– किशोर कुलकर्णी, जळगाव
राज्यातीलच नव्हे तर देशातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या शेतीसह या क्षेत्राशी निगडीत नानाविध व्यवसायांवर अवलंबून आहे. शेतीच्या शाश्वत विकासासह शेतकरी आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी सिंचन, टिश्युकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, खते-बी-बियाणे, कीटकनाशके, रासायनीक खते आणि जैन इरिगेशनचे उच्च कृषितंत्रज्ञान आत्मसात करीत आहेत. आहे त्या जमिनीत ठिबक सिंचनाचे तंत्र अवलंबून पारंपरिक शेतीच्या तुलनेत आधुनिक शेतीतून दुप्पटीहून अधिक उत्पादन शेतकरी घेऊ लागले आहेत. तंत्रज्ञान आणि शेती यांची उत्तम सांगड घातली गेली आहे व शेतकर्यांनी प्रगतीची नवी वाट निव़डली आहे. सिंचन क्षेत्रात तर कंपनीने तर खूप मोठा टप्पा गाठला असून त्यामुळे शेतकर्यांची आर्थिक प्रगती होत आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी देखील स्मार्ट होत चालला आहे त्याबाबत…
आपला देश आज आपल्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्योत्तर व स्वातंत्र्यपूर्व काळातील शेतीमध्ये कमालीचा बदल झालेला आहे. देशाच्या विकासात कृषी क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान आहे. शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन देण्यासह अधिक उत्पादनक्षमता निर्माण करण्याची धडपड सुरू आहे. केळी, डाळिंब, आंबा, कांदा, तसेच विविध भाजीपाला व फुलपिकांच्या उत्पादनासोबतच द्राक्ष निर्यातीतही महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. अन्नधान्य उत्पादनातील स्वयंपूर्णता, कृषी निर्यातीद्वारे परकीय चलनप्राप्ती यासारख्या उपक्रमांबरोबरच सुक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर, फळबाग लागवड व जलसंधारण आदींची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचली आहे.
ऑटोमेशनवर भर
महाराष्ट्रातील वापरायोग्य उपलब्ध पाण्यापैकी सिंचन आणि बिगर सिंचनासाठी वापरले जाते. त्यात साधारणत: 85 ते 86 टक्के पाणी शेतीत सिंचनासाठी वापरले जाते. उर्वरित पाणी बिगर सिंचनासाठी मुख्यत्वे पिण्यासाठी, उद्योगांसाठी वापरले जाते. वाढते शहरीकरण, वाढणार्या लोकसंख्येच्या वाढत्या पाण्याच्या गरजा तसेच वाढते औद्योगिकरण व त्याची निकड लक्षात घेता बिगर सिंचनासाठी पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य क्रम देण्यात आलेली आहे. त्यामुळे नाही म्हटले तर शेती सिंचनाच्या वाट्याला पाण्याची टक्केवारी पूर्वीच्या तुलनेत कमीच होत आहे. त्यामुळे शेतीमध्ये ठिबक सिंचनाचा अत्यंत चांगला पर्याय शेतकर्यांनी स्वीकारला आहे. त्यातही आता ऑटोमेशनमुळे अधिक सुलभता आलेली आहे. बसल्या जागी शेतीतले व्हॉल्व बदलणे, विजेची टंचाई, लोडशेडिंग आदी आव्हानांना तोंड देत सिंचनाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जात आहे. पिकांना फर्टिगेशन किंवा ठिबकच्या माध्यमातूनच खते देण्याची व्यवस्था असल्याने पाणी व खते यांची पिकाला जितकी गरज आहे, तितक्याच प्रमाणात देण्याची व्यवस्था ऑटोमेशनमध्ये करता येते. ऑटोमेशनसाठी प्राथमिक पातळीवर थोडा खर्च शेतकर्यांना करावा लागतो. परंतु त्यांचे दीर्घकालीन फायदे भरपूर असतात हे तितकेच खऱे.
