मनुष्याच्या प्रमुख तीन गरजांपैकी वस्त्रांशी संबंध असलेल्या कापसाचा इतिहास देखील मानवी संस्कृतीएेवढाच जुना अाहे. साधारण: इसवी सन पूर्व ७००० वर्षापूर्वीपासून भारतीय उपखंडात कापसाची शेती केली जात आहे. पाकिस्तानातील मेहरगढ येथील उत्खननातून याचा पुरावा मिळाला अाहे. कापूस व कापसाच्या सुती वस्त्रांसाठी होणारा उपयोग ह्यांविषयीचे ज्ञान भारतीयांना फार पूर्वीपासून होते. कापासाच्या रानटी अवस्थेतील काही जाती उष्ण प्रदेशांत आढळत असल्याने तो मूलत: उष्णदेशीय आहे. ऋग्वेदातही कापसाचा उल्लेख आहे. मनूनेही धर्मशास्त्रात सुती वस्त्रांचा उल्लेख केलेला आहे. ज्ञात असे सर्वांत जुने कातलेले सूत मोहों-जो-दडो येथील उत्खननात सापडलेले आहे. मनुष्य वस्त्र परिधान करीत असल्यापासून मानवी संस्कृतीमध्ये कापसाचे स्थान अढळ आहे. सध्या कापूस आणि त्यासंबधित बाजारपेठ हा जगण्याचा, राेजगाराचा प्रमुख आधार झालेला आहे.
भारतातील सुत विणकामाचा जगभर डंका
इ. स. पू. १५०० ते इ. स. अठराव्या शतकापर्यंत म्हणजे जवळ – जवळ ३,३०० वर्षे भारत कापूस उद्योगावर आघाडीवर होता. त्यानंतर मात्र ब्रिटीश सरकारच्या धोरणामुळे भारतीय कापूस उद्योगावर प्रतिगामी परिणाम झाला. भारतातूनच कापसाचा व कापड विणण्याच्या कलेचा भूमध्य समुद्रालगतच्या देशांत आणि यूरोप खंडात प्रसार झाला. हीरॉडोटस (इ. स. पू. ४५०) यांनी भारतीय स्त्रिया सुती वस्त्रे कशा विणीत असत त्याचे वर्णन केलेले आहे. भारतीय अतिथ्य, शौर्य व स्वाभिमान यांविषयी अलेक्झांडर (इ. स. पू. ३२७) जितका प्रभावित झाला होता, तितकाच ते येथील कापूस उद्योगाविषयी व भारतीयांच्या सुती कपड्यांविषयीही प्रभावित झाला होता. ‘विशिष्ट रानटी झाडे फळाऐवजी लोकर देतात आणि ह्या लोकरीचे सौंदर्य व प्रत मेंढ्यांपासून मिळणाऱ्या लोकरीपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे. भारतीय लोक त्यापासून तयार केलेले कपडे घालतात’, असा उल्लेख अलेक्झांडर यांने केला होता. त्यांने भारतातून परतताना कापूस ईजिप्त, ग्रीस व इतर भूमध्य समुद्रालगतच्या देशांमध्ये नेला.
भारतातून कापसाचा प्रसार केवळ पश्चिमेकडेच नव्हे तर पूर्वेकडेही झाला. इ. स. सातव्या शतकात कापूस भारतातून चीनमध्ये गेला. सुरुवातीला शोभेची झाडे म्हणून चिनी लोक कापसाची झाडे आपल्या बागेत लावत असत. नवव्या शतकानंतर तेथे कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड होऊन त्यापासून सूत व कापड निर्माण होऊ लागले. मेक्सिकोत कापसाच्या बोंडाचे अस्तित्व जरी इ. स. पू. ५००० वर्षे इतके प्राचीन असले, तरी तेथे कापसाचा कापडासाठी उपयोग फक्त इ. स. पू. २५०० वर्षांपासूनच माहीत होता, असे ज्ञात पुराव्यावरून दिसते. त्याच सुमारास पेरू देशातील लोकही कापूस लावून त्यापासून कापड निर्माण करीत असत.
