प्रयत्न केले आणि जिद्द ठेवली तर कोणताही व्यवसाय यशस्वी करता येतो हे संगमनेर (जि. नगर) येथील विजय एकनाथ गुंजाळ यांनी दाखवून दिले आहे. दुध, ताकाची विक्री करतानाच त्यांनी पुदानायुक्त ताकाची विक्री सुरु केली आणि आता गेल्या सहावर्षांपासून पुदिनायुक्त ताक (मठ्ठा) विक्रीतून उत्पन्नाचा नवीन मार्ग शोधला. केवळ एक एकर शेती असताना सेंद्रिय पद्धतीने शेवगा लागवडीमध्ये पुदिन्याचे आंतर पीक घेण्याची पीकपद्धती यशस्वी केली. अल्पभूधारक विजय यांनी ताक विक्री आणि शेवगा लागवडीतून परिसरात आदर्श निर्माण केला आहे.
नगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुक्यातील अनेक गावांत दुष्काळी स्थिती असते. संगमनेर (जि. नगर) येथील विजय एकनाथ गुंजाळ हे अल्पभूारक शेतकरी. राजेश गुंजाळ, आणि अजित गुंजाळ अशा तिघं भावांचे कुटुंब. विजय गुंजाळ हे बारावी शिकलेले. तिघात मिळून एक एकर शेती. क्षेत्र कमी असल्याने वडील मजुरी करायचे. तिघा भावांनी वेगवेगळ्या मार्गाने रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला. मोठे भाऊ राजेश हे नगरपालिकेत कार्यालयीन निरीक्षक आहेत.दुसरे विजय असून तिसरे अजित हे भाजीपाला खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. विजय यांनी 2007 ते 2009 या काळात कंपोस्ट खत तयार करून ते विक्री करण्याचे काम केले. मात्र त्यात फारसा जम बसला नसल्याने त्यांनी येथील खासगी दूध संघाकडून दूध, ताक विक्री व अन्य उत्पादनाच्या वितरणाचे काम घेतले. तेव्हापासून त्यांनी संगमनेर रस्त्यावर ताक विक्री करण्याचे दुकान सुरू केले. तेथेच प्रयोग म्हणून त्यांनी पुदिनायुक्त ताक विकायचा निर्णय घेतला. विक्री सुरू केली आणि लोकही प्रतिसाद देऊ लागले. आज संगमनेरला येणारा प्रत्येक व्यक्ती हमखास नगर रस्त्यावरील स्पेशल पुदिनायुक्त ताकाचा आस्वाद घेतोच. त्यामुळे त्यांची सर्वदूर ओळख निर्माण झाली आहे.
पुदिनायुक्त ताकाची विक्री
ताक हे आरोग्यासाठी चांगले असते असे सांगितले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात गावगावांत ठिकठिकाणी ताक विक्री केली जाते. लोकही उन्हाळ्यात ताक पिण्याला आधिक महत्व देतात. विजय गुंजाळ यांनी साधारण सहा वर्षापूर्वी राजहंस दुधाची एजन्सी घेतली. आणि दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करतानाच ताकाची विक्री सुरु केली. काही दिवसात पुदिनायुक्त ताकाची विक्रीही सुरु केली. विजय गुंजाळ हे या भागात पुदिनायुक्त ताक विक्री करणारे एकमेव आहेत. या रस्त्यावरुन जाणारा प्रत्येकजण शक्यतो पुदिनायुक्त ताकाचा आस्वाद घेऊन जातो. काही लोक जाता- जाता घरी पार्सलही घेऊन जातात.
डोकेदुखी, त्वचा विकार, पोट साफ राहण्यासाठी, चांगले पचन होण्यासाठी वजनासंबंधी समस्यांवर हे पुदिनायुक्त ताक गुणकारी आहे. त्यामुळे लोकांची ताकाला पसंती असते असे, विजय गुंजाळ सांगतात. परिसरातील लोकही ताकाला अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. येथे पुदिनायुक्त ताक सेवनासाठी लोकांची गर्दी असते. एक अल्पभूधारक शेतकरी काय करु शकतो हे विजय गुंजाळ यांनी दाखवून दिले आहे. विजय गुंजाळ हे प्रतिलिटर वीस रुपये प्रमाणे ताक खरेदी केले जाते. त्यामध्ये पुदिना रस, काळे मिठ मिसळून दहा रुपये ग्लासप्रमाणे विक्री केली जाते. पार्सल असेल तर बॉटलमध्ये विक्री केली जाते. सुरवातीला साधारण पाच ते दहा लिटर ताकाची विक्री व्हायची, त्यात टप्प्याटप्प्याने वाढ झाली. आता दर दिवसाला साधारण शंभर ते दीडशे लिटर ताकाची गुंजाळ विक्री करतात. उन्हाळ्यात या ताकाला अधिक मागणी असते. बारमाही पुदिनायुक्त ताकाची विक्री सुरू असली तरी उन्हाळ्यात मागणी अधिक असते. उन्हाळ्यात साधारण तीनशे लिटरपर्यंत विक्री होते. एक लिटर ताकामागे साधारण सात ते आठ रुपये फायदा मिळतो. ताकनिर्मिती ते विक्रीपर्यंत विजय यांना कुटुंबातील सदस्यांची मदत होते. पुदिन्याचा रस काढण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. ताकात वापरण्यासाठी सुरवातीला ज्युसरमधून पुदिन्याचा रस काढाला जायचा. ताकाच्या मागणीत वाढ झाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी ज्यूस काढण्यासाठी हजार रुपयांचे मशीन विकत घेतले. दररोज साधारण तीन ते चार किलो पुदिन्याचा रस ताकासाठी लागतो.
