मुंबई : Cotton Rate… गत हंगामात कधी नव्हे तो विक्रमी दर मिळाला परिणामी यंदाच्या हंगामात लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात कापूस लागवडीखालील क्षेत्र दहा लाख हेक्टरने वाढले आहे.
कापसाच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली असली तरी देखील खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे तसेच परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील सर्व मुख्य पिकांसोबतच कापूस पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आणि उत्पादनात मोठी घट झाली. एका रिपोर्टनुसार पहिल्या 3 महिन्यात कापसाची आवक जवळपास 20.12 टक्क्यांनी कमी झाले आहे.
असा आहे अंदाज
देशात सन 2021-22 च्या तुलनेत सन 2022-23 च्या खरीप हंगामात कापसाचे पेरणीक्षेत्र 10 लाख हेक्टरनी वाढून ते 125 लाख हेक्टर झाले. या हंगामात पंजाब व हरयाणामध्ये गुलाबी बोंडअळीमुळे, तर सततचे ढगाळ वातावरण व अतिमुसळधार पावसामुळे मध्य प्रदेश व महाराष्ट्रात कपाशीचे किमान 45 टक्के, गुजरात, तेलंगणा व आंध्र प्रदेश या प्रमुख व मोठ्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये किमान 23 टक्के नुकसान झाले.
महाराष्ट्र व मध्य प्रदेशात उशिरा फलधारणा झाल्याने कापसाची वेचणी लांबणीवर गेली. त्यामुळे पेरणीक्षेत्र वाढूनही उत्पादनात घट होणार असल्याचे कृषिक्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे कापसाचे उत्पादन 300 लाख गाठींच्या आसपास स्थिरावणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
वाचा सीएआयचा अंदाज
सीएआयने 2022-23 मध्ये 375 लाख कापूस गाठीचे भारतात उत्पादन होईल असा अंदाज वर्तवला होता. यानंतर पुन्हा सीएआयने पूर्वीच्या अंदाजात बदल केला आणि कापूस उत्पादन 343 लाख गाठी होईल असा अंदाज वर्तवला. दरम्यान आता यामध्ये देखील घट होणार असल्याचा सीएआयचा अंदाज असून आता 339 लाख कापूस गाठीचे उत्पादन होणार असल्याचे सांगितलं जात आहे.
मागील पाच वर्षातील कापसाचे उत्पादन
मागील पाच वर्षाचा कापसाच्या उत्पादनाचा विचार केला तर 2017-18 साली कापसाचे विक्रमी उत्पादन झाले होते. 2017-18 साली कापसाचे 370 लाख गाठी इतके उत्पादन झाल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे. तर 2018-19 या वर्षात 333 लाख गाठी, 2019-20 मध्ये 365 तसेच 2020-21 मध्ये 352 लाख गाठी, तर 2021-22 मध्ये 307.60 लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले आहे.