महाराष्ट्रात १७ ते १८ मे दरम्यान पावसाचा अंदाज
जळगाव (प्रतिनिधी) बंगालच्या खाडीत तयार होत असलेले अम्फान चक्रीवादळ ३६ तासाच्या आत उठण्याची शक्यता असून, त्याचा महाराष्ट्र राज्यासह तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा या राज्यावर देखील परिणाम होणार असून महाराष्ट्रात त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता आहे.
अम्फान चक्रीवादळ हे दोन दिशांना जाण्याचा अंदाज असून ते एका बाजूला पश्चिम बंगाल, बांगलादेश व दुसऱ्या बाजूला म्यानमारच्या दिशेला जाईल असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने दिला आहे. वादळ कोणत्याही दिशेला गेले तरी त्याचा भारतावर परिणाम होणार आहेच. या चक्रीवादळाचा फटका हा नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा पश्चिम बंगाल या राज्यांना बसेल. जर वादळ ओरिसाच्या दिशेला धडकले तर छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशात परिणाम करेल.
महाराष्ट्रात १७ ते १८ मे दरम्यानच्या काळात कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पूर्वंमोसमी पाऊस व चक्रीवादळ याचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी करावी. अशा सूचना कृषी खात्याने दिल्या आहेत.