प्रविण देवरे/ जळगांव
भाज्यांचे नैसर्गिक आयुष्य थोडे असते, बाजारभाव नसला की त्या वाया जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसतो. ही नासाडी थांबविली तर नक्कीच मोठा आर्थिकदृष्ट्या बदल शेतकऱ्यांच्या जीवनात शक्य आहे. असाच काहीसा बदल आकांक्षा कोठे या उच्चशिक्षित शेतकरी कन्येच्या माध्यमातून होत आहे. मुळच्या जळगाव जिल्ह्यातील असलेल्या, मुंबईस्थित, सौ.आकांक्षा विजय कोठे यांनी भाजीपाला निर्जालिकरणच्या माध्यमातून रोजगार निर्मिती तर केलीच, पण उद्योगाच्या नवीन वाटा देखील निर्माण केल्या आहेत. घरगुती स्वरुपात सुरु झालेला त्यांचा व्यवसाय आज कैक लाखांच्या वार्षिक उलाढालीवर पोहचला आहे आणि सोबतच त्यांच्या सारख्याच इतरही समविचारी लोकांना त्यामाध्यमातून चालना आणि चलन उपलब्ध होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील, जामनेर तालुक्यात, शहापूर येथील माहेर असलेल्या सौ.आकांक्षा या मुंबईतस्थित असून सासरी व माहेरीही सर्व उच्चशिक्षित व शेतीचीच पार्श्वभूमी असलेला परिवार आहे. आकांक्षा देखील MBA करून एका नामांकित लाइफ इन्शुरन्स कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करत होत्या. आकांक्षा यांचे वडील अमृत बोरसे व भाऊ अंकुर बोरसे हे देखील गावाकडे शेतीच पाहतात. ते सहसा कापूस, मका, ऊस, पपई आणि केळीची लागवड करतात.आकांक्षा यांचे पती विजय कोठे हे नागपूर जवळ असणाऱ्या हिंगणा गावातील असून आता सर्व परिवार नोकरी निमित्ताने मुंबईत स्थाईक झाला आहे.
वयाच्या दहाव्या वर्षी, आकांक्षा, मामाकडे (श्री हेमंत तायडे) कल्याणला राहावयास आल्या. मामाच्या प्रोत्साहनामुळे सहावी ते MBA चे शिक्षण मुंबईत पूर्ण केले. त्यांनी सुमारे पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर एक गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कृषी आधारित उद्योग करण्याचा निर्णय घेतला. फूड प्रोसेसिंगची आवड व घरची शेतीची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांनी त्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. त्यासाठी संपूर्ण विचार करून परिस्थितीचा आढावा घेत, आसपासच्या क्षेत्राचा अभ्यास केल्यानंतर आणि स्वतःच्या अनुभवावर आधारित, भाजीपाला निर्जलीकरणचा व्यवसाय करण्याचे ठरविले.
स्वयंपाकघरातील छंद बनला व्यवसाय
मुंबईत नोकरी करत असतांना सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागते. आकांक्षा यांचा मुलगा अथर्व (वय १२ वर्ष) याला खाण्यासाठी फास्ट फूड आवडत नाही, त्याला भाजी-पोळी यासारखे पदार्थ शाळेत द्यावे लागतात. शहरात नोकरी व घर सांभाळणे, ही कामे तशी अवघड होतात. लांबच्या प्रवासामुळे घरासाठी फार वेळ मिळत नाही, म्हणून आकांक्षा घरी वेळ असतांना रेडी टू कुक याप्रकारे विविध पदार्थ तयार करून ठेवत असत. त्यांची हीच सवय आज एका व्यवसायात रुपांतरीत झाली आहे. सुकलेला कांदा, लसून, अद्रक लसून जीरा मिक्स, सुकविलेल्या भाज्या किंवा रेडी टू कुक उपमा, शिरा, खीर, थालीपीठ, पराटे पिठ यासारखे विविध पदार्थ त्या घरासाठी तयार करून ठेवत. वेळ वाचावा म्हणून त्यांचा हा प्रयत्न होता. विविध विचारान्तीं त्यांनी त्यांचा हाच छंद व्यवसाय म्हणून करायचे ठरविले. त्यासाठी २०१९मध्ये माहेरी वडिलांना अर्धा एकर जमीन ही या प्रयोगासाठी मागितली. त्या जमिनीला तयार केले व तिथे तुळस, गवती चहा, पुदिना, पेपरमिंट, स्टीविया, कोथिंबीर आणि शेवग्याची लागवड केली. त्यांनी भावाला आणि आईला या वस्तूंचे निर्जलीकरण कसे करायचे ते शिकविले. त्यातून तयार झालेले प्रॉडक्टस् खूप छान क्वालिटीचे होते. या प्रयोगामुळे मोठ्या क्षेत्रात अशाच अनेक युनिक प्रॉडक्टची निर्मिती करू शकतो हा आत्मविश्वास आला.
