मधमाश्यांच्या वसाहती मानवी वस्तीसाठी सर्वार्थाने फलदायी ठरतील; तसेच मधमाशीजन्य उत्पादनांपेक्षाही परागीभवनाचा लाभ पीकवृद्धीसाठी लाखमोलाचा असतो, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. या दृष्टिकोनातून मधमाशी पालन आणि संवर्धनासाठी कृषी उद्योगाशी निगडित सर्व संस्थांचे समायोजन करणे गरजेचे ठरते. दि. 20 मे हा ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्ताने हे विचारमंथन…
मधमाशी हा निसर्गाने तयार केलेला अत्यंत हुशार, कार्यक्षम तसाच शिस्तबद्ध काम करणारा एक छोटासा कीटक. मधमाशी फुलांपासून परागकण- मकरंद गोळा करून आपला उदरनिर्वाह करते; परंतु हे सर्व करत असताना ती सर्वात महत्त्वाचे कार्य करते ते म्हणजे पिकांचे परागीभवन. पिकांचे परागीभवन झाल्यामुळेच आज सर्व सजीवांना अन्नधान्याचा पुरवठा होतो. म्हणजेच निसर्गाने मधमाशीला पिकांचे पुनर्जीवन- प्रजनन आणि उत्पादन यासाठीच तयार केले आहे. या कीटकापासून मानवाला- निसर्गाला कोणताही त्रास तर होत नाहीच, उलट त्याच्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढच होते.
‘मधुक्रांती’साठी एकात्मिक नियोजनाची गरज
कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संशोधन संस्था, शिक्षण संस्था तसेच विस्तार संस्थांनी एकत्रित प्रयत्न करून या व्यवसायाचा विकास करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे हरितक्रांती, धवलक्रांती, नीलक्रांती आणि फलोत्पादन क्रांतीतून शेती उत्पादन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन वाढले त्याप्रमाणेच ‘मधुक्रांती’च्या माध्यमातून मधमाशी पालनाचा वेग वाढवून मध आणि इतर पदार्थांचे उत्पादन वाढवता येईल. त्याबरोबरच पिकांना परागीभवनाची सेवा देण्यासाठी मधमाश्यांच्या वसाहती भाडेतत्त्वावर देऊन शेतीच्या उत्पादनात वाढ साध्य करता येईल. या माध्यमातून पुढील 20-30 वर्षांत फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्यास वाव आहे.
देशामध्ये ‘मधुक्रांती’ सुरू झालेली असून, मधाचे जे उत्पादन 2005-06 मध्ये 35,000 टन होते, ते आज 1.30 लाख टनांपर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच मागील 15 वर्षांमध्ये मधाच्या उत्पादनात 3.5 पट वाढ झाली आहे. यामुळे जागतिक पातळीवर भारत आता पाचव्या क्रमांकावरील मध उत्पादक देश झाला आहे. मधाचे वाढलेले उत्पादन ही निश्चितच एक चांगली बाब आहे. परंतु आपण मधमाशी पालनामध्ये फार मोठी प्रगती केली, असे नक्कीच म्हणता येणार नाही; याचे कारण जागतिक आकडेवारीवरून काही बाबींचा नक्कीच विचार करण्याची गरज आहे. जागतिक सर्वेक्षणानुसार असे दिसते की, जगातील एकूण 9.22 कोटी मधमाश्यांच्या वसाहतींपैकी आपल्या देशात 1.30 कोटी वसाहती आहेत. मधमाश्यांच्या वसाहतींच्या संख्येचा विचार केला तर भारत हा पहिल्या क्रमांकावरील देश आहे. परंतु भारताचे मधाचे उत्पादन मात्र फक्त 1.25 लाख टन आहे. मधमाश्यांच्या वसाहतींच्या बाबत आपण पहिल्या क्रमांकावर पण मधाच्या उत्पादनात मात्र आपण जगात पाचव्या क्रमांकावर आहोत.
महाराष्ट्रातील एकूण 45,000 गावांचा विचार केला आणि प्रत्येक गावामध्ये मधमाश्यांच्या 50 वसाहती ठेवल्या तरी जवळ जवळ 20 लाख मधमाश्यांच्या वसाहती राज्यामध्ये ठेवता येतील. राज्यातील 174 लाख हेक्टरपैकी 100 लाख हेक्टर क्षेत्रावर मधमाशीला उपयुक्त असलेला फुलोरा मिळाला- आणि हा फुलोरा एक-दोन महिने मधमाशीला उपयुक्त होईल, असा विचार केला तरी वर्षातील प्रत्येक महिन्यात कमीत कमी 4 ते 5 लाख हेक्टर फुलोरा उपलब्ध होईल. चार लाख हेक्टर फुलोरा आणि प्रतिहेक्टरी मधमाश्यांच्या पाच वसाहती असा विचार केला तरी जवळ जवळ 20 लाख वसाहतींचे संवर्धन राज्यामध्ये करता येईल.
प्रतिवसाहत 10 किलो मधाचे उत्पादन धरले तरी महाराष्ट्रामध्ये 2 लाख टन मधाचे उत्पादन मिळू शकेल. तसेच पिकांच्या उत्पादनांत हेक्टरी 5000 ची वाढ झाली तरी राज्याला शेती उत्पादनांमधून 2000 ते 3000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात मधमाश्यांच्या वसाहती तयार करणे, पेट्या तयार करणे, त्यांचे संगोपन करणे, मध आणि इतर पदार्थांचे उत्पादन घेणे, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था करणे याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 20 ते 25 हजार व्यक्तींना रोजगार मिळू शकतो. तरुणांना या व्यवसायामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी उद्युक्त करावे. मधमाशी पालनासाठी क्लस्टर तयार करून प्रक्रिया, विक्री व्यवस्था तसेच मधमाश्यांच्या वसाहती, मधपेट्या यांसह आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये ‘मधुक्रांती’ होईल. यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध आणि कालबद्ध प्रयत्न मात्र करावे लागतील.
डॉ. भास्कर गायकवाड
(संपादक : ‘पूर्वा कृषिदूत’)
मो. 9822519260
[email protected]