जळगाव – केळी पिकाच्या एकूण तीन प्रकारच्या बागा सध्या उभ्या आहेत. त्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. केळी पिकाचे व्यवस्थापन योग्य तर्हेने, विशेष काळजी घेऊन करावे.
बागेत नियमितपणे करावयाची कामे
केळी बागांची सर्वसाधारण स्वच्छता राखावी. बाग तणमुक्त ठेवावी. मुख्य खोडाभोवती येणारी पिल्ले (पील) धारदार विळीने तिरकस छेद देत नियमित कापावी. केळीची हिरवी, पिवळी तसेच कोरडी पाने कापू नये. फक्त रोगट पाने किंवा पानांचा भाग कापून जाळून नष्ट करावा.
मोठ्या बागेची टिचणी-बांधणी करावी. लहान बागेत कुळव चालवून माती भुसभुशीत करावी. वाफ्यातील तडे बुजले जातील, असे बघावे. यामुळे कमी तापमानामुळे मुळ्यांना होणारी इजा टाळली जाऊन, जमिनीत हवा पाणी गुणोत्तर योग्य राहते.
खते व पाणी व्यवस्थापन
लागवडीनंतर ७५ दिवसांनी नवीन कांदे बागेस प्रति झाड ८२ ग्रॅम युरियाची मात्रा द्यावी, तर मृगबागेस लागवडीनंतर २१० द्यावयाची प्रति झाड ४० ग्रॅम युरियाच्या मात्रेची सिद्धता करावी. खते शक्यतो ठिबकद्वारेच द्यावीत. ज्यांच्याकडे ठिबक नाही त्यांनी वाफसा असताना खते द्यावीत. खते कोरून किंवा बांगडी पद्धतीने देऊन झाकावीत.
पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे. पीक वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे. कापणीत असलेल्या कांदे बागेस प्रतिदिन, प्रतिझाड २५ ते ३० लिटर पाणी द्यावे. लहान कांदेबागेस ८ ते १० लिटर पाणी प्रतिदिन/झाड द्यावे. मृगबागेस १८ ते २० लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिन द्यावे. शिफारशीत पाणी मात्रा रोज द्यावी. या थंडीच्या काळात रात्रीच्या वेळेस किंवा भल्या पहाटे पाणी द्यावे. ठिबक सिंचन यंत्रणेची नियमित पाहणी करावी. नादुरुस्त असल्यास वेळेवर दुरुस्ती करावी.
थंडीत बागेची काळजी
थंडी वाढल्यास, भल्या पहाटे बागेत ओला कचरा जाळून धूर करावा. बागेभोवती सजीव कुंपण नसल्यास कापसाच्या काड्या, तुरकाड्या तसेच बाजरी किंवा मकाच्या काड्या वापरून झापा तयार कराव्यात. अशा झापा बागेभोवती पश्चिमोत्तर लावून बागेचे थंड वार्यापासून संरक्षण करावे. अशा पद्धतीने केळी बागेची योग्य काळजी घेतल्यास कमी तापमानाचा बागेवर विपरीत परिणाम होणार नाही. कापणीयुक्त घडाची काढणी करावी. शक्यतो सकाळच्या वेळी केळीची कापणी करावी.