लडाखमध्ये सोनम वांगचूक यांचे अविष्कारी प्रयोग
तंत्रज्ञानाद्वारे परिवर्तनाच्या दिशेने प्रयत्न करणार्या व्यक्तींविषयी विचार करता रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचूक यांचे नावे समोर येते. त्यांनी ‘आईसस्तुपा’ सारख्या आविष्कारी तंत्रज्ञानाच्या आधारे लडाख मध्ये शेतीसाठी पाण्याची समस्या सोडवली आहे. वांगचूक यांचे कार्य आणि व्यक्तिमत्व सर्वांसमोर आले ते बॉलीवूडमधील थ्री-इडिएट या चित्रपटामुळे. दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल, असे शिक्षण काश्मिरातील मुलांना साध्या-सोप्या भाषेत देण्याचे काम ते करत आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित एका कार्यक्रमासाठी जळगावात आले असता त्यांच्याशी संवाद साधता आला.
दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त अहिंसा दिवस साजरा होतो. या निमित्ताने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे 10 दिवसीय ‘गांधीयन लिडरशीप कॅम्प’चे आयोजन केले होते. युवकांना गांधीजींचे कार्य समजून घेता यावे, हा त्यामागचा हेतू होता. यात युवकांशी संवाद साधण्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचूक यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी जळगावकर नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माझ्या मनातही त्यांनी केलेल्या कार्याविषयी अनेक काही प्रश्न होते. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मला मिळाली. त्यातून वांगचूक यांचे कार्य, जीवनप्रवास उलगडला.
आईकडून प्राथमिक शिक्षणाचे धडे
सोनम वांगचूक यांचा जन्म जम्मू-काश्मीरच्या लेह जिल्ह्यातील उलेतोकोपो येथे 1 सप्टेंबर 1966 रोजी झाला. त्यांचे वडील त्यावेळेस राज्यसभेचे सदस्य होते. गावात कुठलीही शाळा नसल्याने वयाच्या नवव्या वर्षापर्यंत त्यांना शिक्षण घेता आले नाही. या दरम्यान त्यांच्या आईने त्यांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. नंतर ते दिल्लीला गेले. तेथे त्यांनी केंद्रिय विद्यालयात प्रवेश मिळवला. पुढे रिजनल कॉलेज, श्रीनगर येथे मॅकेनिकल इंजिनियरींगची पदवी घेतली. शिक्षणाची अवस्था व दर्जा लक्षात घेता त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक मुलांना शिक्षित करण्यासाठी एक शाळा सुरू केली. परकीय शिक्षण पद्धतीच्या आक्रमणाचे बळी ठरलेल्या सोनम यांच्यासह त्यांच्या मित्रांनी एकत्र येत एक संघटना तयार केली.
