जगभर समुद्रावर वेगाने कब्जा करताहेत स्क्विड; वैज्ञानिकांनाही उलगडेना रहस्य
सामान्य माशांपेक्षा पाचपट वेगाने होते वाढ

मुंबई : समुद्रात काहीतरी विचित्र घडतंय! तुम्ही विचार करत असाल की शार्क, व्हेल किंवा मासे समुद्राचे राजे आहेत, तर थांबा… आता समुद्रावर हळूहळू एका 8 हातांच्या जीवाने कब्जा करायला सुरुवात केली आहे – आणि तो आहे स्क्विड (Squid).
1953 पासून 2023 पर्यंतच्या 6 दशकांच्या डेटाचा अभ्यास केला असता शास्त्रज्ञांना धक्का बसला. जगभरातील 35 प्रजातींच्या स्क्विड, ऑक्टोपस आणि कटलफिशची संख्या प्रचंड वाढली आहे. काही ठिकाणी तर ही वाढ दुप्पट-तिप्पट आहे.
काय आहे रहस्य?
आधी शास्त्रज्ञांना वाटलं – समुद्र गरम होत आहे म्हणून स्क्विड वाढताहेत. पण नवीन संशोधनाने हा समज खोटा ठरवला.
1. शिकारीच संपले: आपण माणसांनी ट्यूना, शार्क, कॉड सारखे मोठे मासे प्रचंड प्रमाणात पकडून संपवले. हेच मासे स्क्विडला खायचे. शिकारीच संपल्याने स्क्विडला मोकळे रान मिळाले.
2. सुपरफास्ट ग्रोथ: स्क्विडचा जीवनक्रमच वेगळा आहे. एक मासा वाढायला जितका वेळ घेतो, त्याच्या 5 पट वेगाने स्क्विड वाढतो. त्यांचे आयुष्य फक्त 1 ते 2 वर्षांचे. या काळात ते दिवसाला स्वतःच्या वजनाच्या 30% इतके अन्न खातात आणि हजारो अंडी देतात. याला शास्त्रज्ञ ‘समुद्रातील तण’ (Weeds of The Sea) म्हणतात. कुठेही गडबड झाली की आधी हे पोहोचतात.
3. नरभक्षक बनले: संशोधनात अजून एक भयानक गोष्ट समोर आली. जेव्हा मोठे मासे संपले, तेव्हा स्क्विडने एकमेकांनाच खायला सुरुवात केली! जगण्यासाठी त्यांनी नरभक्षक (Cannibalism) होण्याचा मार्ग स्वीकारला.
View this post on Instagram
काय आहे नेमका धोका?
वरवर पाहता स्क्विड वाढणे चांगले वाटेल, पण ते समुद्राचे संतुलन बिघडवत आहेत. ते इतके खादाड आहेत की, लहान माशांना खाऊन टाकत आहेत, ज्यामुळे माशांची संख्या परत वाढणे आणखी कठीण झाले आहे. आणि गंमत म्हणजे, समुद्र जास्त गरम झाला तर स्क्विडलाही त्रास होतो. 2 अंश तापमान वाढल्यास त्यांची भूक वाढते पण अन्न तेवढे मिळत नाही, त्यामुळे त्यांची संख्या परत कमी होऊ शकते, असा इशारा शास्त्रज्ञ देतात.
म्हणजे थोडक्यात, मानवाने समुद्रात जो पर्यावरणीय गोंधळ घातला, त्याचा फायदा घेऊन स्क्विडने तात्पुरता जगभरच्या समुद्रावर कब्जा केला आहे. ते समुद्राचे नवे राजे नाहीत, तर बिघडलेल्या घरात घुसलेले संधीसाधू पाहुणे आहेत.





