जास्त दूध देणा-या दुधाळ जनावरांमध्ये शरीरातून दुधावाटे कॅल्शीयम, मॅग्रेशियम, ग्लुकोज इत्यादींचा निचरा होतो. खनिज मिश्रणे योग्य प्रमाणात मिळाली नाहीत, तर जनावरांची कार्यक्षमता आणि दूध कमी होते. क्षारांच्या कमतरतेमुळे दुभत्या गाई-म्हशींना विविध आजार दिसतात. हे आजार टाळण्यासाठी जनावरांना सकस आणि संतुलित आहाराबरोबर खाद्यातून शिफारशीत प्रमाणात खनिज मिश्रणे देणे गरजेचे आहे.
जनावरांना रोजची सोडियम क्लोराइडची गरज ३0 ग्रॅम असते. शरीरातील रक्तद्रवाचा समतोल राखण्यासाठी मिठाचा उपयोग होतो.
- कॅल्शियम हे हाडांची वाढ, स्नायूंच्या हालचाली, रक्त गोठणे, दूधनिर्मितीसाठी उपयोगी असते. रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण ९ ते ११ मि.ग्रॅम प्रति १०० मिलि असते. एक लिटर दूध तयार करण्यासाठी साधारण २ ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते.
- स्फुरदाचा हाडांच्या वाढीसाठी उपयोग होतो. कॅल्शियमबरोबर याचे प्रमाण २ भाग कॅल्शियम, तर १ भाग स्फुरद असे असते. स्फुरदच्या कमतरतेमुळे जनावर गाभण न राहणे, दूध कमी होणे, वाढ कमी होणे ही लक्षणे दिसतात. रक्तातील स्फुरदाचे प्रमाण ४ ते ६ मिलि ग्रॅम/१oo मिलि असते.
- हाडांसाठी व शरीराच्या विविध रासायनिक क्रियांसाठी मॅग्रेशियमची आवश्यकता असते. रक्तातील मॅग्रेशियमचे प्रमाण २ ते ३ मि.ग्रॅ./ १00 मिलि असते. शरीरातील संप्रेरकांच्या नियंत्रणाखाली क्षार शरीराला उपलब्ध करून दिले जातात.
जनावरातील खनिजांचे प्रमाण
अ.क्र. | शरीरातील घटक | कॅल्शियम | स्फुरद | मॅग्नेशियम |
---|---|---|---|---|
१ | हाडे (१०० ग्रॅम) | ३६ ग्रॅम | १७ ग्रॅम | ०.८ ग्रॅम |
२ | रक्त (१०० मिली ) | १०-१२ मी.ग्रॅम | ४-६ मी. ग्रॅम | २-३ मी.ग्रॅम |
३ | दुध (१०० मिली.) | १.२ ग्रॅम | ०.९६ ग्रॅम | ०.१२ ग्रॅम |
- अडथळा निर्माण होतो आणि कॅल्शियम जास्त असेल, तर आयोडीनचे शोषण कमी होते.
- आतड्यांचा दाह झाल्यास एकूण क्षार शोषण कमी होते.
- जर्सी गाईस कॅल्शियमची, तर होल्स्टिन फ्रिजियन गाईस मॅग्रेशियमची जास्त गरज लागते.
- म्हशींना स्फुरद आणि लोह यांची गरज गाईपेक्षा जास्त असते.
- गाभण आणि दूध देणा-या गाई-म्हशस जादा क्षारांची गरज असते.
- जनावरांना नियमित क्षार-मिश्रण नसेल, तर रोगप्रतिकारक शक्ती योग्य प्रमाणात निर्माण होत नाही.
- साधारणतः ५oo किलो वजनाच्या गाई-म्हशींत रोजच्या क्षारांची गरज पोटॅशियम ३५ ते ४० ग्रॅम, कॅल्शियम २० ग्रॅम, स्फुरद १५ ग्रॅम, सोडियम ९ ग्रॅम, मॅग्रेशियम ४ ते ५ ग्रॅम, लोह १oo मिली ग्रॅम, मॅगनिज १oo मिली ग्रॅम, तांबे ५० ते १oo मिली ग्रॅम, जस्त २५ ते ३o मिली ग्रॅम, आयोडीन ५ ते ७ मिली ग्रॅम, कोबाल्ट १ मिली ग्रॅम, सेलिनियम १ मिली ग्रॅम या प्रमाणात असते.