संघटना अन् शाळेची स्थापना
शिक्षणात जे विद्यार्थी प्रगतिशील आहेत; परंतु परिस्थितीअभावी त्यांना पुढील शिक्षण घेणे शक्य होत नाही किंवा गरिबीच्या परिस्थितीमुळे अपेक्षित क्षेत्रात जाणे शक्य होत नाही, अशा मुलांसाठी सोनम वांगचूक काम करतात. अशा मुलांना शिक्षणासाठी मदत करून त्यांची स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचे काम वांगचूक करत आहेत. शिक्षण तसेच पर्यावरण क्षेत्रात ते काम करत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्यांनी या कामाला पूर्णपणे वाहून घेतले आहे. त्यासाठी त्यांनी 1988 साली स्टुडंटस् एज्युकेशनल अॅण्ड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख (एसएसीएमओएल) नावाची संघटना तयार केली आहे. जेव्हा लडाख येथे शिक्षणविषयक कार्य त्यांनी सुरु केले; तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, मुलांना प्रश्नांची उत्तरे माहिती असतात. मात्र, त्यांना भाषेचा सर्वात जास्त अडसर येतो. तेव्हा त्यांनी स्थानिक भाषेत मुलांना शिकवायला सुरुवात केली. जम्मू-काश्मीर सरकार बरोबर त्यांनी लडाखच्या शाळांतील अभ्यासक्रम स्थानिक भाषेत तयार करण्याचे कार्य हाती घेतले. वर्ष 1994 मध्ये त्यांनी शाळेतून काढून टाकण्यात आलेल्या एक हजार तरुणांची संघटना तयार केली आणि त्यांच्या मदतीने एक अशी शाळा काढली, जी विद्यार्थ्यांमार्फतच चालवली जाते. त्यांनी स्थापन केलेल्या या शाळेत पूर्णपणे सौरऊर्जेचा उपयोग केला जातो. वांगचूक यांना वाटते की, शालेय अभ्यासक्रम बदलणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, पुस्तकी अभ्यासक्रमापेक्षा प्रात्यक्षिकांचा अवलंब जास्त हितावह आहे. या सर्व बाबी प्रत्यक्षात आणण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. शिक्षणक्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याकरिता त्यांनी लेहपासून 13 किलोमीटर अंतरावर नापास झालेल्या मुलांसाठी शाळा सुरू केली. आज या शाळेत बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्या शंभर मुलांना शिक्षण दिले जाते. स्वतःचे डोके चालवा आणि शक्य तेवढे नवीन शोध लावा, या मानसिकतेसह या शाळेत मार्गदर्शन केले जाते. या शाळेत पूर्णपणे सौरऊर्जेचा वापर केला जातो. स्वयंपाकासह इतर सर्व बाबींसह जिवाश्म इंधनाचा वापर केला जात नाही. उणे 30 अंश सें. तापमानातही शाळेची वास्तू सौरऊर्जेवरच गरम राहते. मुलांना अभ्यासासोबत पशुपालन, शेती, अन्नपदार्थ बनवणे अशा बाबींचे शिक्षण दिले जाते. एवढेच नाही तर प्रतिकूल परिस्थितीतही कसे जगावे, याचेही धडे या शाळेत दिले जातात.
पाण्याच्या समस्येवर शोधला उपाय
सोनम वांगचूक पूर्वी शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात काम करत होते. परंतु, आता लडाखमध्ये पाण्याचे स्त्रोत घटत असल्याने जलसंकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून ते लडाखमध्ये पाण्याच्या संदर्भात काम करत आहेत. लडाखमध्ये जवळपास पाऊसच पडत नाही. तिथे बर्फ पडतो आणि या बर्फाचे पर्वत तयार होतात. त्यांना ग्लेशियर (हिमपर्वत) म्हणतात. ग्लेशियर वितळल्यावर जे पाणी होते त्यावर तेथील लोक शेती करतात. गेल्या काही वर्षांपासून निसर्गचक्र बदलल्याने ग्लेशियर लवकर वितळू लागले आहेत. या कारणामुळे वसंत ऋतूत जेव्हा पाण्याची अत्यावश्यकता असते तेव्हा शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही. वसंत ऋतूमध्ये बी पेरले जाते तेव्हा पाण्याची खूप कमतरता असते. हिवाळ्यानंतर फारशी