सामान्य जनतेतील ‘असामान्य’ व्यक्तींना अचूक हेरुन त्यांचा यथोचित सन्मान करण्याची परंपरा 2021 च्या पद्म पुरस्कारांनी अबाधित ठेवली आहे. ‘पद्मश्री’ पुरस्कारानं यावर्षी सन्मानित करण्यात आलेल्या काही ‘रियल लाईफ हीरोंची’ ही संक्षिप्त ओळखः
1. पप्पाम्मलः
या आज्जींचं वय आहे फक्त 105.. कोईमतूर मधे राहतात. पन्नास वर्षांपूर्वी त्यांची आजी वारल्यावर किराणा मालाचं एक दुकान चालवायची जबाबदारी पप्पाम्मल वर आली. पण त्यांना आवड शेतीची. दुकानातील उत्पन्नातून थोडे थोडे पैसे बाजूला काढून त्यांनी दहा एकर शेती विकत घेतली व अनेक वर्षं एकटीनं राबून ती सांभाळली. निरनिराळे प्रयोग केले. कष्ट झेपत नाहीत म्हणून 80व्या वर्षी काही जमीन विकली. आज वयाच्या 105व्या वर्षी अडीच एकराचं ‘अॉर्गेनिक फार्म’ आज्जी चालवतात. दररोज दोनदा शेतात जातात.
2. मेमे छोंजोरः
वय 79. निवास लडाख मधल्या अंतर्गत भागात. ‘कार्ग्याक’ हे अतीव दुर्गम गाव ‘रमझाक’ या जम्मू भागातल्या गावाला जोडण्यासाठी सलग तीन वर्षं खपून या माणसानं एकट्यानं 38 किलोमीटरचा रस्ता तयार केला. तृतीय श्रेणी सरकारी नोकर म्हणून निवृत्त झालेल्या या गृहस्थानं स्वतःची सारी कमाई (57 लाख) यासाठी खर्च केली. स्वतःचं घरही विकलं. एक जेसीबी व 5 गाढवांच्या सहाय्यानं त्यानं हा चमत्कार केला.
3. नंदा पृस्टीः
वय सुमारे 90. गेली 70 वर्षे ओडिसातील ‘कनित्रा’ नामक खेड्यात विद्यार्थांना मोफत शिकवतात. गावातील चार पिढ्यांना त्यांनी शिकवलं आहे. आजही दररोज सकाळी 7.30 आणि दु. 4.00 वा. ‘नंदा’ सरांचे वर्ग चालू असतात. गावातली मुलं अन्य शाळांत शिकत असली तरी नंदा सरांच्या वर्गात आवर्जून हजेरी लावतात.
4.नानाद्रो माराकः
मेघालय.. वय 65! यांच्या 5 हेक्टरच्या शेतात ‘ब्लॕक गोल्ड’ची अर्थात ‘काळ्या मिरी’ची 3400 झाडं आहेत. त्यांनी ही झाडं अशा पध्दतीनं वाढवली आहेत की सामान्य सरासरी उत्पादनाच्या ‘तिप्पट उत्पादन’ ही झाडं देतात. राज्यातील शेतकऱ्यांनी यापासून प्रेरणा घेऊन आपलं उत्पन्न वाढवावं म्हणून ‘माराक’ यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.
5. सुजीत चटोपाध्यायः
वय 77. औसग्राम (प.बंगाल)! केवळ दोन रुपये ‘वार्षिक फी’ घेऊन, गेली 17 वर्षं हा माणूस ‘फकीर पाठशाला’ चालवत आहे. इथे, आठवी ते टी.वाय्. पर्यंतच्या मुलांना ‘समाजशास्त्राचे’ विषय बंगालीतून शिकवले जातात. सध्या या खेड्यातल्या प्रशालेत 350 विद्यार्थी शिकत आहेत.
6. राधे देवीः
मणीपूर, वय 80+. ‘पोटलोई’ हा मणीपुरी विवाहात वधूने घालायचा पारंपरिक पोशाख! यात कमरेला नेसायचं वस्त्र ‘पिंपाच्या’ आकाराचं असतं. हे वस्त्र शिवणं अतिशय किचकट व कष्टाचं काम! ही लुप्त होत चाललेली कला ‘राधे देवीने’ गेली साठ वर्षं जतन केली आहे. आजही, या वयात केवळ पाच दिवसात ती एक ‘पोटलोई’ शिवते. या गोलाकार झग्याची किंमत दहा ते पंधरा हजार असते.
7. शाम पलीवालः
राजस्थान! 2006 मधे यांच्या मुलीचं दुःखद निधन झालं. तेव्हापासून गावात ‘मुलीचा जन्म’ झाला की 111 रोपं लावण्याचा उपक्रम या माणसानं चालू केला. गेली पंधरा वर्षं अव्याहतपणे तो चालू आहे. दरवर्षी सुमारे साठ मुली या खेड्यात जन्माला येतात. या उपक्रमामुळे गाव हिरवंगार झालं आहे. ‘पालिवाल’ यांनी गावात छोटी छोटी तळीही बांधली आहेत. त्यामुळे दुष्काळ नाहीसा झाला आहे. ‘वॉटर टेबल’ वाढलं आहे. आता ग्रामपंचायतही नवागत मुलीच्या नावाने बँकेत फिक्स्ड डिपॉझीट ठेवत आहे.
यंदाच्या 102 पद्मश्रींपैकी काही प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची ही झलक! उर्वरित यादीत आणखीही समकक्ष व्यक्ती सापडतील. अशा उत्तुंग व्यक्तींच्या सन्मानानं ‘पुरस्काराची उंची’ खचितच वाढते.
साभार:- (धनंजय कुरणे)