- जनावरांच्या हाडात ४५ टक्के पाणी, ५ टक्के क्षार व ३० टक्के चरबी आणि प्रथिने असतात.
- जमिनीतील क्षार, वापरलेली खते-पाणी, हवामान, चा-याचा प्रकार यावरून चा-यात किती खनिजे असू शकतात. हे कळते. द्विदल चा-यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. जलद वाढणा-या कोवळ्या चा-यात मॅग्रेशियमचे प्रमाण कमी असते. जसा चारा जुनाट होत जातो, तसे त्यातील स्फुरदचे प्रमाण कमी होते.
- नत्रयुक्त खतामुळे स्फुरद, मॅग्रेशियम, पोटॅशियम, आयोडीन यांचे स्फुरद यांचे प्रमाण कमी होते.
खनिज कमतरतेमुळे होणारे आजार
दुग्धज्वर (मिल्क फोवर)
या आजारास दुग्धज्वर, दुधाचा ताप किंवा मिल्क फीवर असे नाव असले, तरी त्यामध्ये जनावराचे तापमान नेहमीपेक्षा कमी झालेले असते व जनावरास ताप नसतो. आहाराचे योग्य व्यवस्थापन करून व पशुतज्ज्ञांकडे योग्य उपचार करून हा आजार टाळता येतो.
दुग्धज्वर किंवा मिल्क फिवर हा आजार साधारणपणे जास्त दूध देणा-या गाई आणि म्हशींमध्ये आढळून येतो. जास्त दूध देणारी जनावरे त्यांच्या तिस-या ते पाचव्या वितामध्ये या आजारास बळी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. पहिल्या किंवा दुस-या वितामध्ये जनावरे कमी वयाची किंवा तरुण असतात. या वयामध्ये जनावराची चा-यातील क्षार शोषण्याची क्षमता तसेच हाडांमध्ये असलेले जास्त कॅल्शियमचे प्रमाण यांमुळे हा आजार होण्याचा धोका फार कमी असतो. हा आजार मुख्यत्वे संकरित गाई व म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. रक्तातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. मुख्यतः ही कमतरता ५ ते १o वर्षे वयाच्या गाई आणि म्हशींमध्ये जास्त आढळून येते. गाई आणि म्हशी विल्यानंतर ४८ तासांच्या आत अचानक कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. विल्यानंतर १ ते ३ दिवसांत रोगाची लक्षणे दाखविण्यास सुरुवात करते. जनावर अस्वस्थता आणि अशक्तपणा येऊन जनावर खाली बसते अशी मुख्य लक्षणे दिसू लागतात.
आजाराची कारणे
रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे, हे या आजाराचे मुख्य कारण आहे. यासाठी खालील गोष्टी कारणीभूत ठरतात.
- गाभण किंवा दुधाळ जनावरांतील कॅल्शियमची वाढलेली गरज
- चान्यातून कमी प्रमाणात कॅल्शियम मिळणे. जनावरांच्या आहारात
- कॅल्शियम व स्फुरदाचे योग्य प्रमाण नसणे (२:१) तसेच ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता
- आतड्यांमधून चान्यातील कॅल्शियमचे शोषण न होणे.
- जनावर विण्यापूर्वी गाभण काळात गरजेपेक्षा जास्त कॅल्शियम देणे.
- शरीरात पॅराथारमोन या संप्रेरकाची कमतरता किंवा कॅल्शिटोनीनचे अधिक प्रमाण.
- आहारात ऑक्झेलेट आणि मॅग्रेशियमचे प्रमाण अधिक असणे.
- विण्यापूर्वी किंवा विल्यानंतर जनावराची होणारी उपासमार तसेच विण्याच्या सुमारास जनावरावर येणारा ताण.
- शेतकरी उसाच्या हंगामात दुधाळ जनावरांना उसाचे वाढे जास्त प्रमाणात खाऊ घालतात. वाढ्यांमध्ये असणारे ऑक्झेलेट चा-यातील कॅल्शियमबरोबर संयुग तयार करून शेणावाटे बाहेर निघून जाते. त्यामुळे जनावरास कॅल्शियम मिळत नाही. यामुळे उसाचे वाढे हे कॅल्शियम कमी होण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.
- हिवाळा हा म्हशींचा विण्याचा हंगाम असतो आणि यामध्ये जास्त थंडी, हिरवा चारा न मिळणे व जास्त दूध उत्पादन या कारणांनी हा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो.