उष्णता त्या ठिकाणी नसते. उन्हाळ्यात हेच चित्र उलट असते. उन्हाळ्यात ग्लेशियर लवकर वितळत असल्याने पूर येतात. पुढे त्यात अजून भर पडते ती पावसाच्या पाण्याची. अशा स्थितीत शेतीचे प्रचंड नुकसान होते. पाण्याअभावी शेकडो पशुपक्षी आणि माणसे सद्धा मरण पावतात. वसंत ऋतूत पाण्याची टंचाई भासते. तर उन्हाळ्यात सुरू झालेला पाण्याचा प्रवाह हिवाळ्यापर्यंत चालूच असतो. हे चक्र लक्षात घेता काय करता येईल, यादृष्टीने वांगचूक यांनी विचार करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी विचार केला की, वसंत ऋतूत पाण्याची कमतरता भासते. तर उन्हाळ्यातले पाणी हिवाळ्यापर्यंत वाहत राहते. हिवाळ्यात कोणीच शेती करत नाही. ते पाणी सिंधू नदीत वाहून जाते. या पाण्यापासून आपण कृत्रिम मानवीय हिमपर्वत बनवू शकतो का? असा विचार त्यांनी केला. ग्लेशियर बनवायचे आणि मग ते वसंत ऋतूत वितळेल आणि वितळून मग शेतीला पाणी देता येईल, असा प्रयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वसंत ऋतूतले पाणी, जेव्हा शेती होत नाही ते पाणी गोठवून जेव्हा शेती केली जाईल तेव्हा द्यायचे, अशा प्रयोगावर ते काम करायला लागले. त्यांच्या शाळेने विज्ञानाच्या आधारावर एक तंत्रज्ञान शोधले. ज्याला त्यांनी आईस्तुपा असे नाव दिले. गणित आणि विज्ञानाचा आधार घेत त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला. त्यांनी कमी क्षेत्रफळात ग्लेशियर तयार केले. क्षेत्रफळ कमी असल्याने ते लवकर वितळत नाही. हिवाळ्यातल्या बर्फाला पुढील काही महिन्यांपर्यंत टिकवून ठेवता आले.
काय होता प्रयोग…
वसंत ऋतूपर्यंत (एप्रिल-मे) पाणी गोठवून ठेवण्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला. वॉटर ऑलवेज मेंटेन लेव्हल या सिद्धांतानुसार त्यांनी नदीचा झरा ते एका मोकळ्या मैदानापर्यंत छोटे-छोटे पाईप टाकले. पाईपचे एक टोक नदीच्या झर्यात तर दुसरे टोक मैदानात ठेवले. झर्यातून पाणी मैदानात आणले. तेथून पुढे दुसरा छोटा पाईप जोडून त्या पाईपचे दुसरे टोक उंचीवर ठेवले. या टोकाला त्यांनी स्प्रिंक्लर बसवले. तापमान उणे 20 अंश सें. असल्याने स्प्रिंक्लरमधून बाहेर पडणारे पाणी गोठते. ही क्रिया सतत सुरू राहत असल्याने बर्फाचे ग्लेशियर तयार होते. बघता-बघता सात ते आठ मजलीपर्यंतच्या उंचीचे स्तूप आकारास येते. हा त्यांचा पहिला प्रयोग होता आणि तो यशस्वी झाला. या प्रयोगासाठी त्यांनी जम्मूच्या स्थानिक कंपनीकडून पाईप विकत घेतले होते. लडाखमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बर्फामुळे सगळे मार्ग बंद होतात. तब्बल सहा महिने ही परिस्थिती असते. म्हणून त्यांनी स्थानिक कंपनीकडून प्रयोगाकरिता तीन-चार ट्रक भरून पाईप आणले होते. त्यापैकी काही पाईप तुटून गेले तर काही अति थंड वातावरणामुळे लावताना तुटले. या समस्येमुळे प्रयोग पुढे टिकवता येणार नाही, असे वाटल्याने ते निराश झाले. मात्र, जळगाव येथील जैन इरिगेशन कंपनी चांगल्या दर्जाचे एचडीपीई पाईप बनवत असल्याची माहिती वांगचूक यांना झाली. त्यांनी जैन इरिगेशनचे पाईप वापरण्याचे ठरवले. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्याशी थेट ई-मेलवर संपर्क साधला. मोकळेपणाने प्रयोगाबद्दल सांगितले. अजित जैन यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यांना आवश्यक एचडीपीई पाईपांची पूर्तता केली. भारतीय वायू सेनेच्या सहकार्यामुळे दहा दिवसांच्या आत त्यांना पाईप उपलब्ध झाले. त्यांनी पाण्यासाठी केलेला प्रयोग यशस्वी झाला.
