अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते हळूहळू मजबूत होऊन तेज चक्रीवादळ बनू शकते. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरातही लवकरच नवीन कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. त्यातून आणखी एक चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे, असे “स्कायमेट”ने म्हटले आहे. दुसरीकडे, हिमालयापासून केरळपर्यंत सध्या पाऊस सुरू आहे.
भारतीय उपखंडात एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण होत आहेत. एक अरबी समुद्रात आणि दुसरे बंगालच्या उपसागरात. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) त्याचे अनुमान वर्तविले आहे.
बंगालच्या उपसागरात दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात चक्रीवादळ सक्रिय होतात. ताज्या संकेतांनुसार, ददसऱ्यानंतर, शक्यतोवर 26-28 ऑक्टोबर दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश ते बांग्लादेश किनार्यापर्यंतच्या भागांवर आयएमडी बारकाईने लक्ष ठेवून आहे. या वादळाचे लक्ष्य क्षेत्र ओडिशा, पश्चिम बंगाल, बांगलादेश राहण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील चक्रीवादळाला तेज हे भारताने दिलेले नाव आहे. त्याचा अर्थ गतिमान असा आहे. तर बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाला हामन किंवा हॅमुन असे इराणने दिलेले नाव आहे. हा मूळ इराणी (पर्शियन) शब्द आहे. त्याचा अर्थ सपाट जमीन. इराणमधील एका महत्त्वाच्या तलावालाही हे नाव आहे.
हिमालयापासून केरळपर्यंत पडतोय पाऊस
दरम्यान, सध्या देशात हिमालयापासून केरळपर्यंत पाऊस सुरू आहे. कोकण किनारपट्टी आणि लगतच्या प्रदेशातही अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. पश्चिम हिमालयात पावसासोबतच पर्वताच्या वरच्या भागात बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडे अनेक ठिकाणी पाऊस होत असून तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप आणि किनारी कर्नाटकातही मध्यम ते मुसळधार पाऊस होत आहे.
आजही राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, किनारी कर्नाटक आणि तमिळनाडूच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस आणि काही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- तेज चक्रीवादळ महाराष्ट्र, गुजरातला धडकण्याची शक्यता
- राज्यात पुन्हा पावसाचे दिवस; अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीने येत्या काही दिवसांत थंड वारे वाहण्याची शक्यता