पांढर सोन
जगातील कपासाखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे. महाराष्ट्र राज्यातही मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतात. तसेच गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांतही कापसाची लागवड केली जाते कापूस पासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त तंतू पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, खानदेशात कापसाची शेती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कापसाला “पांढरं सोनं’ म्हणतात, ही वास्तविकता 1972 च्या कापसाच्या भावाची व सोन्याच्या भावाची तुलना केल्यास स्पष्ट होईल. 1972च्या आसपास एक तोळा (दहा ग्रॅम) सोन्याचा भाव 250 ते 300 रुपये होता व कापसाचा भाव 250 रुपये प्रति क्विंटल होता. म्हणजेच एक क्विंटल कापूस विकून दहा ग्रॅम सोनं विकत घेता येत होते. म्हणूनच कापसाला पांढर सोन देखील म्हणतात. या पांढऱ्या सोन्याची खानदेशातील कापूस लागवड म्हणजे कापूस विक्री करणाऱ्या कंपन्यासाठी एक प्रयोगशाळाच आहे. कारण या भागात यशस्वी झालेले वाण हे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात कंपन्या विक्री करतात.
कापसासाठी १९१९ मध्ये खानदेशात रेल्वे
इतिहासाची पाने चाळली तर असे लक्षात येते, की इंग्रज सरकारने मॅंचेस्टर- लॅंकेशायरच्या कापड गिरण्यांना कापसाचा पुरवठा योग्य प्रमाणात होत राहावा म्हणून विदर्भात कापसाच्या शेतीला प्रोत्साहन दिले. कापसाच्या शेतीतून झालेले उत्पादन योग्य प्रकारे हाताळण्याची म्हणजेच प्रक्रिया, बाजारपेठ, वाहतूक ही सर्व व्यवस्था केली. जिनिंग – प्रेसिंग फॅक्टरीचा विकास झाला. रेल्वे मार्ग टाकण्यात आलेत. यवतमाळ, मूर्तिजापूर, अमरावती- बडनेरा, जलंब – खामगाव, आर्वी-पुलगाव या रेल्वे मार्गाची निर्मिती या परिसरातील कापूस गाठी मुंबईच्या बंदरावर व तेथून मॅंचेस्टर- लॅंकेशायरच्या मिलसाठी नेण्याची व्यवस्था उभी केली होती. केऊन काय या पिकाच्या अर्थकारणाचा अंदाज पाहता त्यांनी कापसासाठी १९१९ मध्ये खानदेशात रेल्वे सेवा सुरु केली
खान्देशी कापूस बाजारपेठेचा समृद्ध इतिहास……..…
पांढर साेनं अन् समृद्धीच लेणं अस म्हटल जात असलेल्या कापसाची खान्देशातील बाजारपेठ एक हजार काेटींवर पाेहचली अाहे. या बाजारपेठेचा इतिहास देखील रंजक अाहे. स्वतंत्र्यपुर्व काळात उत्तरेतून येणारे मुघल दक्षिणेतील स्वाऱ्यानंतर परतीच्या प्रवासात महाराष्ट्रातील बाजारपेठा लुटत असत. त्यात खान्देशातील तलम कापूस अाणि रूईचाही माेठा समावेश हाेता. उत्तरेच्या स्वाऱ्यांवर जाणाऱ्या पेशव्यांसाेबत जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडून खान्देशी कापूस काबुल, कंदाहरमार्गे अरबी देशांमध्ये पाेहचला हाेता. पुढे पाेर्तुगीज, डच, फ्रेंच अाणि इंग्रजांनी ही बाजारपेठ हेरली. या कापसाच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले. तापी, गिरणा, पुर्णा, नर्मदा या नद्याच्या खाेऱ्यात हाेणारे कापसाचे उत्पादन अधिक गुणवत्ता पुर्ण हाेते. त्यातही जळगाव जिल्ह्यातील कापूस अधिक गुणवत्तापुर्ण असल्याने इंग्रजांनी विदर्भ, खान्देश अाणि मराठवाड्यात काही ठिकाणी केवळ मुंबईच्या बंदरापर्यंत कापूस वाहतुकीसाठी रेल्वेलाईट टाकल्या हाेत्या. जळगाव जिल्ह्यात भुसावळ-मुंबई या प्रमुख रेल्वेमार्गाला जाेडणाऱ्या पाचाेरा ते जामनेर रेल्वेचा प्रयाेग सन १९१९ मध्ये त्यासाठीच असल्याचे जाणकार सांगतात. विदर्भ अाणि जामनेर परिसरातून येणारा कापूस या रेल्वेने मुंबईतील बंदरावर पाेचविला जात हाेता. येथील कापसाला चांगली बाजारपेठ असल्याने एकट्या जळगाव जिल्हयात कापसाचे क्षेत्र ५ लाख हेक्टरपर्यंत पाेहचले अाहे. राज्यातून १ काेटी कापूस गाठींची बाहेर निर्यात हाेत असून त्यात एकट्या खान्देशाचा वाटा १० लाख कापूस गाठींचा आहे. १०० काेटींची बाजारपेठ आणि त्यावर ५०० काेटींच्या प्रक्रिया उद्याेगांचा डाेलारा उभा आहे. त्यामुळेच येत्या काळात जळगावला भविष्यातील काॅटन हब म्हणून पाहिले जात अाहे.