चारशे प्रयोगांचे पेटंट
वांगचूक म्हणाले की, ‘औद्योगिक क्रांतीमुळे जो काही विकास झालेला आहे तो केवळ भौतिकतेच्या अवतीभोवती गुरफटलेला आहे. मनुष्य हा त्याचे आयुष्य अधिक सुखदायी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतो. मात्र, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर न केल्यास मनुष्याच्या आयुष्याची दशा आणि दिशा भरकटते. मला एक असे विद्यापीठ तयार करायचे आहे जे बर्फाळ- पर्वतीय भागाकरिता ग्लेशियरसारखे पर्याय म्हणा किंवा नवीन संशोधन करून कृषी, शिक्षण व व्यापाराकरिता उपयोगात आणेल. पंन्नास वर्षीय सोनम वांगचूक यांच्या नावे जळपास चारशे प्रयोगाचे पेटंट आहेत. भारतातीलच नव्हे तर परदेशातील अनेक वैज्ञानिक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींसाठी ते आदर्श ठरले आहेत. शिक्षण, संशोधन व समाजकार्यासाठी आयुष्य वेचणार्या या खर्याखुर्या रँचो अर्थात सोनम वांगचूक यांना थ्री-इडियट चित्रपटातील “काबिल बनो काबिल… कामयाबी आपके पीछे-पीछे आयेगी…” हे वाक्य तंतोतंत लागू पडते.
आधीपासून जळगावच्या प्रेमात
जळगाव शहराशी त्यांचा जो संबंध आला त्याविषयी सांगताना ते म्हणतात की, आज मला जळगाव शहरात येऊन फार आनंद होत आहे. जेव्हा आपण मुलांशी संवाद साधतो तेव्हा तो एक संदेश असतो आणि हा संदेश आपण भविष्यासोबत वाटून घेत असतो. आज जे काही मी बोलणार आहे तो एक संदेशच असेल. माझा हा संदेश येणार्या 22 व्या शतकाकरिता असेल. आता आपण 21 व्या शतकात आहोत. मात्र 22 व्या शतकाकरिता ही मुलं संदेश वाहक आहेत. ते हा संदेश पुढे पोहचवतील. मला चार-पाच वेळेस जळगावचे दर्शन झाले आहे. 20 वषार्र्ंपूर्वी मी दिल्लीहून मुंबईला रेल्वेने जात असे. तेव्हा प्रवासात जळगावचे दर्शन होत असे. जळगाव रेल्वे स्टेशन येताच मला खूप आकर्षण वाटायचे. येथे जल (पाणी) असेल म्हणूनच की काय या शहराचे नाव जळगाव असे आहे, असे वाटायचे. दहा वर्षांपूर्वी मी जेव्हा माझ्या गावी जल आणि शेतीच्या संदर्भात काम करण्याचे ठरवले तेव्हा ड्रीप इरिगेशनबाबत रुची निर्माण झाली. ड्रीप इरिगेशन सिस्टीमची निर्मिती करणार्या जैन इरिगेशन कंपनीविषयी मी जाणून होतो. मला नंतर कळाले की जैन इरिगेशन कंपनी याच जळगावमध्ये स्थापित आहे. त्यानंतर जेव्हा-जेव्हा मी रेल्वेने मुंबईकडे जात असे, तेव्हा जळगाव रेल्वे स्टेशन आल्यावर खिडकीतून बघायचो. कधीतरी वेळात वेळ काढून जळगावला भेट द्यावी, अशी माझी मनोमन इच्छा होती. ती या कार्यक्रमानिमित्ताने पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
- मो. 9881057868
(लेखक जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स मध्ये मिडिया विभागात कार्यरत आहेत.)