शेतीतून अधिकाधिक नफा मिळवायचा असेल तर त्याच्याशी निगडीत उद्योग करणे गरजेचे आहे, ही गोष्ट त्यांनी वडिलांना व भावाला पटवण्याचा प्रयत्न केला. भाजीपाला साठवणुकीचा कालावधी वाढविण्यासाठी सुकविणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. अलीकडे सुकविणे ही पद्धत घरगुती स्तरावर न राहता त्याला व्यावसायिक स्वरूप आले आहे. तांत्रिक पद्धतीने भाजीपाल्यातील पाण्याचा अंश कमी करून त्याचा साठवण कालावधी वाढविता येतो. ठराविक हंगामामध्ये मिळणारा भाजीपाला बाजारपेठेत एकदम आल्यास दर पडतात. अशा वेळी शेतकऱ्याला खूप नुकसान सहन करावे लागते. अश्या परीस्थितीत, त्या भाजीपाल्यावर निर्जलीकरणाची प्रक्रिया करून साठवणुकीचा कालावधी वाढविल्यास त्याची मूल्यवृद्धी होते, शिवाय योग्यवेळी विक्री करून चांगले आर्थिक उत्पन्नही मिळविता येते. सर्वाना ही गोष्ट पटल्यामुळे त्यांच्या वडिलांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. माहेरी व सासरी सर्वांची या उपक्रमाला मदत झाली.
श्रीगणेशा प्रेशिया उद्योगाचा..
सर्वप्रथम त्यांनी फूड डीहायड्रेशन व रेडी टू कुकचे योग्य प्रशिक्षण घेतले. त्यानंतर बाजाराचा योग्य अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुंबईत 2017-18 मध्ये पायलट स्टडी केला. पायलट स्टडीच्या अंतर्गत मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी काही प्रोडक्टस् विक्री केले. हा अनुभव खूप मोलाचा ठरला. या अनुभवाच्या बळावर साधारण पन्नास प्रोडक्ट्स विक्रीसाठी शॉर्टलिस्ट केले गेले. त्यानंतर एक छोटा डीहायड्रेटर विकत घेतला आणि जून 2018 मध्ये त्यांनी नोकरी सोडली. जून ते सप्टेंबर 2018 हा अत्यंत व्यस्त कालावधी होता. या कालावधीत प्रोडक्शन, कन्टेन्ट फायनलायझेशन, प्रॉडक्ट पॅकेजिंग, डिझायनिंग, प्रिंटिंग, प्राईसिंग, प्रमोशनल डिस्काउंट आणि शासकीय परवाने व इतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. हे सर्व व्यवस्थापित करण्यास त्यांना व्यावसायिक क्षेत्रात केलेल्या नोकरीचा अनुभव कामाला आला. अखेर सप्टेंबर 2018 मध्ये गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी, महाराष्ट्र व्यापारी पेठेद्वारे आयोजित दादर येथील प्रदर्शनात ‘प्रेशिया’ ब्रॅण्ड लॉंच केला. महाराष्ट्र व्यापारी पेठेने त्यांना कच्चामाल घेण्यासाठी आर्थिक मदतही केली.