एक एकर शेवगा लागवडीमध्ये पुदिन्याचे आंतरपीक
विजय यांनी एक एकर शेतीच्या जोरावर कुटुंब सावरले आहे. संगमनेर शहरालगत असलेली एकरभर शेती तिघा भावांची एकत्रित असली तरी शेतीचे व्यवस्थापन विजय हेच पाहतात. तीन वर्षांपूर्वी शेवग्याच्या कोइमतूर- 2 या वाणाची बारा बाय दहा फूट अंतरावर लागवड केली आहे. दोन वर्षांपासून उत्पादन मिळायला सुरवात झाली. शेवग्याची दररोज तोडणी केली जाते. शेवगा लागवडीमध्ये पुदिन्याची लागवड केली आहे. शेंगाची तोडणी, पुदिन्याची काढणी आणि अन्य मशागतीची कामे घरचे सदस्यच करतात त्यामुळे मजुरीवरील खर्च वाचतो.
पतसंस्थेचे कर्ज काढून विंधनविहीर घेऊन पाण्याची व्यवस्था केली आहे. संपूर्ण शेवग्याच्या झाडाला ठिंबक सिंचनाने पाणी दिले जाते. रासायनिक खतांऐवजी झाडांना गोमूत्र, गूळ, गाईचे शेण यांच्यापासून तयार केलेली स्लरी दिली जाते. त्यामुळे शेंगांची संख्या वाढली आहे, असे विजय गुंजाळ यांनी सांगितले. विजय गुंजाळ कुटुंब दररोज शेवग्याच्या शेंगाची तोडणी करतात. पहिल्यावर्षी प्रती झाड दहा ते पंधरा किलो उत्पादन मिळाले आणि प्रती किलोसाठी पंधरा रुपये दर मिळाला. दुसर्या वर्षी प्रती झाड 30 किलो उत्पादन मिळाले आणि किलोसाठी 75 रुपये दर मिळाला. तर तिसर्या वर्षी म्हणजे यंदा प्रती झाड पन्नास किलो पर्यंत उत्पादन मिळाले आणि किलोसाठी सरासरी 50 रु. दर मिळाला. शेंगाची तोडणी केल्यानंतर पन्नास किलोचे पॉकिंग करून माल मुंबईला पाठवला जातो. सेंद्रिय उत्पादन असल्याची खात्री पटल्याने शेवग्याच्या शेंगाना मागणीही चांगली आहे. सध्या विजय गुंजाळ यांनी शेवग्याच्या झाडाची छाटणी केलेली असून नवीन पीक धरण्यात येत आहे.
कमी क्षेत्र असून अधिक उत्पादनासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत. पुदिनायुक्त ताक विक्रीतून वेगळेपण दाखवत नावलौकिक मिळवला आहे. कमी पाण्यात सेंद्रिय पद्धतीने शेवग्याचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने मजुरीच्या खर्चात बचत केली आहे. गोमूत्र, शेणखत यासाठी एका देशी गाईचे संगोपन केले जाते. भविष्यात स्वतःच्या ब्रँडने ताकाची विक्री करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.
कमी क्षेत्र असल्याची अनेकांना खंत असते. त्यात पाणी नाही, दुष्काळामुळे अनेकांना अडचणीला सामोरे जावे लागते. एकरभर क्षेत्रातून प्रयत्न आणि कष्टातून मी प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. पुदिनायुक्त ताक विक्रीची सर्वप्रथम या भागात सुरवात केली. आजे हे ताक लोकप्रिय झाले आहे. ताक पिणे शरीरासाठी फायद्याचे आहे.
विजय गुंजाळ,