जळगाव – खरीप हंगामातील उत्पादनाबाबतचे सर्व आराखडे हे हुकलेले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे एकाही पिकाचे शाश्वत उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. आता शेतकऱ्यांची भिस्त तोडणीवर आलेल्या तुरीच्या शेंगांवर आहे. मात्र, या पिकालाही सध्याच्या ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागत आहे. सध्या तूर ही फुलोऱ्यात तर कुठे शेंग लागणीच्या अवस्थेत असतानाच शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
प्रतीक्षा संपली ॲग्रोवर्ल्ड तर्फे सेलम हळद जळगावात दाखल… वितरण सुरू…
अळीचा थेट शेंगांवरच हल्ला
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सकाळी मोठ्या प्रमाणात धुके आणि दिवसभर ढगाळ वातावरण असाच काहीसा प्रकार पहावयास मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग पाठोपाठ खरिपातील तुरही धोक्यातच आहे. अतिवृष्टीचे पाणी शेतामध्ये साचून राहिले होते. त्यामुळे वाढ खुंटून तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता थेट शेंगावरच हल्ला चढवला जात असल्याने उत्पादनाचे काय होणार याची भिती शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र, योग्य व्यवस्थापन केले तर आतापर्यंत सांभाळल्या तुरीला शेंगा अवस्थेतही सांभाळता येईल.
अशा प्रकारे होते पिकाचे नुकसान
फुलगळती आणि शेंग पोसण्याची अवस्था म्हणजे तूर ही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, फुलगळती सुरु झाली की थेट परिणाम हा उत्पादनावर होतो. तर शेंग पोखरणारी अळी ही फुल, कळी आणि शेंग याचे नुकसान करते. या अळीने अंडी घातल्यास किडीचा प्रादुर्भाव वाढून शेंग व्यवस्थित भरत नाही. तुरीच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेतच जर किडीचा प्रादुर्भाव वाढला तर मात्र, शेंग चांगल्या प्रकारे पोसली जात नाही परिणामी उत्पादनावर त्याचा परिणाम होतो.
फुलगळवर उपाययोजना..
खरिपातील तूर ही एक तर फुलोऱ्यात किंवा शेंग लागण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे फुलगळ जर होत असेल तर शेतकऱ्यांनी नॅप्थॅलिक अॅसिटिक अॅसिड 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेंग पोखरणारी अळीचा बंदोबस्त..
फुलगळती बरोबरच शेंग पोखरणाऱ्या अळीचाही धोका मोठा आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी क्विनॅालफॅास हे 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. जर किडीचा प्रादुर्भाव अधिकच असेल तर मात्र, इमामेक्टिक बेंझोएट 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. शेंग पोसण्याच्या अवस्थेत तूर असेल तर फ्ल्युबॅडामाइड 3 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे.
आणखीन दोन दिवस धोक्याचे
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदल हा नुकसानीचा ठरत आहे. दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या या बदलाचा थेट परिणाम शेती पिकावर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सदैव सतर्क तर रहावेच लागत आहे. पण किड व्यवस्थापनासाठी अधिकचा खर्चही करावा लागत आहे. अजून तीन दिवस असेच ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर मात्र, ढगाळ वातावरण कमी होऊन थंडीत वाढ होणार असल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॅा. के. के. डाखोरे यांनी सांगितले आहे.