अमरावती जिल्हयातील मोर्शी तालुका हा संत्र्यासाठी प्रसिध्द. पण याच तालुक्याला हायटेक डेअरीच्या माध्यमातून नवी ओळख देण्याचा प्रयत्न युवा शेतकरी विश्वजीत देशमुख यांनी चालविला आहे. व्हिडी फार्म लॅण्ड ब्रॅण्डने खास गिर गाईंच्या दूधाची विक्री विश्वजीतव्दारे होते. नागपूर, अमरावती, मोर्शी या भागात पहिल्या टप्प्यात दूध विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
अशी झाली सुरवात
दुग्ध व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असलेल्या विश्वजीतने गाईंपासून मिळणार्या शेण आणि गोमूत्राच्या विक्रीचाही विचार डोक्यात ठेवला होता. त्यामुळेच या दोन्ही घटकातील तांत्रीक माहिती मिळविण्याचे काम त्याने पहिल्या टप्प्यात हाती घेतले. सुरवातीला आय.आय.टी. तज्ज्ञांच्या माध्यमातून शेणात उपलब्ध घटकांची माहिती घेतली. त्यांच्याव्दारेच नंतर पारंपारीक आणि अपारंपारीक ऊर्जेविषयी देखील माहिती मिळाली. अपारंपारीक ऊर्जा वापरणार्या देशांविषयी जाणून घेतले. त्यामुळे दूध उत्पादनासोबतच बायोगॅसच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करता येईल का ? याची चाचपणी पुढच्या टप्प्यात सुरु केली. मदर डेअरीच्या उपाध्यक्षांशी देखील याविषयावर चर्चा केली. परंतू त्यांनी कोणतेही सहकार्य करण्यास असमर्थता दर्शविली. इतरांकडून सहकार्य मिळणार नाही, याची खात्री झाल्यानंतर स्वतःच 2017 मध्ये दहा गाईंपासून व्यवसायाची सुरवात केली. या गाईंपासून मिळणारे दूध विकताना सुरवातीला खुप त्रास झाला. लोकांना ए-2 दूध आणि त्याची उपयोगीता याविषयी काहीच माहिती नव्हती. परिणामी विश्वजीतला अपेक्षीत दर मिळत नव्हता. मोर्शी येथील प्रयोगशील शेतकरी अजित जोशी यांना या दूधाची उपयुक्तता कळाल्यानंतर त्यांनी दूध खरेदी सुरु केली, तेच पहिले ग्राहक होते.
जातीवंत गिर वळू
गाईंच्या खरेदीसोबतच जातीवंत गिर वळूची खरेदी करण्यात आली. 60 हजार रुपयांना त्याची खरेदी करण्यात आली. पोहरा (जि.अमरावती) येथील शासकीय गिर संवर्धन केंद्रातून याची खरेदी केल्याचे त्यांनी सांगीतले.
टप्याटप्याने वाढविली संख्या
प्रकल्पात सुरवातीला दहा गाई होत्या. दर चार महिन्याने तीन गाई याप्रमाणे टप्याटप्याने गाईंची संख्या वाढविण्यात आली. आता प्रकल्पातील गाईंची संख्या 84 वर पोचली आहे. लहान वासरांची संख्या 15 असल्याचे विश्वजीत यांनी सांगीतले. 240 ते 260 दिवस इतकाच दूध देण्याचा कालावधी एका गिर गाईंचा आहे. एका गिर गाईपासून दोन्ही वेळचे मिळून सरासरी 5 ते 6 लिटर दूध मिळते.
असे आहे शेड
प्रकल्पाकरीता 90 बाय 70 फुट आकाराचे शेड उभारण्यात आले आहे. 9 लाख रुपयात याची उभारणी झाली. मुक्त गोठा संचार पध्दतीचा अवलंब या प्रकल्पात केला आहे. सकाळी कॉन्सट्रेटेड फिड दिले जाते. दर तीन लिटरसाठी एक किलो याप्रमाणे दिले जाते. गाईंच्या वजनारुप (बॉडी मास इन्डेक्स) देशी फिड देण्यावर भर राहतो. मका, ज्वार, तूरीची चूरी याचे मिक्श्चर यात राहते. 50 मिली कॅल्शीयम, 30 ग्रॅम मिनरलही सोबत दिले जाते. सकाळी हिरवा चारा देण्याचे देखील नियोजन आहे. पावसाळ्यात कोरडा चारा दुपारी दिला जातो. संध्याकाळी परत हिरवा चारा दिला जातो. पावसाळ्याचा अपवाद वगळता इतरवेळी रोज संध्याकाळी हिरवा चारा देण्यावर त्यांचा भर राहतो. 10 ते 12 किलोचे कोरडा आणि 18 ते 20 किलो हिरवा चारा उपलब्ध करुन दिला जातो.
