निलेश बोरसे, नंदुरबार (प्रतिनिधी):- अहमदनगर जिल्ह्यातील नागरदेवळे गावात अपूर्वा सुहास तोरडमल या उच्चशिक्षित महिलेने जिद्दीच्या जोरावर केवळ 625 फुटाच्या प्लॉटमध्ये मशरुमची यशस्वी शेती करुन उद्योग क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्या दर महिन्याला सुमारे 40 किलो तर वर्षाला 400 ते 500 किलो मशरुमचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे त्या केवळ उत्पादन घेऊन थांबलेल्या नाहीत, तर मशरुमपासून पापड, पावडर, इंस्टंट करीज, चॉकलेट व नाचणी कुकीज् अशा विविध उत्पादने त्यांनी तयार केली आहेत. त्यांनी स्वतःच्या कंपनीची स्थापना करुन बचत गटातील महिलांच्या हातालाही काम दिले. त्यांच्या उत्पादनांना केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर दुबईतूनही मागणी आहे. मशरुम उत्पादनातून पहिल्याच वर्षी सुमारे 5 ते 6 लाख रुपयांची वार्षिक उलाढाल त्यांची झाली. येत्या काळात आपला उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन अधिकाधिक महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा मानस आहे.
अपूर्वा यांचे शिक्षण औरंगाबादच्या चखढ कॉलेज मधून कृषी अभिांत्रिकी (बी. टेक. अॅग्रीकल्चर इंजिनिअरिंग) झाले आहे. उच्चशिक्षण असूनही त्यांना नोकरी करण्यात कधीच रस नव्हता. त्यांचे पतीही उच्चशिक्षित असून दोन गोंडस मुले त्यांना आहेत. एकूणच सर्व काही व्यवस्थित सुरु असताना सुरुवातीला त्यांनी झुंबा डान्स क्लास व लहान मुलांचे डान्स क्लास घेतले. मात्र, कोरोनाची लाट आणि लॉकडाऊन झाले. त्यांचे क्लासेस ठप्प झाले. आता काय करावं याचा त्या विचार करू लागल्या. आपण जे शिक्षण घेतलेलं आहे, त्यातच काही तरी करावं असं त्यांना वाटत होतं आणि त्यातूनच जन्माला आली मशरूम शेतीची संकल्पना. सुरवातीला त्यांना अनेकांनी वेड्यात काढलं. मात्र, आपल्या निर्णयावर त्या ठाम होत्या! मशरूम शेतीसाठी लागणारा खर्च कमी असला आणि अगदी 18 ते 20 दिवसांत उत्पादन हातात येत असलं तरीही अपूर्वा तोरडमल यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कुटुंबीयांनी, आजूबाजूच्या लोकांनी शेतीत का उतरते त्याऐवजी जॉब कर, असा सल्ला द्यायला सुरुवात केली. मशरूमबद्दल सर्व लोकांच्या मनात बरेच गैरसमज होते. लोक मशरूम खायला तयार होत नव्हती, असं सर्व असतांना अपूर्वा यांनी हार न मानता, पतीच्या मदतीने आपला मशरूम शेतीचा निर्णय पक्का केला. त्यांना त्यांच्या निर्णयावर विश्वास होता. आजच्या परिस्थितीत मशरूम खाणं आपल्या आरोग्यासाठी अतिशय गरजेचं आहे आणि मशरूम खूप पौष्टिक असतात याची जाणीव त्यांना होती. समाजात अशा किती तरी महिला आहेत, की ज्यांच्यात शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे त्यांच्या हातांना काम देखील मिळत नाही. अशा महिलांसाठी काही तरी रोजगार उपलब्ध करुन दिला पाहिजे, या भावनेतून तसेच त्यांचे इतरांप्रमाणे सक्षमीकरण देखील झाले पाहिजे असे त्यांना वाटायचे. आपल्या समाजातील लोकांना पौष्टिक आहार खायला मिळावा हा उद्देश हा व्यवसाय सुरू करण्यामागे होता. त्याचबरोबर आपण कोणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा आपण कोणाला तरी काम मिळवून देऊ ही गोष्ट त्यांना खूप महत्वाची वाटत होती.
अशी केली सुरुवात!
मशरूम उत्पादन सुरू करण्यापूर्वी अपूर्वा तोरडमल यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मशरूम उत्पादनासाठी आवश्यक असलेला भुसा त्यांना मिळत नव्हता. बियाणे मिळत नव्हते. ओळखीच्या सर्व लोकांना त्यांनी फोन केला आणि मुश्किलीने त्यांना भुसा व बियाणे मिळाली. त्यानंतर प्रश्न होता तो जागेचा, जागा होती. मात्र, राहत्या घरापासून ती लांब होती. दोन्ही लहान मुलांना घेऊन एवढा प्रवास रोज करणे त्यांना शक्य नव्हते. शेवटी त्यांच्या आईचा त्यांच्याच बिल्डिंगमधील रिकामा असलेला 625 चौरस फुटाचा फ्लॅट मशरूम उत्पादनसाठी घ्यावा म्हणून त्यांनी आपल्या आईला विनंती केली. त्यांच्या आईने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आपला फ्लॅट दिला. गुंतवणुकीसाठी त्यांना पैसे कमी पडत होते. थोडे पैसे आईने तर थोडे त्यांच्या पतीकडून घेऊन त्यांनी गुंतवणूक केली. अशा सर्व गोष्टी मार्गी लावत त्यांनी 10 जुलै 2020 ला मशरूम उत्पादन सुरू केलं.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून मागणी!
श्रीमती तोरडमल यांनी उत्पादित केलेल्या ताज्या मशरुमला आता मागणी वाढू लागली आहे. अहमदनगरसह पैठण, औरंगाबाद येथील सरकारी कर्मचारी, महाविदयालयांमधील कर्मचारी हे ताज्या मशरुमची मागणी करतात तसेच बाय प्रॉडक्टस् चा देखील मागणीनुसार पुरवठा केला जातो. तसेच मशरुमच्या पापडला नाशिक, पुणे येथून चांगली मागणी असल्याचे त्या सांगतात. विशेष म्हणजे त्यांचे पापड हे दुबई येथे देखील पाठविले आहेत. त्याची टेस्टींग झाल्यानंतर त्यांना पूढील ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. तसेच मशरुमच्या कुकीजही मुंबई येथे सॅप्लींगला पाठविल्या आहेत. त्याचा फिडबॅक येणे बाकी असल्याचे श्रीमती तोरडमल यांनी सांगितले.
असे घेतले उत्पादन..!
अपूर्वा तोरडमल यांचे उच्च शिक्षण अॅग्रीकल्चर क्षेत्रात झाले असले तरी त्यांनी मशरुम शेती करण्यापूर्वी अगोदर संपूर्ण माहिती मिळविली. त्यानंतर त्यांनी 625 चौरस फूट जागेतील वन बीएचके फ्लॅटमध्ये प्रत्यक्ष मशरुम शेतीला सुरुवात केली. भूसा म्हणून आता त्या त्यांच्या शेतातील गव्हाच्या स्ट्रॉचा वापर करतात. तर बियाणे कृषी विज्ञान केंद्रातून आणतात. शिवाय त्यांनी बियाणांसाठी विविध लॅबशी करार देखील केलेला आहे. त्यात जळगाव, पुणे, नांदेड तसेच तामिळनाडू येथील लॅबचा समावेश आहे. ज्या ठिकाणची व्हरायटी चांगली असेल तेथून बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. विशेषतः पुण्यातील लॅबमधील बियाणांना अधिक प्राधान्य देत असल्याचे अपूर्वा तोरडमल सांगतात. मशरुमच्या बियाणांची दररोज 3 किलोपर्यंत लागवड केली जाते. त्याची तोडणी दर 15 दिवसांनी केली जाते. म्हणजे 15 व्या दिवशी बेड ओपन केले जाते. अशा पद्धतीने 20 ते 21 दिवसात पहिले पीक हातात येते. लागवड करण्यापूर्वी त्या खोलीची स्वच्छता व संपूर्ण निर्जंतूकीकरण केले जाते. तोडलेले मशरुम ताजेच पॅक करुन मार्केटला नेले जातात. फ्लॅटमधील किचनरुममध्येच भूसा साठवणूक केली जाते. हॉलमध्ये मशरूम ठेवण्यासाठी त्यांनी रॅक तयार केले आहेत. ज्यात 15 दिवसांपर्यंत मशरुम ठेवले जातात. 15 दिवसानंतर कव्हर काढल्यानंतर 10 बाय 12 ची फ्रुटिंग रुम आहे. त्या रुममध्ये जवळपास 200 बेड लावले जातात. बेड लावल्यानंतर त्यांची योग्य निगा ठेवली जाते. दिवसातून दोनवेळा पाणी दिले जाते. उन्हाळयात वातावरण अधिक उष्ण असल्यास व ग्रामीण भागात पाणी मिळण्याची सोय नसेल तर दोन महिने प्लान्ट बंद ठेवला जातो. या दोन महिन्यात मशरुमचा वापर बायप्रॉडक्टसाठी केला जातो.