निंबोलच्या पिता-पुत्राची हायटेक शेती
रावेर तालुक्यातील बहुतांश शेतकरी हा शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात अग्रेसर आहे. या तालुक्यातील निंबोल येथील रामदास त्र्यंबक पाटील, निलेश अशोक पाटील व मिलींद रामदास पाटील यांची हायटेक केळी शेती इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी जैन इरिगेशनच्या ऑटोमेशन ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब केला आणि पाणी, खते, वेळ, श्रम आणि मजुरीची बचत करून स्मार्ट पद्धतीने केळीची शेती ते करीत आहेत. पाटील पिता-पुत्र आणि पुतण्या यांच्याकडे वडिलोपार्जीत 150 एकर शेती आहे. पैकी 100 एकर क्षेत्रावर ऑटोमेशन पद्धतीने ठिबक सिंचनाचे नियोजन केले जाते. या शेतीचे संपूर्ण नियोजन निलेश व मिलींद हे दोन्ही पाटील बंधू करतात. जानेवारी ते सप्टेंबर या दरम्यान आपल्या शंभर एकरात टप्प्याटप्प्याने टिश्युकल्चर केळी रोपांची लागवड करतात. त्यांच्या वेगवेगळ्या केळी प्लॉटला ते ऑटोमेशनच्या सहाय्याने ठिबक, फर्टिगेशनचे नियोजन करीत असतात. सिंचन व फर्टिगेशनचा प्रोग्राम फिट केलेला असतो. त्यामुळे मानवी चुका न होता काटेकोर सिंचन होते, खतेही देण्यात येतात. ही स्वयंचलीत पद्धती असल्याने एकदाचा प्रोग्राम फिट केला, की त्या पद्धतीने कार्य होत असते. केळी हे अत्यंत संवेदनशील पीक आहे. निर्यात योग्य व उच्च गुणवत्तेच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मोठी मागणी आहे. त्या दृष्टीने एक्सपोर्ट क्वालिटीचा माल हाती यावा म्हणून ते खूप काळजी घेत असतात. त्यासाठी 30 मायक्रॉन सछिद्र स्कर्टिंग बॅगचा वापर ते करतात. केळफुल निघण्याआधी ते बीआय इंजेक्शन देतात. ते दिल्याने थ्रीप्सचा अटॅक येत नाही, गुणवत्तेच्या काळी उत्पादनासाठी स्कर्टिंग बॅग वापरतात. केळ घडाचे तीव्र सूर्यप्रकाशापासून स्कर्टिंग बॅगचा उपयोग करणे याला ते प्राधान्य देतात. रोग, डाग विरहीत, दिसायला आकर्षक चकचकीत केळी ग्राहकाला हवीशी वाटते. त्यामुळे केळी उत्तम गुणवत्तेची व निर्यात योग्य अशी तयार होते. घडाच्या सुदृढ वाढीसाठी फण्यांच्या संख्येच्या प्रमाणाकडे देखील त्यांचा कटाक्ष असतो. त्यांची केळी ते विविध केळी निर्यात संस्थेतर्फे निर्यात करतात. त्यामुळे नेहमीच्या भावांपेक्षा तिकडे चांगला भाव मिळतो. चार पैसे हातात खेळते राहतात असे पाटील म्हणतात. त्यांच्या शेतात जैनची टिश्युकल्चर केळी हे मुख्य पीक घेतले जाते. त्यांच्या केळी पिकाचे वैशिष्ट्य असे, की ते एक लाख खोड पीलबाग खोडवा धरून दर महिन्याला केळीची कापणी होत असते. टिश्युकल्चर केळी असल्याने त्या त्या वेळी लावलेला केळी प्लॉट एक एक करून बरोबर काढणीला येतो. ऑटोमेशन बसविल्यामुळे 100 एकराचे खतांचे, सिंचनाचे अचूक नियोजन करता येते. त्यामुळे अनेक फायदे मिळतात असे निलेश पाटील म्हणतात.
ऑटोमेशनमुळे काटेकोर सिंचन, खतांचे नियोजन- नितीन अग्रवाल
रावेर तालुक्यातील अटवाडे येथील नितीन द्वारकाप्रसाद अग्रवाल हे तरूण शेतकरी यांचा जैन इरिगेशनचे उच्च कृषितंत्रज्ञानावर शंभर टक्के विश्वास. अटवाडे परिसरात भारनियमन तर पाचविला पुजलेला. कधी रात्री साडेतीनला वीज पुरवठा होतो तर कधी रात्री बाराला वीज पुरवठा खंडीत होतो. इतक्या रात्री गडी माणूस किंवा शेतमालक पंप बंद करायला जाऊ शकत नाही. अनेकदा पाणी भरल्यावर देखील जादाचे पाणी सुरू असते. त्यामुळे पाणी वाया जाते. या सगळ्या गोष्टींचा खूप कंटाळा आला होता. अग्रवाल हे टेक्नोसॅव्ही आहेत. भारनियमन व जास्तीच्या पाणी भरतीवर त्यांना परफेक्ट सोल्यूशन हवे होते. त्यासाठी त्यांनी जैन इरिगेशनचे स्वयंचलीत ऑटोमेशन घेतले आणि या सर्व समस्यांपासून स्वतःची सोडवणूक करून घेतली. त्यांच्याकडे 18 एकर शेती असून दोन ठिकाणचे सिंचनाचे, खतांचे नियोजन ऑटोमेशनमुळे अचूकपणे करता येते. वेळ, परिश्रम आणि मजुरी वाचते. विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की, रात्री-बेरात्री केव्हाही वीज येते. रात्री साडे तीन वाजता शेतात जाऊन पंप बंद करण्याची त्यांना वेळ येत नाही. जैन ऑटोमेशनचे तंत्र स्वीकारून ते खूप समाधानी आहेत.