एकूण ५० उत्पादनांची शृंखला
आकांक्षा यांच्या ‘प्रेशिया’ ब्रॅण्डखाली फक्त भाजीपाला हा एकच प्रकार नसून स्वयंपाक घरात लागणारे निर्जलीकरण व रेडी टू कुक या प्रकारात तब्बल ५० हून अधिक पदार्थांचा समावेश आहे. यात विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या पावडर, मसाले आणि विविध पीठ यांचाही समावेश आहे. खाद्यपदार्थ ५० gm ते २०० gm पर्यंतच्या पॅकिंग मध्ये आहेत.
अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद
कोणताही व्यवसाय करतांना उत्पादन करणे सोपे असते, परंतु विक्री करणे हे फार क्लिष्ट काम आहे. त्यामुळे आकांक्षा यांनी नियोजन बद्ध काम केलं आहे. आपल्याकडे भाजीपाला हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे डीहायड्रेशन व रेडी टू कुक ही नवीन संकल्पना आहे. त्यामुळे यश अपयशाची चिंता असतेच. त्यासाठी त्यांनी ठराविक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला वर्ग यासाठी निवडला, विविध प्रदर्शने, समाज माध्यम आणि डोअर डिलेव्हरी या माध्यमातून त्यांनी त्यांचा ग्राहक वर्ग तयार केला आहे. त्याचबरोबर त्या अमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉपक्लुस सारख्या व्यावसायिक वेबसाईटच्या माध्यमातूनही त्यांच्या पदार्थांची विक्री करतात. सर्व तयारीनिशी या क्षेत्रात उतरल्यामुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षात त्यांना ३ लाख रुपये उलाढालीची अपेक्षा असतांना ४ लाखांची उलाढाल झाली. त्याच्याच पुढच्या वर्षी १९-२० ला १५ लाख तर आता अजून २०२०-२१ ला कोरोनाच्या तडाख्यातही व्यवसाय यशस्वीपणे उभा ठेऊन पुढील 2021-22 मध्ये तो वाढविण्याकडे त्यांची वाटचाल सुरु आहे.
यशाची गुरुकिल्ली
कोणतीही भेसळ नसलेला रसायनमुक्त भाजीपाला व इतर खाद्यपदार्थ, त्यांची पोषण मुल्ये टिकवून गुणवत्तापूर्ण उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून दिले. एक वर्षापेक्षा अधिक टिकवण क्षमता असलेले खाद्यपदार्थ प्रेशियाच्या माध्यमातून मिळाले यामुळे ग्राहकांना देखील खाद्यपदार्थांची उपयोगिता आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्व कळले. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद त्यांना मिळाला आहे. आज त्यांचे नेहमीचे ग्राहकच त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींना प्राॅडक्टबद्दल माहिती देतात.असे आवर्जून आकांक्षा यांनी यावेळी सांगितले. उत्पादनांची गुणवत्ताच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली.
रोजगार निर्मिती
सडणारा भाजीपाला हा वापरात आला त्यामुळे शेतकऱ्यांनाही जास्तीचे पैसे मिळाले पण सर्वात महत्वाच म्हणजे यामुळे स्थानिक महिलांना देखील रोजगार प्राप्त झाला. यात जळगावला शेतात व मुंबईतील निर्जलीकरणचे काम करणारा मजूर वर्ग (साधारण 8 ते 10 स्त्रिया) आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले होते, ज्यास शेतकऱ्यांशी करार केले होते त्यांनादेखील अप्रत्यक्षपणे रोजगार देऊ शकले. त्यांना लागणारा सर्व भाजीपाला हा एकाच जागेवरून मिळणे शक्य नसते, त्यामुळे त्या विविध बाजारातून किंवा शेतकऱ्यांकडून करार करून माल घेतात. त्यासाठी त्यांना मुंबईत नोकरीस असलेल्या व शेतीची पार्श्वभूमी असलेल्या मित्र मंडळींचा मोठा आधार झाला आहे. त्यांच्या सारख्या समविचारी लोकांना जोडून त्यांनी हा प्रकल्प पुढे सुरु ठेवला आहे. आज त्यांच्या मुंबईतील युनिटला २ महिला पूर्ण वेळ आणि नंतर इतर वेळी गरजेनुसार कामाला बोलविल्या जातात.
