पुणे : दररोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्यकांद्याला वर्षभर मोठ्या प्रमाणात मागणी असतेबर्याचदाबाजारात मागणी आणि पुरवठा यात तफावत असते. ज्यामुळे कांद्यांचे भाव अस्थिर असतात. त्यामुळे कांदा शेतकर्यांना कधी हसवतो तर कधी रडवतो देखील. असे असले तरी शेतकरी कांद्यांची लागवड केल्याशिवाय राहत नाही. कांदा लागवडीपासून प्रत्यक्ष कांदा उत्पादन हाती येईपर्यंत काय काळजी घ्यावी व कांदा लागवडीचे व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती शेतकर्यांना असणे अत्यंत गरजेचे आहे.
कांदा लागवडीचा हंगाम
रब्बी हंगामात कांद्याची लागवड करणे जास्त फायद्याचे ठरते. कांदा लावल्यापासून काही दिवस कांद्याला थंड हवामान हवे असते. त्यानंतर कांद्याची वाढ होताना हवामानातील तापमान हे थोडे जास्त असेल तर कांद्याच्या कंद वाढीला त्याचा फायदा होतो. महाराष्ट्रात खरीपासह उन्हाळी हंगामातही कांदा लागवड केली जाते. खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात लागवड करावी तर उन्हाळी हंगामात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी. कांदा लागवडीसाठी मध्यम ते कसदार जमीन उपयुक्त ठरते. ही जमीन पाण्याचा निचरा करणारी व भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये सेंद्रिय घटक चांगल्या प्रमाणात असावेत, ज्यामुळे कांदा पिकाची उत्तम वाढ होते. लागवडीसाठी जमीन तयार करताना उभी आडवी नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडून घ्यावी व ती भूसभुशित करावी. जमिनीत एकरी १५ टन शेणखत टाकावे, जेणेकरुन कांद्याला आवश्यक असलेले सेंद्रिय घटक जमिनीत उपलब्ध होतात.
बियाणांची निवड
खरीप व रब्बी हंगामासाठी बसवंत ७८० ही जात योग्य मानली गेली आहे. या जातीचा रंग गडद लाल असतो. कांदे आकाराने मध्यम ते मोठे असतात. ही जात शंभर ते ११० दिवसात तयार होते. त्यापासून हेक्टरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटल उत्पादन मिळते. खरीप हंगामासाठी एन- ५३ ही जात योग्य ठरते. हा कांदा १०० ते १५० दिवसांत तयार होते. या जातीचा रंग लालभडक असतो. हेक्टरी उत्पादन २०० ते २५० क्विंटल मिळते. रब्बी हंगामासाठी एन-२-४-१ ही जात योग्य मानली गेली असून रंग भगवा व विटकरी असतो. हा कांदा आकाराने मध्यम गोल असतो. त्याची साठवणूक केली तर हा कांदा अतिशय चांगल्या प्रकारे टिकतो. ही जात १२० ते १३० दिवसात तयार होऊन त्याचे हेक्टरी ३०० ते ३५९ क्विंटल उत्पादन मिळते. याशिवाय पुसा रेड जातीचाही कांदा लागवडीसाठी योग्य ठरतो. एका एकरमध्ये कांद्याचे ४ ते ४.५ किलो बियाणे आवश्यक असते.
अशी करावी लागवड
कांदा लागवड ही वाफा पद्धतीने किंवा सरी पद्धतीने करता येते. मात्र, त्याआधी कांद्याची रोपे तयार करणे महत्वाचे आहे. गादी वाफे तयार करून त्यामध्ये कांद्याची रोपे तयार करावीत. जेथे गादी वाफे तयार करायचे आहेत ती जमीन व्यवस्थित नांगरून व कुळवून घ्यावी व मग त्या ठिकाणी एक मीटर रूंद ३ मीटर लांब १५ सेंटीमीटर उंच वाफे बनवावेत. या वाफ्याच्या रूंदीशी समांतर अशा ५ सेंमी बोटाने रेषा पाडाव्यात आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे. बी उगवून येईपर्यंत झारीने पाणी घालावे व बी उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे. रोपांना हरबर्याच्या आकाराची गाठ तयार झाली, की ते लागवडीसाठी तयार आहेत असे समजावे. खरीप हंगामातील कांद्यांची रोपे ही ६ ते ७ आठवडयांनी तर रब्बी हंगामात लागवड केलेली रोपे ही ८ ते ९ आठवडयांनी तयार होतात. रोपे काढण्याआधी २४ तास गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे.
खत व पाणी व्यवस्थापन
कांदा पिकास हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फूरद व ५० किलो पालाश लागवडीच्या वेळी घ्यावे. त्यानंतर १ महिन्याने ५० किलो नत्र प्रति हेक्टरी दयावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्वाचे असते. खरीप हंगामात १० ते १२ दिवसाच्या अंतराने तर उन्हाळी रब्बी हंगामात ६ ते ८ दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावे. आंतरमशागतीमध्ये रोपांच्या लागवडीनंतर शेतात तण दिसल्यास हलकी खुरपणी करावी. काढणीपूर्वी ३ आठवड्यांअगोदर पाणी बंद करावे म्हणजे पानातील रस कांद्यामध्ये लवकर उतरतो.
रोग व कीड व्यवस्थापन
कांद्यांवर करपा, फुलकिडे अशा रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव आढळतो. करपा रोगामुळे कांदा पातीवर लांबट गोल तांबूस चट्टे पडतात व शेंड्यापासून पाने जळाल्यासारखी दिसतात. फुलकिडे कांदा पातीवरील तेलकट पृष्ठभागात खरडतात व त्यात स्त्रवणारा रस शोषतात. त्यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधांची फवारणी केल्यानंतर फुलकिडे व करपा रोगावर नियंत्रण मिळवता येते.