहिला डेअरी फार्म सुरू करण्यापूर्वी संस्थापक अभिनव यांनी कानपूरमध्ये जाऊन दुग्धव्यवसायाचे तांत्रिक ज्ञान घेण्यासाठी एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले. तोवर, या चौघांपैकी कुणालाही डेअरी उद्योगाची फारशी कल्पना नव्हती. अभिनव यांनी सांगितले की, “सुरुवातीला आम्ही पंजाबमधील खन्ना येथून होल्स्टीन फ्रायझियन जातीच्या 40 गायी खरेदी केल्या. पण काम सुरू केल्यानंतर पहिल्याच महिन्यात आम्हाला मोठा धक्का बसला. 40 पैकी किमान 26 गायी संसर्गामुळे मरण पावल्या. पण आम्ही त्याचा आमच्यावर परिणाम होऊ दिला नाही. यानंतर, आम्ही पुढच्या महिन्यात आमच्या बॅकअप प्लॅनवर काम करण्यासाठी 50 लाख रुपये उभारले.”
पहिल्या वर्षी 26 लाखांची उलाढाल
अभिनव पुढे सांगतात, “पहिल्या धक्क्यानंतर आम्ही बिहारमधून गायी खरेदी केल्या आणि घरोघरी दूध वाटण्यास सुरुवात केली. सुरुवातीला, आम्हाला दररोज 300 लिटर दूध उत्पादन करण्याचे लक्ष्य होते, जे नंतर सहा महिन्यांत 1,000 लिटरपर्यंत वाढले. पूर्वी, आमच्या कंपनीचे नाव ‘राया’ होते आणि रांचीच्या तीन भागात घरोघरी दूध पोहोचवण्यासाठी सात ते आठ लोकांना कामावर ठेवले होते. एव्हढे सारे होऊनही पहिल्या वर्षीची उलाढाल सुमारे 26 लाख रुपये होती.”
नव्याने कर्ज घेऊन उभारला प्रक्रिया, पॅकेजिंग प्रकल्प
संस्थापक अभिनव सांगतात, -“नोव्हेंबर 2013 मध्ये, आम्हाला एका वित्त कंपनीकडून निधी मिळाला. त्या कर्जातून मार्च 2015 पर्यंत, आम्ही बिहारमधील बारबीघा येथे आमचा पहिला दूध शीतकरण प्रकल्प उभारला. यासह, 40 गावांमधील पशुपालक आणि दूध उत्पादक आमच्याशी जोडले गेले. त्यानंतर दोन महिन्यांनंतर, मे महिन्यात, रांचीपासून 35 किमी अंतरावर असलेल्या पत्रातू येथे 50,000 लिटर क्षमतेचा पहिला प्रक्रिया आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारण्यात आला.”
वर्षभरात रोजचे 25,000 लिटर दूध वितरण
“एका वर्षाच्या आत, आम्ही एका दिवसात 25,000 लिटर दूध वितरित करण्यास सुरुवात केली आणि जमशेदपूरजवळील चांडिल आणि बिहारमधील आरा जिल्ह्यात 80,000 लिटर क्षमतेचे दोन प्रक्रिया आणि पॅकेजिंग प्लांट स्थापित केले,” अभिनव अगदी अभिमानाने सांगत होते. तथापि, या काळात, त्यांचे दोन भागीदार वैयक्तिक कारणांमुळे वेगळे झाले. आता संस्थापक अभिनव शाह आणि हर्ष ठक्कर हे दोघेच संपूर्ण व्यवसाय सांभाळत आहेत. कंपनीला नुकताच डेअरी उद्योगातील सर्वोत्कृष्ट स्टार्ट-अप म्हणून दिल्लीत गौरविण्यात आले.
देशातील टॉप कॉलेजमध्ये “ओसम डेअरी”चे धडे
सध्या, कंपनी दही, ताक, पनीर (कॉटेज चीज), रबरी आणि पेडा (दुधापासून बनवलेले मिठाई) यांसारखे दुग्धजन्य पदार्थ देखील विकते. ते ‘सालसा रायता’ नावाचे एक खास उत्पादन लाँच करत आहेत. आजमितीला, ओसम डेअरी दररोज सुमारे 1,50,000 लिटर दूध आणि 40,000 लिटर उप-उत्पादने (बाय प्रॉडक्ट्स) विकते. आज कंपनीकडे 3 कलेक्शन प्लांट आणि 3 प्रोसेसिंग व पॅकेजिंग प्लांट आहेत. आविष्कार कॅपिटल, ब्रिटिश इंटरनॅशनल इंव्हेस्टमेंट, लोक कॅपिटल अशा नामांकित गुंतवणूकदार संस्थांनी ओसम डेअरीमध्ये गुंतवणूक केली आहे. उद्योजकतेसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत आणि त्यांच्या व्यवसाय मॉडेलची देशभरातील टॉप बीझनेस स्कूलमध्ये चर्चा केली जात आहे.
दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..
अपयशाने खचून जाऊ नका, निराश होऊ नका
आपल्या संघर्षाची कहाणी सांगताना अभिनव म्हणतात, “निराशेच्या काळात, आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी, ज्यात आई उमा शाह यांचाही समावेश होता, तसेच सर्व मित्रांनी आम्हाला पुरेपूर साथ दिली. या दशकातील माझा सर्वात मोठा धडा म्हणजे, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात एका रात्रीत यश मिळवू शकत नाही. दर्जा, गुणवत्तेचा आग्रह धरा, त्यात तडजोड करू नका. अपयश आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्याने आजिबात खचून जाऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करणे सोडू नका. कारण परिस्थिती कितीही वाईट आली तरी कुठल्याही बोगद्याच्या शेवटी नेहमीच प्रकाश असतो. अंधारातून वाटचाल सुरू ठेवल्यास एक दिवस प्रकाश येणारच!”
संपर्क :
07070894555
ई-मेल : customercare@osamdairy.com,
वेबसाईट : https://www.osamdairy.com/