आजाराची लक्षणे
- प्रथम अवस्था – ही अवस्था फार कमी काळ राहत असल्यामुळे ब-याचदा लक्षात येत नाही. यामध्ये जनावर सुस्त होते आणि चारा खाणे व दूध देणे कमी करते . डोके हलविणे , सतत जीभ बाहेर काढणे , दात खाणे , अडखळतचालणे अशी लक्षणे दिसू लागतात.
- द्वितीय अवस्था – या अवस्थेत जनावर खाली बसते. ते उभे राहू शकत नाही. बसलेल्या अवस्थेत मान एका बाजूला वळवते. शरीर थंड पडते, श्वासोच्छुास व नाडीचे ठोके जलद होतात, नाकपुड्या कोरड्या पडतात. शेण टाकणे व लघवी करणे बंद होते. दूध देणे बंद होते, रवंथ करणे थांबून पोट फुगते. आवाज दिल्यास किंवा उठविण्याचा प्रयत्न करूनही जनावर उभे राहत नाही.
- तिसरी अवस्था – या अवस्थेमध्ये जनावरे आडवी पडतात. श्वासोच्छुास मंद होतो. लावला असता पापण्यांची हालचाल होत नाही. या अवस्थेत उपचार झाला नाही, तर जनावर दगावते. या आजारास दुग्धज्वर, दुधाचा ताप किंवा मिल्क फोवर असे नाव असले, तरी यामध्ये जनावराचे तापमान नेहमीपेक्षा कमी झालेले असते व जनावरास ताप नसतो. उपचार कॅल्शियम बोरोग्लुकोनेट २५ टक्के इंजेक्शन साधारण १ मिलि प्रतिकिलो वजन या प्रमाणात शिरेतून दिल्यास जनावरे बरी होतात. औषध वेगाने किंवा अधिक प्रमाणात दिल्यास कॅल्शियमची विषबाधा होते. यासाठी इंजेक्शन हळुवारपणे देण्याची काळजी पशुवैद्यकीय तर काहींमध्ये कृचितच दुस-या आणि तिस-या दिवशी इंजेक्शन देण्याची गरज भासते. पुरेसा किंवा तत्काळ उपचार न होणे किंवा कमी प्रमाणात इंजेक्शन देणे यांमुळे आजार बरा होत नाही. आजारातून बरे होण्याचे लक्षण म्हणजे जनावर उठून उभे राहते. नाकपुड्या ओल्या होऊन शरीराचे तापमान पूर्ववत होते. चारा खाणे, लघवी करणे आणि शेण टाकणे सुरू होते.
प्रतिबंधात्मक उपाय
- विण्यापूर्वी जनावरास योग्य आहार द्यावा.
- गाभण काळात खूप जास्त प्रमाणात खुराक देऊ नये, तसेच उपासमारही होता कामा नये.
- गाभण काळात जनावरांना थोडेसे फिरवल्यास व्यायाम मिळतो व कॅल्शियमची चयापचय क्रिया कार्यशील राहते.
- गाभण तसेच विलेल्या जनावरास साधारण ५0 ग्रॅम खनिज मिश्रण खुराकातून द्यावे.
- जनावरास साळीचे तण, उसाचे वाढे जास्त प्रमाणात खाऊ घालू नये.
- विण्यापूर्वी साधारण एक आठवडा जीवनसत्व ड’चे इंजेक्शन देणे फायदेशीर ठरते.
- जनावर विल्यानंतर शिरेवाटे किंवा खुराकातून कॅल्शियम दिल्यास उपयुक्त ठरते.
केटोसिस (रक्तजल आम्लता)
अतिदूध उत्पादन असणा-या जनावरांमध्ये व्यायल्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या कालावधीत हा आजार दिसून येतो. यामध्ये जनावराच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी होते. शरीरात ऊर्जा तयार होताना, किटोन आम्लाचे प्रमाण वाढते आणि ते रक्तात पसरते. शरीराच्या ऊर्जेकरिता आहारात प्रथिने, तंतुमय पदार्थ, ऊर्जा हे घटक गाईच्या दूध देण्याच्या प्रमाणात असावे लागतात. आहार जर असंतुलित असेल, तर ही ऊर्जा मिळविण्यासाठी शरीरातील चरबी वापरली जाते. लक्षणे जनावराचे दूध उत्पादन २० ते ४० टक्क्यांनी कमी होते. आंबवण खाणे जनावर बंद करते. रवंथ करीत नाही. तोंडाला, लघवीला व दुधाला गोड वास येतो. खूप लाळ गळते. गाय हनुवटी किंवा नाकपुडी गव्हाणीला किंवा जमिनीला टेकवून ठेवते.
