जळगाव : हिवाळ्यात केळी बागेची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या ऋतूत तापमान कमी आणि हवामानात बदल होण्यामुळे केळीच्या झाडांवर थोड्या वेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. केळी हे उष्णकटिबंधीय पिक आहे आणि ती जास्त तापमानात आणि ओलट वातावरणात चांगली वाढते. हिवाळ्यात केळीच्या बागेतील उत्पादन आणि झाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी काही विशेष काळजी घेतली पाहिजे.
केळी हे उष्ण कटीबंधीय फळ असून त्यास साधारण उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. साधारणतः 15 ते 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचे तापमान या पिकास चांगले असते. हिवाळ्यात 12 सेंटीग्रेडचे खाली व उन्हाळ्यात 40 सेंटीग्रेडपेक्षा जास्त उष्ण हवामान असल्यास पिकावर अनिष्ट परिणाम होतो. केळीची पाने तापमान 60 सेंटीग्रेडपेक्षा कमी असल्यास पिवळी पडतात आणि 44 सेंटीग्रेडपेक्षा तापमान जास्त झाल्यास केळीची वाढ खुंटते. उन्हाळ्यातील उष्ण वारे व हिवाळ्यातील कडाक्याची थंडी या पिकाला हानीकारक असते.
हिवाळ्यातील व्यवस्थापन
बागेची सर्वसाधारण स्वच्छता राखावी, मुख्य खोडाशेजारी येणारी पिल्ले नियमित थारदार विळ्याने दर 3 आठवड्यानी कापावीत. झाडावरील रोगग्रस्त पाने कापून नष्ट करावीत.
वाफे भुसभुसीत ठेवावेत. ह्यासाठी बागेची टिचणी (कुदळीच्या सहाय्याने) करावी. झाडांना माती लावून आधार द्यावा.
मृगबाग केळीस लागवडीनतर 165 दिवसांनी द्यावयाचा प्रतिझाड 82 ग्रॅम युरीया व 82 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅशचा हप्ता द्यावा. सुक्ष्म अन्नद्रव्याची कमरता आढळल्यास तसेच पाने पिवळसर झाल्यास फवारणीतून खते द्यावीत.
रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. भल्या पहाटे बागेच चोहोबाजूस धुर करावा, यासाठी ओलसर काडीकचरा जाळावा
केळीफुल व घडातील अतिरिक्त फण्याची विरळणी करावी, विरळणीनंतर नरफूल व फण्या बागेतून बाहेर नेवून विल्हेवाट लावावी.
फण्याची विरळणी/केळ फुल काढणी केल्यानंतर धडावर प्रथम व्हर्टिसेलियम लेकॅनी 3 ग्रॅम/लिटर किंवा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. यानंतर ०.५ टक्के पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक १ टक्के युरियाच्या द्रावणाची फवारणी करावी.
फवारणी झाल्यानंतर घड २ ते ६ टक्के सच्छिद्रतेच्या १० गेज जाडीच्या पांढऱ्या प्लॅस्टिक पिशवीने झाकावेत.
ठिबक सिंचन यंत्रणेची वारंवार पाहणी करावी, योग्य वेळी दुरुस्ती करावी.
घड पोसत असतांना तो एका बाजूस कलतो, त्यास आधार द्यावा.
बागेभोवती वारारोधक कुंपन नसल्यास, झापा किंवा ७५ टक्के शेडनेट लावून येणारे थंड वाऱ्यापासून संरक्षण करावे.
जमिनीचे तापमान योग्य राखण्यासाठी वाफ्यात सेंद्रिय अथवा प्लॅस्टिक आच्छादन करावे.
कापणी योग्य घडाची कापणी करावी, घडाची कापणी झाल्यानंतर त्या झाडांची सर्व पाने कापून घ्यावीत.
सर्वसाधारणतः तापमान १६ अंश सें. च्या खाली गेल्यास पानाच्या देठाची लांबी कमी होऊन पाने जवळ-जवळ येतात, त्यामुळे नैसर्गिकरित्या घड बाहेर येण्यास बाधा निर्माण होते. घड अडकतो, असा घड बुंधा खोडून बाहेर येतो. हा घड सहसा पक्व होत नाही. त्यापूर्वी गळून पडतो. अशावेळी शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्ये व पाणीपुरवठा करावा.
करपा अर्थात सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागण्याची शक्यता असते, बागेच्या सर्वसाधारण स्वच्छतेसोबत स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.
नवीन लागवड केलेल्या कांदेबाग केळीबागेत नांग्या भराव्यात, विषाणूजन्य रोपे समुळ उपटून नष्ट करावीत, नवीन बागेस शिफारसीप्रमाणे प्रतिझाड ८२ ग्रॅम युरीया, २५० ग्रॅम सिंगल सपर फॉस्फेट व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा द्यावी.
(सौजन्य : ॲग्रोवर्ल्ड प्रकाशन)
शेतीतून लाखोंचे उत्पन्न | #farming #bananafarming