कापूस ते कापड भावातील तफावत
पूर्वीपासून कापूस उत्पादक शेतकरी हा कापसाच्या भावाच्या बाबतीत विचित्र स्थितीत सापडत आहे. सरकार यामध्ये लक्ष घालून योग्य ते निर्णय वेळोवेळी घेत असले तरीही कास्तकारांच्या स्थितीत फार लक्षणीय बदल झालेले नाहीत. “कापूस स्वस्त, कापड महाग’ हे इंग्रजांचे आर्थिक धोरण होते. 1947 नंतरही या धोरणात बदल झाला नाही. बदल झाला तो हाच की कापूस मॅंचेस्टरच्या कापड गिरण्यांत जाण्याऐवजी मुंबई-अहमदाबादच्या कापड गिरण्यांत गेला. पण आर्थिक धोरण तेच सुरू राहिले. 1968 च्या सुमारास जागतिक कापूस बाजारात प्रचंड मंदीची लाट आली. त्याचा परिणाम भारतातील कापूस भावावर होणे स्वाभाविकच होते. या मंदीमुळे शेतकऱ्यांचा असंतोष वाढला. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला 1972मध्ये “कापूस एकाधिकार खरेदी’ योजनेचा प्रारंभ भरावा लागला. पश्चिषम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी यशस्वी झाली होती. ऊस उत्पादकांना ऊस ते साखर या प्रक्रियेतील फायदा मिळू लागला होता. त्याच धर्तीवर “कापूस ते कापड’ असा विचार कापूस एकाधिकार योजना प्रारंभ करताना मांडण्यात आला होता. कापूस ते कापड स्वप्नच राहिले. पण रुई बाजारातील अनिश्चिकतीतेवरही परिणामकारक नियंत्रण ठेवण्यात अपयश आले. राज्याबाहेर कापसाला भाव जास्त व महाराष्ट्रात कमी, असाही पेच उभा झाला. यातून बाहेर निघण्यासाठी सर्वप्रथम 1978 मध्ये सरकारने योजनेत क्रांतिकारक बदल घडवून आणले. सरकारची सुधारित कापूस खरेदी योजना जाहीर करून महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल केले.
1994 मध्ये जागतिक बाजारात कापसाच्या भावात प्रचंड तेजी आली. या वर्षी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना (WTO) झाली. जागतिक बाजारात एक पौंड रुईचा भाव एक डॉलर दहा सेंट (म्हणजेच 75 ते 80 रुपये प्रति किलो) झाला होता. भारतातील बाजारपेठेत ही 2400 ते 2500 रुपये प्रति क्विंटल कापसाचे भाव झाले होते. या सर्व दबावामुळे तेव्हाचे मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांनी दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर करून कापूस एकाधिकार खरेदी ही योजना राबविली.