उपाय
- जनावराला गूळ आणि खनिज मिश्रण खायला द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत.
- हा आजार उद्भवू नये, यासाठी विण्यापूर्वी जनावराच्या आहारात अधिक खुराक द्यावा. आहारामध्ये चांगल्या प्रतीचा चारा असावा.
- प्रतिबंधक उपाय म्हणून दुधाच्या प्रमाणात संतुलित आहार देऊन ऊर्जेचा पुरवठा योग्य प्रमाणात करावा.
डाऊनर गाईचा आजार
- दुग्धजन्य ताप या आजारात लागोपाठ दोन वेळा योग्य ते औषधोपचार करूनही ज्या वेळी गाय-म्हैस उठून उभी राहत नाही, त्या वेळी जनावराला डाऊनर गाईचा आजार’ झाला आहे, असे समजावे.
- व्यायल्यानंतर गाय-म्हैस उठून उभी राहू न शकणे यामागे अनेक कमी-अधिक ताणामुळे होणारी दुखापत, मागच्या पायाच्या सांध्याचे आजार, दुग्धजन्य ताप, पायाचे आखडलेले स्नायू
- जास्त दूध देणा-या गाई-म्हशींत हा आजार व्यायल्यानंतर २-४ दिवसांत दिसतो.
- रक्तातील कॅल्शियम, स्फुरद, मॅग्रेशियम यांचे प्रमाण योग्य असते; पण स्नायूंतील पोटॅशियमचे प्रमाण कमी होते. रक्तातील सिरम ग्लुटॅमिक ऑक्झोलो असिटेट ट्रान्सऍमनेजचे प्रमाण वाढलेले आढळते.
लक्षणे
- गाई-म्हशींचे खाणेपिणे व्यवस्थित असते. ताप नसतो. उठू शकत नाहीत; परंतु उठण्याचा प्रयत्न करतात.
- कधीकधी शरीराचा तोल सांभाळता न आल्यामुळे जनावरे पडतात.
- काही वेळा कुत्र्यांप्रमाणे दोन पाय पुढे आणि दोन पाय मागे पसरून बसतात.
उपचार
- पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने तातडीने उपचार करावेत.
- गाईच्या पोटाच्या खाली पोते घालून उभे करावे.
- पायांना वेदनाशामक मलमाने मालीश करावे.
-
मँग्रेशियमची कमतरता
- दुभत्या गाई-म्हशींत व्यायल्यानंतर मॅग्रेशियम क्षारांच्या रक्तातील आत्यंतिक कमतरतेमुळे हा आजार होतो.
- रक्तात या क्षारांचे प्रमाण १.८ ते ३ मिली ग्रॅम/ १oo मिलि असते. रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण जेव्हा वाढते, तेव्हा ही लक्षणे प्रकर्षाने दिसतात
- वयस्कर म्हाता-या गाई, माजावरील म्हशींत हिवाळ्यात हा आजार जास्त दिसतो.
- खाद्यात ज्या वेळी प्रथिनांचे प्रमाण ऊर्जेपेक्षा जास्त असते, त्या वेळी मॅग्रेशियमची कमतरता दिसून येते.
- खाद्यातून नियमित मीठ दिल्यास मॅग्रेशियमचे शोषण चांगल्या प्रकारे होते. जलद वाढ होणा-या चा-यात (ओट) मॅग्रेशियमचे प्रमाण कमी असते. हाच चारा सारखा खाण्यात आल्यास हा आजार उद्भवता. कोवळ्या हिरव्या चा-यात मॅग्रेशियमचे प्रमाण जास्त असते.
लक्षणे
- वर आडवे पडून हात-पाय झाडते, तोंडास फेस येतो, स्नायू अति जलद होतात.
- जनावर अस्वस्थ होते, चालताना हेलपाटत चालते, दूध कमी देते.
- अति तीव्र आजारात स्नायूंच्या हालचालीमुळे शरीराचे तापमान वाढते; परंतु जनावरांना ताप नसतो.