वितरण प्रणाली
मार्केट मधून भाजीपाला आणल्यानंतर त्यावर आवश्यकतेनुसार प्रक्रिया करून तो हव्या त्या साईज मध्ये पॅक केला जातो. विविध प्रदर्शनात तो विकला जातो, त्याशिवाय ऑर्डर असल्यास ती घरी देण्यासाठी एका कुरिअर कंपनीसोबत करार केला असून त्यामुळे रास्त दरात ग्राहकांपर्यंत प्रोडक्ट पोहचविले जातात. मुंबईतील उत्पादनाच्या जोडीला जळगाव,, सांगली, नाशिक आणि पुणे येथून मोठ्या प्रमाणात निर्जलीकरण केलेला माल आणून त्यांचे पुन्हा या ठिकाणी पॅकिंग केले जाते.
निर्जलीकरणाची प्रक्रिया
निर्जलीकरणाची प्रक्रिया अनेक चरणांत होते. प्रथम तीन ते चार वेळा वेगवेगळे तापमान असलेल्या पाण्यात भाज्या स्वच्छ धुतल्या जातात, मग पाण्याचा निचरा केला जातो, भाज्या चिरल्या जातात आणि निर्जलीकरण करण्यात येते. आवश्यक असल्यास प्लवरायझिंगही (pulverizing) केले जाते. प्रत्येक भाजी-पाल्यासाठी घेण्यात येणारी खबरदारी वेगळी असते. शेवटी, अशा प्रकारे तयार केलेला माल पॅकेजिंग केला जातो.
मदतीचा हात
प्रेशियाची उत्पादने पहिल्यांदा विक्रीसाठी लॉन्च केली तेव्हा आकांक्षा यांच्या आई सौ.विजया बोरसे, मावशी सौ.विद्या काकडे आणि पती यांची त्यांना खूप मदत झाली. त्यांनी सर्व उत्पादनांचा, त्यांच्या वापराचा अभ्यास केला आणि हा निर्जलीकृत भाजीपाला नियमित स्वयंपाकात कसा वापरावा याची माहिती ग्राहकांना दिली. त्यामुळे, त्यांना ग्राहकांचा विश्वास प्राप्त झाला, मागणी वाढली व प्रदर्शन संपल्यावरही सतत ऑर्डर्स मिळत राहिल्या. दुसऱ्या वर्षी, त्यांना मुंबई ग्राहक पंचायतीचा मदतीचा हात मिळाला. मुंबई ग्राहक पंचायत ही मुंबईस्थित ग्राहकांच्या हक्कासाठी काम करणारी संस्था आहे. ते उत्पादनाचा दर्जा व गुणवत्ता याविषयी अत्यंत जागरूक आहेत. त्यांनी आकांक्षावर विश्वास ठेऊन त्यांना 7 प्रमुख ठिकाणी प्रदर्शनाद्वारे विक्री करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना संपूर्ण मुंबई, पनवेल, पुणे आणि नाशिक मधील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. उत्कृष्ट उत्पादन, गुणवत्ता, योग्य पॅकेजिंग, वापराविषयी स्पष्ट सूचनांमुळे ग्राहकांचा विश्वास प्राप्त झाला. कोरोना महामारीमुळे साल 2020 प्रभावित झाले आणि सर्व प्रमुख प्रदर्शने बंद होती. तथापि, आमच्या ग्राहकांनी आमची साथ सोडली नाही असे त्या मोठ्या अभिमानाने सांगतात. समाधानी ग्राहकांकडून त्यांना नियमित ऑर्डर्स मिळत आहेत, त्यांच्या विश्वासाच्या बळावर त्यांनी 2020 हे खडतर वर्ष पार केले आहे.