ज्यावेळी अग्रवाल यांनी परिसरात पहिल्यांदाच मोठी गुंतवणूक करून ऑटोमेशन बसविले त्यावेळी इतर शेतकर्यांनी त्यांना आर्थिक गणित समजावून सांगितले, की ऑटोमेशनपेक्षा वर्षाला साठ-सत्तर हजार रुपये देऊन फक्त त्याच कामासाठी माणूस ठेवला तर ऑटोमेशनची इतकी मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही पडणार असे मोलाचे सल्ले त्यांना मिळाले. परंतु नितीन अग्रवाल यांच्या मनात ऑटोमेशनचे तंत्र पुरते भिनले होते. या तंत्राचे फायदे त्यांनी हेरले होते. त्यामुळे कोणाचाही सल्ला न मानता, त्यांनी गुंतवणूक केली व आपल्या शेतात ते बसवून घेतले. नितीन अग्रवाल यांनी तंत्रज्ञानाला जवळ केल्याने त्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीत कमालीचा बदल घडून आला. 1996 पासून वडिलांबरोबर नितीन शेती करायला लागले. त्यावेळी पारंपरिक पद्धतीने पाणी देऊन यंत्रसामुग्रीचा मोजकाच वापर ते करायचे. नितीन अग्रवाल यांच्याकडे शेतीचे नियोजन आल्यापासून त्यांनी वेगवेगळ्या प्रयोगांचा जणू सपाटाच लावला आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी दुष्काळसदृश परिस्थिती अटवाडे परिसरात आहे. शिवाय तापी नदी देखील दुथडी वाहिली नाही. परिणामी, पाण्याची टंचाई तीव्र जाणवत होती. पाणी ठिबक सिंचनाने अगदी जपून वापरणे अगत्याचे होते. केळीसाठी ठिबक सिंचनाचा चपखल वापर ते करू लागले. ऑटोमेशन बसवून घेण्यापूर्वी मजुरांच्या मागे लागून व्हॉल्व बदलणे, फर्टिगेशन करून घेणे, रात्री अपरात्री पाण्याचा पंप बंद करणे अशी कामे मजुरांच्या भरवशावर व्हायची. स्मार्ट पद्धतीने घरी बसल्या मोबाईलवर नियंत्रण ठेवून फर्टिगेशन, व्हॉल्व बदलणे, 15 मिनिटांचे पाणी सिंचनाचे, फर्टिगेशन असे शेड्यूल लावले, की आपोआप सर्व नियंत्रित करू शकतो का? अशी कल्पना जैन इरिगेशनच्या डी. एम. बर्हाटे या अधिकार्यांच्या भेटीत बोलून दाखविली. त्यांनी आम्हाला ऑटोमेशनची तांत्रिक माहिती दिली. याबद्दल काही शंका होत्या, त्याबद्दल मनमोकळ्या चर्चा झाल्या. शंकांचे निरसन करुन वीज, पाणी, वहिवाटीचे क्षेत्र या सर्वांची सांगड घालून उत्तम डिझाईन श्री. बर्हाटे यांच्या मदतीने मिळाले असे नितीन अग्रवाल म्हणाले. ही सर्व सखोल माहिती मिळवून या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. ऑटोमेशनमुळे शेतीला स्मार्टपणा आला असल्याचेही श्री. अग्रवाल गर्वाने सांगतात.
