मुंबई : येथील प्रादेशिक हवामान केंद्राने यापूर्वीच व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तूरळक ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस झाला. अजूनही वातावरणात थंडीची तीव्रता कमी झालेली नाही. अजूनही काही तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अशा वातावरणाचा गुरांवर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी त्यांची योग्य काळजी घेणे हितावह ठरणार आहे.
बहुतांश शेतकर्यांकडे गुरे असतात. बरेच जण गुरांची व्यवस्था शेती किंवा घराच्या परिसरात करतात. वाढत्या थंडीचा जसा मानवाला त्रास होऊ शकतो, तसा त्रास गुरांनाही होत असतो. त्यामुळे वाढत्या थंडीत जनावरांना उघड्यावर सोडू किंवा बांधू नये. त्यांच्या निवार्याच्या ठिकाणीच बांधावे व ही जनावरे पावसात भिजणार नाहीत, याची काळजी घ्यावी. पाऊस सुरु होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला त्यांना थांबवू नये. थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळ्या, मेंढया तसेच कोंबड्यांच्या शेडला बारदाणाचे पडदे लावणे फायद्याचे ठरते. त्यामुळे पहाटेच्या थंड वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण होते. विशेषतः कोंबड्यांच्या शेडमध्ये विजेचे बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधता गोठ्यातच बांधावे.
प्रतीक्षा संपली ॲग्रोवर्ल्ड तर्फे सेलम हळद जळगावात दाखल… वितरण सुरू…
जंतू निर्मुलन वेळेकर करावे
थंडीच्या दिवसांमध्ये गुरांच्या नाकातून आणि डोळ्यांतून पाणी येते. तसेच त्यांची भूक देखील कमी होते. थंडीत जनावरे थरथर कापतात. अशा कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आली तर तातडीने जनावरांच्या गोठ्यात कोरडे वातावरण निर्माण करावे. गोठ्यामध्ये स्वच्छता करावी. शक्य झाल्यास, जंतुनाशके गोठ्यात फवारावी आणि गोठ्याची स्वच्छता करावी, जेणेकरून जनावरे आजारी पडणार नाहीत. तसेच जनावरांना स्वच्छ पाणी आणि सुका चारा द्यावा. ओल्या चाऱ्याचे प्रमाण कमीच ठेवावे. जनावरांचे आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी जनावरांना स्क्रॅपिंग, गळा दाबणे, लंगडी, चेचक अशा प्रकारच्या लसी द्याव्यात. थंडीच्या दिवसात वासरांना खोकला, न्यूमोनिया, खोकल्याशी संबंधित आजार असल्यास पशुवैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घेऊनच जनावरांना औषधे द्यावीत. दुभत्या जनावरांना या आजारापासून वाचवण्यासाठी दूध काढल्यावर त्यांची कास जंतुनाशकाने धुवावी आणि स्वच्छ करावी. गुरांच्या संदर्भात केलेले दुर्लक्ष बर्याचदा त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे गुरांमध्ये कुठल्याही आजाराची लक्षणे जाणवल्यास, तातडीने सरकारी किंवा खासगी गुरांच्या डॉक्टरांना दाखवून योग्य ते उपचार करावेत.