उद्योगाचा विस्तार
घरातूनच व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या आकांक्षा यांना नंतर मात्र उत्पादने घरातून तयार करणे तसं अवघडच होतं. ह्याला उपाय म्हणून समान विचारसरणीच्या अन्य स्टार्टअप उद्योगांशी त्यांनी संपर्क साधला व पुणे, नाशिक आणि सांगली येथील काही उद्योगांशी उत्पादनांसाठी सह्योग घेतला. साल 2019 मध्ये एका औद्योगिक वसाहतीत युनिट भाड्याने घेतले, एक लहान मॅन्युफॅक्चरिंग व पॅकेजिंग युनिट स्थापित करण्यासाठी लागणारी आवश्यक यंत्रे आणि जास्त क्षमतेचे डीहायड्ररही विकत घेतले. 2020 मध्ये त्यांनी व्यावसायिक गाळ्यांमध्ये स्थलांतर केले, त्यामुळे भाड्याची भरपूर बचत झाली. 2021 हे वर्ष चांगले असेल अशी त्यांना अपेक्षा आहे.. ह्या वर्षी अधिक प्रगत यंत्रसामग्री घ्यावी आणि आपली उत्पादन क्षमता वाढवावी असे त्यांचे ध्येय आहे. आज त्यांच्या युनिट मध्ये जवळपास 4.25 लाख रुपयांची विविध मशनरी आहे. यामध्ये ड्रायर, व्हेज कटर, वॉटर पुरीफायर, हिटर, सिलिंग मशीन, इंडक्शन, फिलर मशीन व इतरही मशीनचा यात सामवेश आहे.
त्यांचा हा प्रवास नुकताच सुरू झाला आहे, आणि त्यांना विश्वास आहे की ‘आत्मनिर्भर शेतकरी’ निर्माण करण्याच्या त्यांच्या या छोट्याशा प्रयत्नांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.
सुकलेल्या भाज्या खाणे तसे आपल्या संस्कृतीत नवीन नाही आणि कोरोनाच्या काळात त्यांची उपयोगिता प्रकर्षाने जाणवली आहे. त्यामुळे, सध्या सर्वत्र सुकविलेल्या भाज्या खाण्याची संस्कृती रुजू लागली आहे, त्यांची मागणी सुध्दा दिवसेंदिवस वाढत आहे. या फळ व भाज्यांना अनेक हॉटेल, विविध दुकान, घरगुती स्वरूपात यांची मागणी दररोज वाढत आहे. या उदयोगास देश व आंतराष्ट्रीयस्तरावर चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे. येत्या काही वर्षात मला शहापूर येथे, म्हणजे माझ्या माहेरी, एक फूड प्रोसेसिंग प्लांट उभारायचा आहे.. या उपक्रमात इतरही शेतकऱ्यांना सामील करून घ्यायचे आहे, जेणेकरून या भागात भाजीपाला लागवड वाढून शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे देखील मिळतील आणि ते आर्थिकदृष्ट्या अजून सक्षम देखील होतील. विशेष म्हणजे शेतकरी आपल्याच शेतमालावर प्रक्रिया करायला देखील शिकेल आणि शेतीत नफा वाढेल.. थोडक्यात काय तर पिकविणाराच विकायला शिकेल. या शिवाय, या प्रोजेक्टच्या माध्यमातून काही प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होईल.”
सौ. आकांक्षा विजय कोठे
प्रेशिया हेल्दी फूड्स, दातार कॉलनी, गणपती मंदिराजवळ, भांडुप ईस्ट मुंबई – 400042
जळगाव पत्ता : C/o. अमृत बोरसे, मुक्काम पोस्ट शहापूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव – 424206
फोन:+91 9833259904