स्वातंत्र्याची ठिणगी कापसातूनच…
व्यापारी धोरणाच्या इंग्रजांनी कमी दरात कच्चा माल घेऊन जास्त दरात पक्का माल (कपडे) भारतात विक्री करायला सुरुवात केली आणि लाखो लोकांचा रोजगार नष्ट झाला. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीत खादीला अनन्यसाधारण महत्व होते. खादी म्हणजेच स्वदेशी चळवळ असे समजले जात होते. भारतामध्ये जेव्हा ब्रिटीश सत्तेविरुद्ध बंड पुकारले गेले तेव्हा ही चळवळ पुढे नेण्याचे अनेक मार्ग अवलंबले गेले. यातील मुख्य चळवळ होती ती म्हणजे ‘स्वदेशी’ आणि यातील प्रमुख अंग होते कापसापासून निर्मित खादी वापर करणे एकूण काय स्वातंत्र्याची ठिणगी कापसातूनच पडली आणि पुढील सर्व आपणास माहिती असलेला स्वातंत्र्याचा इतिहास घडला. खादीला खद्दर असेही नाव आहे. खद्दर म्हणजे जाडे भरडे कापड. हाताने सूत काढणे आणि त्यापासून कापड विणणे हा धंदा भारतात ग्रामोद्योग म्हणून अनेक वर्षांपासून केला जातो. खादीचे उल्लेख वैदिक साहित्यातही आहेत. ऋग्वेद, अर्थवेदात याचे उल्लेख दिसून येतात. सम्राट अशोक काळातही खादीला विशेष महत्व होते. महात्मा गांधी यांनी 1908 मध्ये चरखा संघाच्या माध्यमातून खादीला महत्त्व मिळवून दिले.
भारतात आज 1.42 लाख विणकर आहेत आणि 8.62 सूत काढणारे कारागीर आहेत. एका पाहणीनुसार 9.60 लाख चरखे आणि 1.51 लाख करघोमधून खादी तयार केली जाते. मागील तीन वर्षात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढला आहे. जवळपास 13 लाख लोकांना यातून रोजगार प्राप्त झाला आहे. खादी आयोगाने 43.15 कोटी रुपये खादी कारागिरांच्या कौशल्य विकासावर खर्च केले आहेत. 9.057 लाख कारागिरांना यातून लाभ झाल्याचे खादी आयोगाचे म्हणणे आहे.
कापसाबाबत गांधींजींचे मत
आज कापसाचे पीक केंद्रित झाले असून ते देशातील दूरवरच्या काही ठिकाणी पाठवले जाते. युद्धापूर्वी ते प्रामुख्याने ब्रिटन आणि जपानमध्ये पाठवले जात असे. ते रोखीचे पीक होते आणि अजूनही आहे आणि म्हणून बाजारभावातील चढउताराचा त्यावर परिणाम होत असतो. खादी योजनेत कापूस उत्पादनातील अनिश्चितता आणि जुगार कमी होतो. उत्पादक हवे ते पिकवतो. आपल्या गरजांकरिता आवश्यक असलेल्या गोष्टी आपण आधी पिकवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे हे शेतकऱ्यांला कळले पाहिजे. तो जेव्हा असे करील तेव्हा बाजाराच्या मंदीने बुडण्याच्या धोक्यापासून तो वाचेल. – महात्मा गांधी,
रचनात्मक कार्यमधून. डिसेंबर १३, १९४१
कापसाच्या मुख्य जाती
कपाशीच्या मुख्यतः लागवडीत असलेल्या चार जाती म्हणजे
(१) गॉसिपियम अर्बोरियम (देवकापूस), (२) गॉसिपियम हर्बेशियम, (३) गॉसिपियम हिरसुटम (4) गॉसिपियम बार्बांडेन्स.
यांच्यापैकी अर्बोरियम मूळची भारतातील आहे. मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेले धागे अर्बोरियम जातीचे आहेत असे सिद्ध झालेले आहे. दुसरी जात मध्यपूर्व देशांतून भारतात आणलेली आहे. तिसरी जात अमेरिकन असून ती ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आणली आहे. चौथी जात मूळची पेरू देशातील आहे.