उपचार
- पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने कॅल्शियमबरोबर मॅग्रेशियम क्षार एकत्र असलेले मिश्रण तत्काळ हळूहळू जनावराच्या शिरेतून द्यावे.
- जी दुभती जनावरे लागोपाठ १-२ दिवस अजिबात चारा खात नाहीत, त्यांच्यात हा आजार दिसून येतो.
- प्रतिबंधक उपाय खाद्यातून रोज २० ग्रॅम मॅग्रेशियम क्षार खनिज मिश्रणाद्वारे खाद्यातून अवश्य द्यावे.
- नुसत्या दुधावरील तीन महिने वयाच्या वासरातदेखील हा आजार होऊ शकतो. कारण, शरीरवाढीच्या प्रमाणात दुधातून मॅग्रेशियम फार कमी मिळते.
स्फुरदची कमतरता
- रक्तातील स्फुरदाचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा आजार दुभत्या आणि गाभण जनावरांत जास्त प्रमाणात दिसून येतो.
- स्फुरदाचा उपयोग हाडांच्या वाढीसाठी, शरीरातील रासायनिक क्रिया तसेच प्रथिने तयार करण्यासाठी होतो.
लक्षणे
- याच्या कमतरतेने जनावर माजावर येत नाही, दूध कमी देते, तांबड्या रक्तपेशी फुटल्यामुळे लघवीचा रंग लाल होतो.
- जनावरांना कावीळ होते, काम करणारे बैल उरी भरल्यासारखे , जनावरांना ताप नसतो.
उपचार
- पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने तत्काळ उपचार करावेत.
- स्फुरदाचे आतड्यातील शोषणाचे प्रमाण ५० ते ६० टक्के असते. जमिनीतील मूळ स्फुरदाच्या प्रमाणावरून त्या जमिनीतील चान्यात किती प्रमाण आहे, हे ठरते.
- साधारणपणे ४०० किलो वजनाच्या दुभत्या गाई-म्हशीला रोज १३ ग्रॅम, तर गाभण काळात १८ ग्रॅम स्फुरदाची आवश्यकता असते.
- गव्हा-तांदळाचा भुसा, द्विदल धान्यांची टरफले यांत स्फुरादचे प्रमाण अधिक असते.
- वारंवार पोटफुगी होणा-या जनावरांत कॅल्शियम/ स्फुरदाची कमतरता असू शकते. स्फुरदाच्या कमतरतेमुळे माजावरील जनावरांचा सोट पाण्यासारखा पातळ असतो. दुभत्या जनावरात सडाच्या टोकांच्या स्नायूमध्ये सैलपणा निर्माण होतो. त्यामुळे सड़ातून दूध थेब-थेब टिपकते.
- काही वेळा स्फुरदाच्या कमतरतेबरोबर तांबे या धातूचीही कमतरता स्फुरदाबरोबर तांबेही खाद्यातून द्यावे.
- जनावरांना कावीळ झाली असल्यास त्यासाठी लिव्हर टॉनिक आणि पूरक औषधे द्यावीत.
रोगप्रसार रोखण्यासाठी काळजी घ्यावी
- रोगी जनावरास निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
- रोगी जनावरांचे मलमूत्र दूर नेऊन पुरून टाकावे.
- मेलेल्या रोगी जनावरांच्या नाकातोंडात व गुदद्वारात निर्जतुक द्रवाचे बोळे घालून दूर नेऊन पुरावेत.
- संसर्ग झाला असल्याची शंका असलेल्या जनावरांना शक्यतो
- उपकरणे योग्यरीत्या स्वच्छ व निर्जतुक करावीत.
- अतिरिक्त पशुखाद्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
- मृत जनावरांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी.
- माशा, कीटक यांच्यावर नियंत्रण ठेवावे.
- रोगाची लागण झालेल्या जनावरांची काळजी घेणारे व्यक्ती, वापरण्यात येणारी उपकरणे ही वेगवेगळी असावीत. त्यांचा निरोगी जनावरांशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- रोगाची लागण झालेली जनावरे कळपातून वेगळी करून त्यांच्यावर जवळच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तत्काळ उपचार करावेत.
- गोठ्याच्या भिंती ३ ते ६ महिन्यांनी चुन्याची सफेदी द्यावी.
- गोठ्याच्या सभोवताली साठलेल्या पाण्याचा वेळीच निचरा करावा.
स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन