मुंबई ः निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. वाढत्या खर्चामुळे शेती करणे परवडेनासे झाले आहे. अशातच अनुदानीत खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करण्यासंदर्भात केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मंडविया यांना नुकतेच पत्र दिले आहे. त्यावर केंद्रीय मंत्री काय निर्णय घेतात, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
खतांच्या वाढलेल्या किमती संदर्भात केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी मंत्री भुसे यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे. पत्रातील महत्त्वाचे मुद्दे असे ः खत उत्पादकांनी राज्यात ६ डिसेंबर २०१९ रोजी घोषित केलेल्या दरानुसार खताची विक्री करावी. सुरळीत पुरवठा राखण्यासाठी आणि खतांचा संतुलित वापर याला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पावले केंद्रसरकारने उचलावीत. रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी केली आहे. १०:२६:२६ हे खत १७० रुपयांनी वाढले आहे. याशिवाय १२:३२:१६ हे खत १५० रुपयांनी, १६:२०:० हे १३ रुपयांनी, अमोनियम सल्फेट १२५ रुपयांनी, १५:१५:१५ खत १९५ रुपयांनी वाढले आहे.
निर्णयाकडे शेतकर्यांचे लक्ष
दरम्यान, खतांच्या वाढीव किमती कमी करण्यासंदर्भात सध्याची परिस्थिती पाहता, केंद्र शासन अनुकूल दिसत नसले तरी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी पाठवलेल्या पत्रानुसार काही प्रमाणात तरी खतांच्या किमती कमी होतील, असा शेतकर्यांना विश्वास वाटतो. त्यामुळे या संदर्भात केंद्रीय मंत्री काय निर्णय घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.