ऑटोमेशन तंत्रामुळे फायदा
जैन इरिगेशनच्या उच्च कृषितंत्र त्याच प्रमाणे केळीसाठी मल्चिंग पेपर, स्कर्टिंग बॅग यांचा कटाक्षाने वापर करण्यात येतो. जैन इरिगेशनच्या कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पाच बाय साडेपाच अंतरावर जैन ग्रॅण्डनैन टिश्युकल्चर रोपांची लागवड करण्यात येते. त्यासाठी सुमारे साडे नऊ लाख रुपयांची रोपे, मल्चिंग, बेड व अन्य बाबींसाठी साडेचार लाख रुपयांचा खर्च होतो. म्हणजे प्रतिरोप साधारण 55 ते 60 रुपये उत्पादन खर्च होतो. केळीला भाव चांगला मिळाला आणि सरासरी 22 ची रास मिळाली, तर रोपाला सुमारे 175 रुपयांची प्राप्ती होते, असे केळीचे अर्थशास्त्र महाजन बंधू सांगतात. हिवरखेडा परिसरात विजेचे भारनियम होत असते. बर्याचदा रात्रीच्या सुमारास पंप सुरू करायला मजूर मिळत नाहीत. शेतीकामासाठी फर्टिगेशन, पाणी देण्यासाठी मजुरांची उलब्धता होत नाही. या सर्व गोष्टींवर प्रभावी उपाय योजना म्हणजे ऑटोमेशन तंत्रज्ञान! ऑटोमेशन तंत्र स्वीकारल्याने सिंचन, फर्टिगेशन वगैरे प्रोग्रामनुसार विनासायास सर्व व्यवस्थित व अचूक होते, असे नितीन व उमेश महाजन सांगतात. एकूणच ऑटोमेशनचे आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यामुळे शेतकरी स्मार्ट बनले असून अचूक फर्टिगेशन व सिंचनामुळे फळांच्या गुणवत्तेत सुधारणा होत असते. याशिवाय मजुरीत तर बचत होतेच परंतु अनेक फायदे देखील मिळतात. त्यामुळे हे आधुनिक स्वयंचलीत ऑटोमेशनचे तंत्र इतर शेतकर्यांनी ही स्वीकारावे व आपणही लाभ मिळवावा.
हिवरखेडेचे नितीन आणि उमेश महाजन यांच्या ऑटोमेशनमुळे इतर शेतकर्यांनाही मिळाली प्रेरणा
17 एकर वडिलोपार्जित आणि लिजवर घेतलेली 33 एकर अशा दोन्ही क्षेत्रात ठिबक सिंचनाद्वारे ऑटोमेशन पद्धतीने त्यांनी सिंचनाचे तंत्र अवलंबलेले आहे. सुमारे 65 हजार जैनची टिश्युकल्चर केळी रोपे ते लावतात. अत्यंत नियोजनबद्ध शेती त्यांची असते. त्यांच्या शेतात ऑटोमेशन बसविल्याने इतर शेतकर्यांनी देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेतली व परिसरातील अन्य शेतकर्यांनीही आपल्या शेतात ऑटोमेशन बसवून घेतले. शेतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणारे हिवरखेडा येथील नितीन व उमेश महाजन यांची शेती बघण्यासारखी आहे.
हिवरखेडा येथील प्रगतशील शेतकरी गोपाळ महाजन आपली वडिलोपार्जित शेती करायचे. त्यांना देखील शेतीमध्ये निरनिराळे प्रयोग, पीक पद्धतीमध्ये बदल, पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गोडी त्यांना जैन इरिगेशनमुळे मुख्यत्वाने के. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे लागली. नितीन मोठा मुलगा असल्याने नववी इयत्तेपासूनच वडिलांबरोबर शेती करायला लागला. वडिलांच्या शेती करण्याच्या पद्धती तो शिकत होताच. परंतु त्याच काळात नितीन व उमेश यांचे वडील गोपाळ महाजन यांचे 2002 मध्ये अपघातात निधन झाले. कमी वयातच नितीनवर शेती व कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. वडिलांच्या अचानक निधनाने तर महाजन परिवार हादरला. नितीनने खंबीर होऊन शेती करायला सुरूवात केली. नगदी पिके घेण्याऐवजी कमी श्रमाचे, देखभालीचे पिके त्यांनी घेतली. त्यामुळे आपण किमान 10 वर्षे मागे पडलो हे शल्य उमेशला सारखे बोचायचे. बोचणारे शल्य कमी करण्यासाठी स्मार्ट पद्धतीने यशस्वी शेती करण्याची खुणगाठ त्यांनी बांधली व त्यादृष्टीने पाऊल उचलले. महाजन परिवारातील शेतीतला टर्निंग पॉइंट असा, की 2011 मध्ये हिवरखेडा येथे एक शेतकरी मेळावा होता. त्या मेळाव्यात जैन इरिगेशनचे सहकारी के. बी. पाटील मार्गदर्शनासाठी आले होते. के. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार केळी लावली. खरंच त्यावर्षी खूप जास्त भाव मिळाला. जास्तीचे उत्पन्न मिळाल्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा अवलंब महाजन बंधू करू लागले व आधुनिक उच्च कृषि तंत्रज्ञानाचा लाभ मिळवू लागले.