(चिंतामण पाटील)
जळगाव – मंजुरी मिळून 18 वर्षे उलटल्यानंतर मांजरपाडा धरणाचे पाणी 200 किलोमीटर प्रवास करून येवला तालुक्यात पोहोचले. यासाठी मेहनत घेतली ती छगन भुजबळ यांनी..! हे ताजे उदाहरण पाहता उठसुठ पेव्हर ब्लॉकची मागणी आता आपण थांबवू आणि खान्देशातील आमदार खासदारांकडे गुजरातमार्गे समुद्रात वाहून जाणारे नार-पार चे पाणी गिरणा नदीत वळविण्याच्या योजनेसाठी ताकद लावा तसेच राज्यातही जागोजागी नदीजवळ प्रकल्पासाठी आग्रही भूमिका घेऊ या. अर्थात यासाठी लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी, प्रबळ इच्छाशक्ती व चिकाटी आणि सातत्याने केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरेल.
उर्वरित पाणी वैजापूर , संभाजीनगरला देणार : भुजबळ
येवलेवासियांना दिलेल्या शब्दाची स्वप्नपूर्ती झाल्याचा मनस्वी आंनद असून यापुढील काळातही पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही तसेच मांजरपाडा प्रकल्प केवळ पूर पाण्यावर थांबणार नसून पार-गोदावरी उपसा जोड योजना क्र. ३ व ४ च्यार माध्यमातून पार खोऱ्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे ५०० मीटर पर्यंतच्या लेवलचे ५ टी.एम.सी. पाणी लिफ्ट करुन ते मांजरपाडा मध्ये आणणार आहोत. हे पाणी पूणेगांव दरसवाडी मार्गे येवल्याला आणणार असून येवल्याची पाण्याची गरज भागवून उर्वरित पाणी वैजापूर , संभाजीनगरला सुद्धा देणार आहोत असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मांजरपाडा योजनेची वैशिष्ट्ये
* पश्चिम वाहिनी नदीचे पाणी अडवून ते वळण योजनेद्वारे पूर्व वाहिनी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविणारा राज्यातील पहिला प्रकल्प
* ३ हजार ४५० मीटर लांबीचे धरण
* १० किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविले
* येवलासह निफाड, दिंडोरी, चांदवड
समुद्रात वाहून जाणारे पाणी आता मांजरपाडा प्रकल्पात
लोकांसाठी काम करतांना सरकारकडून योजना कशा मंजूर करून घ्याव्यात, प्रशासनाकडून काम कसे करून घ्यावे, याचे हे आदर्श उदाहरण किमान या प्रकल्पाच्या माध्यमातून तरी छगन भुजबळ यांनी दाखवून दिले आहे. गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या खान्देशातील शेतकऱ्यांसाठी अशा नेतृत्वाची गरज लागणार आहे. गुजरातमार्गे समुद्रात वाहून जाणारे पार नदीचे पाणी मांजरपाडा प्रकल्प साकारून, 10 किमी बोगदा खणून ते पुणेगाव धरणात सोडण्यात आले. पुढे ते कॉंक्रीटने बांधकाम केलेल्या कालव्याद्वारे येवल्या तालुक्यात 27 ऑगस्टला आले.
पश्चिम वाहिनी नदीचे पाणी अडवून ते वळण योजनेद्वारे पूर्व वाहिनी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्यासाठी उपमुख्यमंत्री असतांना श्री. भुजबळ यांनी प्रयत्न केला. त्यामुळे जलसंपदा विभागाने दिनांक 24 नोव्हेंबर 2006 ला मांजरपाडा या महत्त्वकांक्षी योजनेला मंजुरी दिली. पश्चिम वाहिनी, पूर्व वाहिनी खोरे दुभाजक, रेषाच्या पश्चिम बाजूला वाहत जाणारे, छोटे छोटे नाले तीव्र उतार सुरू होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडवून त्याचा सांडवा पूर्व बाजूला काढून सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पूर्व दिशेला गोदावरी खोऱ्यात वळवणे, असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. गुजरातमधून समुद्रामध्ये वाहून जाणारे हे पाणी गोदावरी खोऱ्यात पूर्वेकडे वळविणारी ही राज्यातील यशस्वी झालेली पहिली योजना आहे.
मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत दिंडोरी तालुक्यातील देवसाने गावाच्या खालील बाजूस पाणी अडवून हे पाणी बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाच्या वरील बाजूस, ऊनंदा नदीत सोडण्यात आले आहे. या योजनेद्वारे 606 दशलक्ष घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. या प्रकल्पांमधील मांजरपाडा धरणाची एकूण लांबी 3 हजार 450 मीटर असून धरणाच्या लांबीत एकूण 12 नाले अडवण्यात आले आहेत. एकूण 10.16 किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे पुढे हे पाणी उनंदा नदीच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणले आहे.
शेतकऱ्यांना लाभ
मांजरपाडा वळण योजनेमुळे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, निफाड, येवला या तालुक्यांना पाणी उपलब्ध झाले असून यामुळे येथील क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांन सुद्धा वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात आल्याने प्रकल्पाच्या जवळच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
तालुक्याला लाभ होणार
भुजबळांचा महत्वकांक्षी असलेला मांजरपाडा प्रकल्प हा ऑक्टोबर 2014 पासून रखडला होता. भुजबळ पालकमंत्री असताना त्यासाठी त्यांनी निधी, सर्व तरतुदी व मान्यता पूर्ण केल्या होत्या. मात्र शासनाने या प्रकल्पाचा निधी इतरत्र वळवला होता. भुजबळ यांनी मात्र चिकाटी सोडली नाही व वारंवार पाठपुरावा केला. प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून घेतला व प्रकल्प पूर्ण करून घेतला.
अखेर 27 ऑगस्ट रोजी पुणेगाव धरण्यातील कालव्याद्वारे मांजरपाडा धरणातले पाणी 200 किमी प्रवास करून येवला तालुक्यात पोहोचले. अशक्य ते शक्य झाल्याने लोकांनी आनंद व्यक्त केला. पार नदीचे पाणी दीड तपानंतर आपल्या मतदार संघात आणण्याचा संकल्प भुजबळ यांनी पूर्ण करून दाखविला.
नार – पारची फक्त घोषणा नको, ठोस कृती देखील हवी..; खान्देशातील लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घ्यावी
जळगाव, धुळे जिल्ह्यातील नागरिक नार – पारचे पाणी गिरणा खोऱ्यात आणण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधीकडे हट्ट करूया. किंबहुना खरंतर ही लोकप्रतिनिधींचीच जबाबदारी आहे. चौकात बसविल्या जाणाऱ्या पेव्हरब्लॉकवर खुश होऊ नका तर नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नार-पार प्रकल्पाची घोषणा केली. तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडे व या सर्व लोकप्रतिनिधींनी स्वतःची जबाबदारी ओळखून शासनाकडे पाठपुरावा करावा.
भुजबळ यांनी अव्यवहार्य ठरलेला प्रकल्प जर शक्य करून दाखविला तर तसाच केंद्राने अव्यहार्य ठरवलेला नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प यशस्वी होऊ शकतो, हे आगामी काळात दिसेल, अशी आशा आहे. मात्र, पेव्हरब्लॉक वर आपली बोळवण करणाऱ्या आपल्या लोकप्रतीनिधींकडे नार-पारचे पाणी गिरणेत आणाच अशी आग्रही व वेळप्रसंगी आक्रमक भूमिका आता शेतकरी तसेच नागरिकांनी घेण्याची गरज आहे.
चिंतामण पाटील
मो. 8788350787