मुंबई : अनेक राज्यांना रेमल चक्रीवादळामुळे (Cyclone Remal) फटका सहन करावा लागत आहे. पश्चिम बंगालच्या किनार पट्टीवर रेमल चक्रीवादळ धडकलं आहे. हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने सरकल्यानंतर उत्तर – पूर्वेच्या दिशेने सरकत राहील. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने सुंदरबन आणि सागर बेटांसह किनारपट्टी भागातील लाखो लोकांचे स्थलांतरण केले आहे.
पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीभागात रेमल चक्रीवादळ रविवारी सायंकाळी धडकले असून या भागात ताशी 110 ते 120 किमी वेगाने वारे वाहत होते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये – उत्तर आणि दक्षिण 24 परांगाना, कोलकाता, पूर्व मिदनापूर, हावडा, हुगळी येथे मुसळधार ते अतिवृष्टी होत आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळामुळे 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर या चक्रीवादळाने कहरच केला आहे. कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह वारे वाहत आहेत. अनेक भागात कमकुवत घरे, झाडे आणि विजेचे खांब कोसळले आहे. तसेच दिघा शहराच्या किनारपट्टीवरील समुद्राच्या भिंतीवर लाटा उसळताना दिसत आहेत.
या राज्यांना इशारा
रेमल चक्रीवादळ (Cyclone Remal) केंद्राभोवती सद्यपरिस्थितीत ताशी 110 ते 120 किमी वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा वेळ हा 135 किमी प्रति तासपर्यंत वाढू शकतो. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर आणि मिझोराम सरकारांने विविध सूचना जारी केल्या आहेत आणि राज्यातील सुरक्षा व्यवस्थांना अलर्टवर राहण्याचा इशारा दिला आहे.
लाखो नागरिकांचे स्थलांतर
पश्चिम बंगाल सरकारने या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. सुंदरबन आणि सागर बेटांसह किनारपट्टी भागातील 1.10 लाखांहून अधिक लोकांना बंगाल सरकारने सुरक्षित स्थळी हलवले असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या प्रत्येकी 16 बटालियन किनारी भागात तैनात करण्यात आले असून सागर बेट, सुंदरबन आणि काकद्वीप येथील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे, असं देखील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
रेमल चक्रीवादळामुळे येत्या 24 तासात हवामानावर आणखी परिणाम दिसून येतील. मात्र, महाराष्ट्रावर रेमल चक्रीवादळाचा थेट परिणाम होणार नसल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या केरळमध्ये मान्सून 31 मे च्या आसपास दाखल होऊ शकतो. तर, महाराष्ट्रात 10 ते 11 जूनच्या आसपास दाखल होऊ शकतो. मात्र, हवामानाचे पालटलेले चक्र पाहता महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास विलंब होऊ शकतो. काही तासातच रेमल चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) दिला आहे.