किडरोग व्यवस्थापन!
मशरुम लागवड करताना अगोदरच खोलीची स्वच्छता व फॉमलीनची फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले जाते. त्यामुळे सहसा किडरोगाचा प्रादुर्भाव होत नसल्याचे अपूर्वा तोरडमल सांगतात. शिवाय फवारणीमुळे पावसाळ्यात माशा व चिलटे यांचा प्रादुर्भाव वाढत नाही. तसेच लागवड केलेल्या खोलीत जाताना मास्क, हॅण्ड ग्लोव्हज आवर्जून वापरले जातात. कारण मशरुमचा कार्बन फुफुसांसाठी हानीकारक असतो. ज्यामुळे सर्दी होते, घशात कफ वगैरे होतात, त्यामुळे ही काळजी घ्यावी लागते.
मशरुमचे महत्व लोकांना पटवून सांगितले !
अपूर्वा तोरडमल यांनी मोठया मेहनतीने व हिंमतीने मशरुम उत्पादनाला सुरुवात केली. मात्र, मशरूम खायला फारसे कोणी तयार होत नव्हते. कुत्र्याची छत्री असे म्हणून मशरूम नाकारले जात होते. अनेकांना मशरूमचे महत्व समजत नव्हते. लोकांना मशरूमचे महत्व पटवून देण्यासाठी अपूर्वा यांनी फ्री सॅम्पल द्यायला सुरुवात केली. मशरूमची भाजी, भजी असे पदार्थ बनवून ते शेजारच्या लोकांना टेस्ट करण्यासाठी त्या देऊ लागल्या. मशरूम आपल्या आरोग्यासाठी कसे महत्वाचे आहे, हे त्या अनेक माध्यमांचा वापर करून सर्वांना सांगू लागल्या. त्यामुळे हळूहळू लोकांना त्यांचे महत्व पटायला लागले. लोकांना फ्री सँपल वाटल्यामुळे अपूर्वा तोरडमल यांचे खूप नुकसान झाले. मात्र, व्यवसाय वाढविण्यासाठी तसे करणेही अपरिहार्य होते.
बायप्रॉडक्टला केली सुरुवात !
अपूर्वा तोरडमल यांनी केवळ मशरुम उत्पादनावर अवलंबून न राहता, त्यापासून आपल्याला आणखी कोणकोणते बायप्रॉडक्ट तयार करता येतील, यावर संशोधन सुरु केले. त्यातही त्यांनी मशरुमच्या अनेक रेसिपीज शोधल्या. खूप प्रयत्न केल्यानंतर एखादा नवीन बायप्रॉडक्ट तयार होत असतो. त्यामागे त्यांची कल्पकता आणि जिद्द खूप आहे. पदार्थ तयार झाल्यावर लगेच मार्केटला उतरवणे हे सोपे नसते, त्याची एक्सपायरी डेट तपासण्यासाठी, न्युट्रिशनल घटक देखील हवे असतात. त्यासाठी वाट बघावी लागते. शिवाय मशरूमचे विविध प्रकारचे पापड आणि डायबेटिसच्या, सीडीटी, कॅन्सर, उच्चरक्तदाब, हाडे ठिसूळ असणार्यांसाठी उपयुक्त अशी मशरूमची पावडर बनवून त्यांनी विकायला सुरुवात केली. त्यानंतर लोकांना गोडमध्ये खायला आवडते. मात्र, मशरूम कुकीज् म्हटले की त्यात हेल्दीनेस आलाच. लॉकडाऊन असल्यामुळे प्रॉडक्टचे बाहेर जाऊन मार्केटिंग करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करून आपल्या प्रॉडक्टचे मार्केटिंग करायला सुरुवात केली.
नेचर कॅप कंपनीची स्थापना!