चारा लागवड
ज्वारी, यशवंत या हिरव्या चार्यासोबत गुळवेल ही दिल्या जातो. दर तीन महिन्यांनी एकदा गुळवेल देण्यावर भर राहतो. विश्वजीत यांच्याकडे 40 एकर शेती आहे. यातील दहा एकरावर ते चारा लागवड करतात.
आरोग्य असे जपतात
उन्हाळ्यात कोरफड गाईच्या पाठीला लावल्यास थंडावा राहतो. ज्यांच्याकडे कॅल्शीयम उपलब्ध नसेल त्यांनी बेलाची पाने सावलीत वाळत ठेवायची त्यानंतर ही पाने बारा ते 15 दिवस वाळत घालून हाताने बारीक करुन ती एखाद्या बॉक्समध्ये जमा केल्यास हा पर्याय देखील कॅल्शीयमसाठी पूरक ठरतो. कॅल्शीयमवर अतिरिक्त खर्च करण्याची गरज यामुळे भासत नाही. गाय जमीन चाटते त्यावेळी कॅल्शीयमची कमरतता आहे, असे समजावे.
पशुधन अधिकार्याची सेवा
जनावरांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी ऑन कॉलबेसीसवर पशुधन अधिकार्यांची सेवा घेतली जाते. जनावरांचे लसीकरण त्यांच्या माध्यमातूनच नियमीपणे होते. कॅल्शीयम वगळता महिन्याला सहा हजार रुपयांचा खर्च जनावरांच्या आरोग्यावर होतो.
दुग्धोत्पादनाला दिली व्यावसायिकता
84 गाईंपासून सरासरी 125 ते 150 लिटर दूध मिळते. सकाळी साडेपाच ते साडेसहा बारा तास त्यानंतर गॅप देत दूध काढले जाते. सुरवातीला मशीनने दूध काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, गाईंना सवय नसल्याने सुरवातीला दूध उत्पादन कमी मिळत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मजुरांमार्फतच दूध काढण्यावर भर दिला गेला. गाय वाल्यानंतर दोन महिन्यांनी ती दुबार गर्भार राहिलीच पाहिजे. त्यामुळे दुग्धोत्पादनात सातत्य राहते. ही पद्धती कटाक्षाने पाळली गेली पाहिजे. मुक्त गोठा पध्दतीत गाई आणि वळू मोकाट सोडल्या जात असल्याने हे साधता येते.
दूध पॅकींग युनिट
प्रती तास 500 पाकिट या क्षमतेचे पॅकींग युनिट त्यांनी उभारले आहे. 2017 मध्ये 68 लाख रुपयात याची उभारणी करण्यात आली. रोज 300 ते 350 दूध पाकिटांचे पॅकींग यावर होते. मोर्शीवरुन अमरावती आणि तेथून नागपूर असे वाहनाने दूध पाठविले जाते. अमरावती ते नागपूर असे दूध पाठविण्यासाठी खासगी वाहतूकदाराची मदत घेण्यावर त्यांचा भर राहतो. 30 लिटर दुधापासून 1 किलो तूप मिळते. 250 मिली, 500 आणि एक किलोच्या पॅकींगमध्ये तूपाची विक्री होते. कंपोस्टची विक्री 15 रुपये किलोने होते. शेणापासून तयार गोवर्या विकल्या जातात. गोवर्याची विक्री देखील करण्यावर भर राहिला आहे.
असे आहेत दर- दूध ः प्रती लिटर 60 रुपये
- तूप ः1200 रुपये किलो
- गोमूत्र ः वीस रुपये लिटर
- गोमूत्र बॉटल ः 50 मिली, साडेचार रुपये
मुद्रा लोणसाठी झिजविले बँकांचे उंबरठे
व्यवसाय विस्ताराच्या विचारात असलेल्या विश्वजीत देशमुख यांनी मुद्रा लोणसाठी महाराष्ट्र बँक आणि कोंकण विदर्भ ग्रामीण बँकेकडे विचारणा केली. परंतु, या दोन्ही बँकांनी त्यासाठी नकारात्मकता दर्शविली. परंतु, त्यानंतरही निराश न होताच पैसा उभारण्यासाठी इतर पर्याय विश्वजीत यांनी निवडले. शासनस्तरावरुन मुद्रालोणचा प्रसार होत असला तरी बँका मात्र सुलभरित्या ते मिळू देत नाही, असा अनुभव यातून आल्याचे त्यांनी हताशपणे सांगीतले.
व्यवसायाचे व्यवस्थापन, उत्पादीत दूधाच्या विक्री व बाजारपेठेत मार्केटींग, वितरणासाठी मोर्शी आठ, अमरावती आणि नागपूर येथे प्रत्येकी सहा व्यक्तींची सेवा या प्रकल्पाकरीता घेण्यात आली आहे. उत्पादीत दुधाच्या वितरणासह सर्वच कामे यांच्या माध्यमातून होतात. ग्राहकांना घरपोच दूध पोचविले जाते.
विश्वजीत देशमुख
9953327934