सध्या अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातच ‘चौध्रुवीय कोल’ स्थितीही निर्माण झाली आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र पणजीच्या आसपास स्थिर आहे. तर, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र मोंथा चक्रीवादळात रूपांतरित होण्याची चिन्हे आहेत. ते दक्षिण आंध्र, तेलंगणा किंवा तामिळनाडू, केरळकडे आगेकूच करू शकते. यामुळे राज्यासह देशभरच्या हवामानात मोठे बदल होत आहेत. उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात 28 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. शनिवारी कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई-ठाण्यालाही अलर्ट आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दोन दिवस यलो अलर्ट आहे. यंदा महानगरातील छंठ पूजा पावसाच्या सावटाखाली असणार आहे.

बदलत्या हवामानाने राज्यामध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने मुंबईसह राज्यातील अनेक शहरात किमान तापमानाचा पारा चढला आहे. त्यात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी वाढ नोंदविली जात आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे सकाळच्या वेळीही तीव्र उकाड्याची जाणीव होत आहे. यामुळे साधारणतः दुपारनंतर संध्याकाळच्या सुमारास पावसाची जास्त शक्यता निर्माण होते. दरम्यान, मच्छिमारांनी शनिवारी आणि रविवारी मासेमारीसाठी अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
एकाचवेळी 4 कमी दाबाचे क्षेत्र
ऑक्टोबरच्या अखेरीस पश्चिम किनाऱ्यावर काहीतरी नाट्यमय घडामोडी अपेक्षित आहेत. हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील हवामान उष्ण झाले असून एकाचवेळी 4 कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहेत, ते नकाशावर एक परिपूर्ण चौरस तयार करत आहेत. हिंदी महासागरात MJO म्हणजे मॅडेन ज्युलियन ऑसिलेशनद्वारे पाऊस पाडणारा ‘चौध्रुवीय कोल’ सॅडल पॉइंट दिसत आहे. त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर मान्सूनसारखे दिवस अपेक्षित आहेत.
दक्षिण भारतात उत्तर-पूर्व मान्सून ऑक्टोबरमध्ये सुरू होतो, ज्यामुळे बंगालच्या उपसागरातून ओलावा येतो. आणि महाराष्ट्रात पावसाला चालना मिळते. सध्या ही प्रणाली कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सक्रिय आहे.

महाराष्ट्रात “या” जिल्ह्यात असेल पावसाची शक्यता
• महामुंबई परिसरात शनिवारी, रविवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
• जळगाव जिल्ह्यात हवामान ढगाळ राहणार असून 25 ऑक्टोबर रोजी दुपारनंतर मध्यम ते जोरदार तर 27 ऑक्टोबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता.
• नाशिक जिल्ह्यात दोन दिवस हलक्या-मध्यम तर घाट क्षेत्र, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
• 25 ऑक्टोबर रोजी नाशिक, जळगांव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता.
• 26 ऑक्टोबर रोजी मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, संभाजी नगर, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता.
• 27 ऑक्टोबर रोजी धुळे, मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, संभाजी नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता.
• 28 ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेडमध्ये पावसाची शक्यता.

देशभरातील हवामान बदल
• केरळ किनारपट्टी, तामिळनाडू, पदुचेरीमध्ये मोंथा चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता.
• रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणात हवामान विभागाचा अलर्ट; तिरुपतीतही 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता.
• ओडिशात 27 ते 29 ऑक्टोबर पर्यंत अति मुसळधार पावसाची शक्यता.
• पूर्व उत्तर प्रदेशात 29-30 ऑक्टोबर रोजी मुसळधार तर पश्चिम युपीमध्ये थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता.
• दिल्ली महानगर क्षेत्रातही दोन दिवस पाऊस.
• राजस्थानात उद्यापासून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. आयएमडीकडून काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारी.
“एमजेओ” म्हणजे काय?
मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) ही एक उप-हंगामी वातावरणीय पद्धत आहे, जी उष्णकटिबंधीय पर्जन्यमानावर परिणाम करते. हा पावसाचा उष्णकटिबंधीय प्रवास आहे, जो हिंद महासागरावरून सुरू होतो आणि पूर्वेकडे सरकतो. पावसाच्या सरी आणि गडगडाटी वादळांचा हा समूह इंडोनेशिया आणि हिंद महासागरात विषुववृत्ताच्या बाजूने, ऑस्ट्रेलियाच्या वायव्येस एकत्र येतो. सामान्यतः 30 ते 60 दिवसांचा हा पुनरावृत्ती प्रवास असतो, जो कधी-कधी 90 दिवस लांबतो. वाढलेल्या आणि कमी झालेल्या पावसाचे आलटून पालटून कालावधी निर्माण करून जगभरातील हवामान पद्धतींवर “एमजेओ”चा परिणाम होतो. मान्सून आणि चक्रीवादळांसारख्या प्रमुख हवामान घटनांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. विशिष्ट ऋतूंमध्ये “एमजेओ”चा प्रभाव अधिक स्पष्ट किंवा “स्थिर” असू शकतो, ज्यामुळे जगाच्या एका भागात दीर्घकाळासाठी अधिक सुसंगत हवामान विसंगती निर्माण होतात.