अर्बोरियम कापूस आखूड धाग्याचा व जाडाभरडा असतो, पण या जातीतील कसही प्रकारांचा मध्यम आणि साधारण नरम असतो. ही जात कापूस पिकविणाऱ्या सर्व प्रदेशांत लागवडीत आहे. हर्बेशियमचा धागा अर्बोरियमच्या धाग्यापेक्षा लांब व बारीक असतो. त्याची लागवड गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांत होते. हिरसुटमचा धागा वरील दोन्ही जातींच्या धाग्यांपेक्षा मध्यम ते लांब आणि बारीक व मृदू असतो. ही जात पंजाब, पश्र्चिम उत्तर प्रदेश, राजस्थानचा बिकानेर भाग, आंध्र प्रदेशाचा काही भाग, तमिळनाडू व महाराष्ट्र राज्यांत जास्त प्रमाणांत लावतात. या जातीची लागवड कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांत वाढत आहे. बार्बाडेन्स या जातीची लागवड कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांत करण्यात येते.
हवामान
सर्वसाधारणपणे कापसासाठी २१ ते ३० डिग्री सें. तापमान लागते. २० अंश सें.पेक्षा कमी तापमानात कापसाचे उत्पादन खूपच घटते. म्हणजे कापसाच्या पिकासाठी उष्ण व समशीतोष्ण हवामानाची गरज असते. याशिवाय कापसाच्या योग्य वाढीसाठी कमीत कमी २१० दिवस (धुकेविरहित) मिळावे लागतात. ज्या ठिकाणी ५० ते १०० मि. मी.पर्यंत पाऊस होतो अशा जिराईत जमिनीतसुद्धा कापसाचे पीक चांगले येते. कमी पावसाच्या प्रदेशात सिंचनाने पाण्याचा पुरवठा करता येतो. कापसाला मुळातच कमी पाणी पुरते. या गोष्टी लक्षात घेतल्या, तर भारतात कोणत्या राज्यात कापूस पिकविला जातो हे सहज समजू शकते. कापूस हे खरीप हंगामातील पीक असून त्याचा कालावधी सुमारे ६ ते ८ महिन्यांचा असतो. उत्तर व मध्य भारतातील राज्यांत कापसाची लागवड एप्रिल-मे महिन्यांत केली जाते आणि काढणी डिसेंबर-जानेवारीपूर्वी होते, तर दक्षिणेकडील राज्यांत कापसाची लागवड थोडीशी उशिरा म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करतात आणि वेचणी जानेवारी ते एप्रिल महिन्यांत होते. कापसाच्या पिकासाठी काळी जमीन फार चांगली. या प्रकारची जमीन दक्षिण पठार, माळवा आणि गुजरातच्या काही भागांत आढळते. सतलज-गंगा खोऱ्यातील तांबूस पिवळसर मातीत तसेच दक्षिण द्वीपकल्पातील तांबूस मातीतही कापसाचे पीक घेता येते. भारतामध्ये कापसाचे उत्पादन करणारी प्रमुख राज्ये म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तामिळनाडू. याशिवाय ओरिसा आणि इतर राज्यांत थोडय़ा प्रमाणावर कापसाचे पीक घेतले जाते. गेल्या काही वर्षांतील इतिहास पाहिला तर असे दिसून येईल की, सुमारे २००० सालापर्यंत महाराष्ट्र कापूस उत्पादनाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर होता; पण नंतर गुजरातने कापसाच्या उत्पादनांच्या बाबतीत आघाडी घेतली आणि आजही गुजरात प्रथम क्रमांकावर आहे.
कापूसकोंडी
कापूस हा माणसाच्या जन्मापासून त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याची सोबत करतो. जगाला कापसापासून वस्त्र बनवायला शिकविनाऱ्या पहिल्या काही देशांपैकी भारत हा अग्रणी देश एक आहे. भारतीय शेतकरी कापसाचे पीकही काही हजार वर्षे घेत आला आहे. आजही कापसाच्या उत्पादनात भारत जगात आघाडीवर असला तरी देशातील कापूस शेतकरी सुखात किंवा चिंतामुक्त आहे, असे नाही. याउलट, कापसाचे आगार समजल्या जाणाऱ्या विदर्भात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये बहुतांश कापूस शेतकरीच आहेत. एकीकडे दरसाल वाढत जाणारे कापूस उत्पादन आणि दुसरीकडे कापूस शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अशी ही विचित्र कोंडी आहे. आणि ही कापूसकोंडी सोडविण्यासाठी विविध काळातील सत्ताधारी देखील प्रयत्नशील आहेत.
माहितीस्रोत सौजन्य: विकासपिडिया,