कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास उत्पादकतेत भरीव वाढ होऊन प्रति शेतकरी दरडोई उत्पन्न वाढण्याचे दुर्मिळ उदाहरण म्हणजे तेलंगणा राज्य होय..! तेलंगणा राज्याची पाच जून 2014 मध्ये निर्मिती झाली. मात्र अवघ्या नऊ वर्षात या राज्याने कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या सोयी सुविधांमुळे शेतकऱ्यांची उत्पादकता तर वाढलीच परंतु कृषी क्षेत्रापासून दूर गेलेला एक वर्ग पुन्हा या क्षेत्राकडे आकर्षित झाला. परिणामी, तेलंगणा राज्याच्या कृषी क्षेत्रात देखील 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. अवघे नऊ वर्षे वय असलेले तेलंगणा राज्य मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव व कृषिमंत्री निरंजन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी या पायाभूत सुविधा देऊ शकते तर मग महाराष्ट्रासह इतर राज्य सरकारांसाठी हा नक्कीच आदर्श ठरू शकतो. जाणून घेऊया तेलंगणा राज्याच्या कृषी क्षेत्रातील घोडदौडीविषयी…
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शेती व शेतकरी यांचे कल्याण आणि विकासासाठी अनेक योजना राबवल्या. ज्यामुळे तेलंगणा राज्य इतरांसाठी एक आदर्श राज्य बनले आहे. तेलंगणा राज्य सर्वाधिक 60 लाख एकर क्षेत्रावर कापूस या पिकाची लागवड करणारे तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धान उत्पादक आणि खरेदीदार म्हणून उदयास आले आहे. 2014 मध्ये धानची उत्पादन क्षमता 45 लाख टन होती आता यात मोठी वाढ होऊन 2021 मध्ये ही वाढ तीन कोटी टनवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे लागवड क्षेत्र 1.34 कोटी एकरवरून 2021 मध्ये 2.3 कोटी एकरवर पोहोचले आहे. राज्य स्थापनेपासून, राज्य सरकारने 97 हजार 924 कोटी रुपयांच्या धानाची खरेदी केली, असल्याची माहिती कृषीमंत्री एस निरंजन रेड्डी यांनी एका दैनिकाशी बोलतांना दिली आहे.
मोफत वीज उपलब्ध
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या दूरदृष्टीमुळे राज्य सरकारने विविध पाटबंधारे प्रकल्पांच्या उभारणीसाठी दीड लाख कोटींहून अधिक खर्च केला आहे. 28,473 कोटी रुपये खर्चून विजेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यासोबतच अखंडीत मोफत वीज उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी ते म्हणाले.
१७ हजार कोटी रुपयांची कर्ज माफी
तेलंगणा राज्य सरकारतर्फे रयथू बंधू योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकर्यांच्या बँक खात्यात जवळपास 50 हजार 448.16 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत तर 17 हजार 244 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यात आले आहे. सरकार राबवित असलेल्या विविध योजनांमुळे राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. आणि याचा परिणामी म्हणून दरडोई उत्पन्नात 103.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सहकारी संस्थांमार्फत बियाणे आणि खते
शेतकऱ्यांना प्राथमिक कृषी सहकारी संस्था (PACS) मार्फत बियाणे आणि खते पुरवण्याबरोबरच बनावट बियाणांचा पुरवठा करणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधक कायदा लागू करणारे तेलंगणा हे एकमेव राज्य ठरले आहे. तसेच राज्य सरकार अनुदानित किमतीत शेती उपकरणे आणि यंत्रसामग्री देखील पुरवत आहे. गोदामाची साठवण क्षमता 2013-14 मध्ये केवळ 4.17 लाख होती त्यातही मोठी वाढ करण्यात आली असून ती 2020-21 मध्ये 24.73 लाख टन इतकी वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य सरकार ऑइल पाम लागवडीसह पर्यायी पिकांनाही प्रोत्साहन देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.