मशरुम उत्पादनाला स्वतःचे ब्रँडनेम असावे, असा श्रीमती तोरडमल यांचा मानस होता. त्यामुळे त्यांनी आपल्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी कंपनीला चांगले नाव शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना नेचर कॅप हे नाव आवडले. कारण मशरुम हे छत्रीप्रमाणे दिसते. निसर्ग म्हणजे आपले आरोग्य आणि त्याला संरक्षण देणारी म्हणजे छत्री. मशरुममध्ये भरपूर न्युट्रिशनल घटक असल्याने ते आरोग्याचे संरक्षण करतात. त्यावरुन नेचर कॅप ऑरगेनिक फूड असे त्यांनी कंपनीचे नाव देऊन रजिस्ट्रेशन केले. कंपनीच्या नावाने त्या आपल्या उत्पादनाची विक्री करतात. विशेष म्हणजे नुकतेच त्यांना एका योजनेंतर्गत फंड मिळाला असून त्यांनी नवीन जागेवर प्लांट एक्सपांड करण्यास सुरूवात केली आहे.
300 ते 400 रुपये किलो दराने विक्री !
अपूर्वा तोरडमल या प्लूरोटस प्रजातीतील अगॅरिकस प्रवर्गातील चार प्रकारच्या मशरुमचे उत्पादन घेतात. त्यात साजर काजू, डिजेमोर, प्लूरोटस ब्ल्यू ऑईस्टर व फ्लोरीडा यांचा समावेश आहे. यातही साजर काजूचे त्या जास्त उत्पादन घेतात. कारण या प्रकाराला वर्षभर मागणी असते. तर डिजेमोरचे उत्पादन हे सिजनेबल घेतात. मशरुमची साधारण 300 ते 400 रुपये किलो दराने तर पावडरची 2 हजार रुपये दराने विक्री करतात. मशरुमपासून तयार केलेले विविध प्रकारचे पापड हे 250 ग्रॅमचे पाकीट 160 ते 175 दराने तसेच कुकीजचे 250 ग्रॅमचे पाकीट 135 ते 140 रुपयांना विक्री केले जाते. यातून वर्षाला सुमारे 5 ते 6 लाखांची उलाढाल होत असल्याचे अपूर्वा तोरडमल सांगतात.
चार महिलांना दिला रोजगार!
श्रीमती तोरडमल यांनी आपला उद्योग बचत गटाशी जोडून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.सध्या त्यांच्याकडे 4 महिला काम करीत आहेत. तसेच त्या अनेक महिलांना मशरूम लागवडीचे प्रशिक्षणही देत आहेत. महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, यासाठी त्या वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करीत असतात. मशरुम शेती घरच्या घरीच करता येणे शक्य असल्याने महिलांना या उद्योगातून चांगले अर्थाजन होऊ शकते, असे त्या सांगतात.
विविध पुरस्कारांनी गौरव !
अपूर्वा तोरडमल यांच्या मशरुम उद्योगातील कार्याची दखल घेऊन त्यांना नॅशनल ग्री युथ अवॉर्ड देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.तसेच भरारी ग्रामीण महिला बचतगट राज्यस्तरीय स्पर्धा 2021 ही फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स, मिळून सार्या जणी, चैतन्य व सारथी यांनी संयुक्तरित्या आयोजित केली होती. त्यात त्यांना नवोदित गटसाठीचा स्टेट लेव्हल (राज्यस्तरीय) पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. 2 ऑक्टोबरला आत्मा व गर्सिनिया फेडरेशनमार्फत खासदार धैर्यशील माने व मानिनी फाऊंडेशनच्या भारती चव्हाण यांच्याहस्ते कृषी उद्योजिका म्हणून देखील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
भविष्यातील नियोजन !
श्रीमती तोरडमल यांनी अवघ्या 625 चौरस फुटाच्या जागेत सुरू केलेला हा व्यवसाय भविष्यात आंतराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे. अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा त्यांचा ध्यास आहे. तसेच कंपनी विकसित करावयाची असून प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रुपांतरीत करावयाची आहे. ग्रामीण भागातील महिला ज्यांना चूल आणि मूल शिवाय काही माहिती नाही, अशा महिलांना एक रोजगार निर्मिती करुन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. घर सांभाळता सांभाळता स्वतःच्या पायावरही त्यांना उभे राहता आले पाहिजे, या उद्देशाने काम करणार असल्याचे श्रीमती तोरडमल यांनी सांगितले.